डॉ. रामचंद्र साबळे
Weather Forecasting : महाराष्ट्रावर आज (ता. ३१) आणि उद्या (ता. १ एप्रिल) हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके राहतील. हीच हवेच्या दाबाची स्थिती भारतावरही राहील. मात्र मंगळवार (ता.२ एप्रिल)पासून पुढे शनिवार (ता. ६ एप्रिल)पर्यंत महाराष्ट्रावर व संपूर्ण भारतावर १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. अरबी समुद्रावर १०१० हेप्टापास्कल व बंगालच्या उपसागरावर १००८ ते १०१० हेप्टापास्कल इतके अधिक हवेचे दाब राहतील. त्यामुळे वारे आग्नेयेकडून पूर्व व मध्य विदर्भाच्या दिशेने वाहतील आणि अल्पशा पावसाची शक्यता निर्माण करतील. काही प्रमाणात वारे नाशिक व जळगावच्या दिशेने वाहतील व तेथेही अल्पशा पावसाची शक्यता निर्माण करतील.
या आठवड्यात कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, मध्य विदर्भ व पूर्व विदर्भातही आकाश अंशतः ढगाळ राहील. मध्य विदर्भ व पूर्व विदर्भात वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होईल. वारे ताशी १७ ते १८ कि.मी. इतक्या वेगाने वाहतील. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे व धुळे जिल्ह्यांतही वाऱ्याचा ताशी वेग १७ कि.मी. इतका अधिक राहील. सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल. कमाल तापमान मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगात वाढ होईल. हवामान उष्ण व कोरडे राहील.
प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ २० अंश सेल्सिअस, इक्वेडोरजवळ २४ अंश सेल्सिअस, तर डेव्हिडजवळ ३० अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे तिकडे हवेचे दाब वाढतील व त्या दिशेने वारे वाहण्यास प्रतिबंद होईल. हिंदी महासागर, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असून, बाष्पीभवनाचा वेग वाढेल. वारे भारताच्या दिशेने बाष्प वाहून आणतील व ढगनिर्मिती होऊन पूर्वमोसमी पाऊस होतील.
कोकण ः
कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस, तर रायगड व पालघर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७२ टक्के, तर रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांत ५८ ते ५९ टक्के राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ४९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे व पालघर जिल्ह्यांत १४ ते १६ टक्के, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २४ टक्के, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. हवामान उष्ण व कोरडे राहील.
उत्तर महाराष्ट्र ः
कमाल तापमान नंदुरबार जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस, तर नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. नाशिक, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात १६ टक्के, नाशिक व धुळे जिल्ह्यांत २५ टक्के, तर नंदुरबार जिल्ह्यात ३१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ९ ते १४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग धुळे जिल्ह्यात १७ कि.मी. तर उर्वरित जिल्ह्यांत १२ ते १३ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
मराठवाडा ः
कमाल तापमान लातूर व नांदेड जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस तर धाराशिव, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. बीड व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान लातूर व नांदेड जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बीड जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस आणि जालना जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत २७ टक्के तर लातूर व परभणी जिल्ह्यांत २५ टक्के राहील. धाराशिव, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता १९ ते २२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ ते १४ टक्के इतकी कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे व उष्ण राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १४ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्य व वायव्येकडून राहील.
पश्चिम विदर्भ ः
कमाल तापमान वाशीम जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, अकोला जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २७ टक्के, तर बुलडाणा व अकोला जिल्ह्यात १८ ते २४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १० ते १२ टक्के राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
मध्य विदर्भ ः
यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २८ ते ३२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता केवळ १४ ते १७ टक्के राहील. हवामान अत्यंत कोरडे व उष्ण राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ६ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.
पूर्व विदर्भ ः
कमाल तापमान चंद्रपूर जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, तर गडचिरोली, भंडारा व वाशीम जिल्ह्यांत ३७ ते ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ३४ ते ४० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १६ ते १८ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ कि.मी. इतका कमी राहील. वाऱ्याची दिशा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत आग्नेयेकडून, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात पावसाची शक्यता राहील.
पश्चिम महाराष्ट्र ः
कमाल तापमान सोलापूर जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा व सोलापूर जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, सांगली व पुणे जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर व नगर जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ५६ टक्के, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत २२ ते ३२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १३ ते १७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १२ ते १६ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
कृषी सल्ला ः
- खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून जमिनीची नांगरट, जमीन सपाटीकरण आणि बांधबंदिस्तीची कामे सुरू करावीत.
- रब्बी पिकांच्या काढणी व मळणीची कामे पूर्ण करावीत.
- फळबागांमध्ये ठिबकद्वारे सिंचन करावे.
- जनावरांना स्वच्छ आणि मुबलक पाण्याची सोय गोठ्यामध्येच करावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.