ज्वारी पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन

ज्वारी पिकांच्या कमी उत्पादकतेमध्ये कीड, रोगामुळे होणारे नुकसान हे महत्त्वाचे कारण आहे. ज्वारी पिकावर मुख्यत्वे खोडकिडा, खोडमाशी, लष्करी अळी, हुमणी अळी, मीजमाशी, तुडतुडे, मावा अशा किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो.
ज्वारी पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन
ज्वारी पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन

ज्वारी पिकांच्या कमी उत्पादकतेमध्ये कीड, रोगामुळे होणारे नुकसान हे महत्त्वाचे कारण आहे. ज्वारी पिकावर मुख्यत्वे खोडकिडा, खोडमाशी, लष्करी अळी, हुमणी अळी, मीजमाशी, तुडतुडे, मावा अशा किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. खोडमाशी  या किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरुवातीच्या रोप अवस्थेत पीक एक महिन्याचे (१० ते ३० दिवसांचे) असताना होतो. उशिरा पेरणी केलेल्या ज्वारीवर, जास्त सापेक्ष आर्द्रता व मध्यम तापमान अशा वातावरणात या किडीचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. 

  •   प्रौढ माशी आकाराने लहान आणि करड्या रंगाची असते. 
  •   अंडी सिगारेटच्या आकारासारखी पांढऱ्या रंगाची असतात. 
  •   अळीचा रंग पांढरा असून तिला पाय नसतात. ढगाळ वातावरण आणि अनियमित पडणारा पाऊस किडीच्या प्रादुर्भाव वाढीसाठी कारणीभूत ठरतो. अळी पोंग्यात प्रवेश करते. त्यानंतर रोपाच्या वाढीचा खालचा भाग खाऊन नष्ट करते. 
  • नुकसान ः पोंगेमर होऊन झाडाला जमिनीलगत फुटवे फुटतात. प्रादुर्भावग्रस्त कणसे सडतात व वाळतात. खोडमाशीच्या जास्त प्रादुर्भावामुळे ज्वारीच्या ४० ते ५० टक्के आणि कडब्याचे ३० ते ३५ टक्के नुकसान होऊ शकते. 
  • आर्थिक नुकसान पातळी ः १० टक्के पोंगेमर प्रादुर्भावग्रस्त झाडे.  
  • खोडकिडा 

  • किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे पीक एक महिन्याचे झाल्यापासून कणसात दाणे भरेपर्यंत (२५ ते १०० दिवसांपर्यंत) होऊ शकतो. 
  •   प्रौढ पतंग मध्यम आकाराचे असतात. 
  •   पोंग्यातील पानांवर लहान पारदर्शक चट्टे किंवा छिद्र दिसून आल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्याचे समजावे. किडीचा प्रादुर्भावामुळे कोवळ्या पानांवर होऊन आडव्या रेषेत लहान लहान छिद्रे पडलेली दिसतात. वाढीस लागलेल्या मूळ शेंड्यावर प्रादुर्भाव होऊन पोंगेमर होते. 
  •   अळी झाडात शिरल्यानंतर ताट्यातील गाभा खाते. त्यामुळे ताटे आणि कणसे मधून फाटतात. कालांतराने वाळतात.
  •   आर्थिक नुकसान पातळी - ५ टक्के पोंगेमर प्रादुर्भावग्रस्त झाडे  
  • मावा 

  • पीक ३० ते ८० दिवसांचे असताना ज्वारी पिकावर निळसर, पिवळसर आणि हिरव्या रंगांच्या माव्यांचा प्रादुर्भाव होत. 
  •   निळसर रंगाच्या माव्याचे पाय काळपट असतात. पिवळसर रंगाचा मावा जुन्या पानाच्या खालच्या बाजूने आढळून येतो, तर हिरवा मावा पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीत पोंग्यात आढळून येतो. 
  •   मावा कीड पानांतून व पोंग्यातील रस शोषते. पाने आकसून, झाडाची वाढ खुंटते. दाणे भरण्यावर विपरीत परिणाम होतो. 
  •   मावा किडीच्या शरीरातून पाझरलेल्या गोड चिकट द्रवावर काळी बुरशी वाढते. पानावर बुरशीचा काळा थर जमा होऊन अन्ननिर्मितीच्या क्रियेत बाधा येते. त्यास चिकटा पडला असे म्हणतात. कालांतराने झाडाची पाने व पोंगे पिवळे पडून वाळतात. मावा कीड विषाणुजन्य रोगाचा प्रसारही करते.
  •  तुडतुडे  या किडीचा प्रादुर्भाव पीक वाढीच्या अवस्थेत दिसून येतो. प्रौढ व पिले पानावर व पोंग्यात समूहाने राहून रस शोषतात. त्यामुळे पाने पिवळी पडून वाळतात. झाडाची वाढ खुंटते व उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. तुडतुडे चिकट द्रव पानावर सोडतात. चिकट झालेल्या पानावर काळी बुरशी वाढते.  मीजमाशी 

  •   प्रौढ माशी आकाराने अतिशय लहान, उदराकडील भाग नारंगी रंगाचा, दोन पारदर्शक पंख असतात. 
  •   पीक फुलावर असताना व कणसातील दाणे परिपक्वतेच्या अवस्थेत असताना मादी अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी फुलातील बीजांडकोश खाते, त्यामुळे कणसात दाणे भरत नाहीत. कणसे रिकामी राहतात. या किडीच्या अळीला पाय नसतात. 
  •   किडीचा जास्त प्रादुर्भाव असल्यास उत्पादनात ६० टक्क्यांपर्यंत घट येते.
  • लष्करी अळी 
  •   प्रौढ मादी पानांच्या देठांजवळ किंवा पानांवर किंवा जमिनीत ३० ते १५०  
  •   अंडी पुंजक्यामध्ये घालते. एक मादी पूर्ण आयुष्यात १००० पेक्षा जास्त अंडी घालू शकते. 
  •   या किडीचे पतंग करड्या रंगाचे, तर अळ्या काळसर रंगाच्या असतात. 
  •   जास्त पाऊस किंवा पावसामध्ये जास्त दिवस खंड येऊन पिकावर ताण पडल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. खादाड अळ्या अधाशासारखी ज्वारीची पाने खाऊन फक्त शिराच शिल्लक ठेवतात. दाणे भरत असलेल्या कणसातही या अळ्यांचा प्रादुर्भाव होतो.
  • एकात्मिक कीड व्यवस्थापन 

  •   शेतातील काडी कचरा, पाला पाचोळा, ज्वारी व अन्य पिकांचे शिल्लक राहिलेले अवशेष व बांधावरील तणे, पर्यायी खाद्य वनस्पती नष्ट कराव्यात. 
  •   पीक उगवणीनंतर १५ ते २० दिवसांनी विरळणी करावी. दोन झाडांमधील अंतर १५ ते २० सेंमी ठेवून विरळणी करावी. खोडमाशी किंवा कीडग्रस्त रोपे उपटून टाकावीत. 
  •   प्रति एकरी २० पक्षिथांबे उभारावेत. प्रति एकर २ प्रकाश सापळे लावावेत. 
  •   एकरी २ कामगंध सापळे कीड सर्वेक्षणासाठी पिकाच्या उंचीपेक्षा एक फूट अधिक उंचीवर लावावेत.
  •   रसशोषक किडींच्या व्यवस्थापनाकरीता पिवळे चिकट सापळे २५ ते ३० प्रति एकरी लावावेत. 
  •   ज्वारी पीक ४० ते ४५ दिवसांचे होईपर्यंत शेत तणविरहित ठेवावे. त्यासाठी २ ते ३ डवरणी कराव्यात. आणि आवश्यकतेनुसार निंदणी करावी. 
  •   किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास शेवटचा पर्याय म्हणून शिफारशीत रासायनिक कीडनाशकांचा सुरक्षित वापर करावा. फवारणीकरिता शक्यतोवर पाण्याचा सामू ६ ते ७ दरम्यान ठेवावा.
  •   ज्वारी पीक परिपक्व झाल्यानंतर कापणी व मळणी करावी. ज्वारी साठवणूक करतेवेळी दाण्यातील ओलावा १० ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त राहणार नाही, याची काळजी घ्यावी. यामुळे साठवणुकीतील किडींचा प्रादुर्भाव कमी ठेवण्यास मदत होईल.  
  • लेबल क्लेमयुक्त कीडनाशके (प्रमाण प्रति १० लिटर पाणी)
  • खोडकिडा  क्विनॉलफॉस (५ टक्के दाणेदार) १५ किलो प्रति हेक्टर
  • मीजमाशी   डायमिथोएट (३० टक्के ईसी) १६.५ ते ३३ मि.लि.  मॅलेथिऑन (५० टक्के ईसी) १० ते २० मि.लि.  क्विनॉलफॉस (१.५ टक्के डीपी) २६.६ किलो प्रति हेक्टरी
  • कणसावरील ढेकूण  क्विनॉलफॉस (१.५ टक्के डीपी) २५ किलो प्रति हेक्टरी 
  • खोडमाशी, कोळी  क्विनॉलफॉस (२५ टक्के ईसी) १५ ते ३० मि.लि.
  •  डॉ. प्रमोद मगर (विषय विशेषज्ञ - कीटकशास्त्र),   ७७५७०८१८५ (कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com