Vegetables Grafting : भाजीपाला रोप कलम तंत्र ठरतेय फायदेशीर

कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत मागील पाच वर्षांपासून उच्च डच तंत्रज्ञानावर आधारित संरक्षित शेतीमध्ये भाजीपाला लागवड पद्धती आणि भाजीपाला रोप कलमांचे उत्पादन आणि तंत्रज्ञान विस्तार केला जात आहे.
Vegetables Grafting
Vegetables GraftingAgrowon

यशवंत जगदाळे

कृषी विज्ञान केंद्र, बारामती (Krushi Vigyan Kendra, Baramati) येथे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत (Integrated Horticulture Development Mission) मागील पाच वर्षांपासून उच्च डच तंत्रज्ञानावर आधारित संरक्षित शेतीमध्ये भाजीपाला लागवड (Vegetables Sowing) पद्धती आणि भाजीपाला रोप कलमांचे उत्पादन आणि तंत्रज्ञान विस्तार केला जात आहे. त्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा दिसून आला आहे. या ठिकाणी उच्च गुणवत्तापूर्ण रोप निर्मितीसाठी नेदरलँडमधील तज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाते. या आधुनिक कलम तंत्रज्ञानामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ भरपूर प्रमाणात मिळते. तसेच पीक उत्पादनातही (Crop Production) वाढ दिसून आली आहे.

Vegetables Grafting
Indian Agriculture : आपल्याला तारणारी शेती पद्धती

१) चीन, युरोप, मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका, मध्य अमेरिका आणि आशियाई देशांमध्ये व्यावसायिक स्वरुपात भाजीपाला रोपांच्या निर्मितीसाठी कलम तंत्रज्ञान वापरले जाते. जपान व कोरिया या देशांमध्ये भाजीपाला रोपांच्या मुळावर जमिनीतून येणारे बुरशीजन्य रोग तसेच सूत्रकृमीच्या प्रादुर्भावापासून संरक्षणासाठी भाजीपाला कलम तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो.

२) या तंत्रज्ञानामध्ये सुरुवातीला गावठी किंवा जंगली रोपाची (रूटस्टॉक) निवड योग्य पद्धतीने केली जाते. तसेच भाजीपाला उत्पादकाच्या पसंतीचे संकरित वाण (सायन) कलमीकरणासाठी निवडले जाते.

३) रूटस्टॉक आणि सायन या दोघांची निवड झाली की, व्यापारी तत्वावर क्लेफ्ट कलम, टॉप इन्सर्शन कलम, भेट कलम आणि पाचर कलम या विविध कलम पद्धतींचा भाजीपाला पिकाची कलमी रोपे तयार करण्यामध्ये वापर केला जातो.

४) कृषी विज्ञान केंद्राच्या भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये मागील पाच वर्षांपासून वांगी, ढोबळी मिरची या पिकांमध्ये रोप निर्मितीसाठी कलम तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आत्तापर्यंत ५० शेतकऱ्यांच्या शेतावर भाजीपाला पिकाच्या कलमीकरण केलेल्या रोपांची लागवड करूनआद्यरेखा प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे या तंत्रज्ञानाचा चांगला प्रसार होत आहे. आत्तापर्यंत भाजीपाला गुणवत्ता केंद्राने वांगी, ढोबळी मिरची आणि टोमॅटो या पिकांची चार लाखांपेक्षा अधिक कलमी रोपे शेतकऱ्यांना पुरविली आहेत. या रोपांपासून शेतकऱ्यांना भाजीपाल्याचे चांगले उत्पादन मिळत आहे.

भाजीपाला रोप कलम तंत्रज्ञानाचा फायदा ः

१) मातीतून प्रादुर्भाव करणाऱ्या रोगांना ही रोपे प्रतिकारक्षम असतात.

२) कलम केलेले रोप सुत्रकृमींना बळी पडत नाही.

३) कलमी भाजीपाला रोपांमध्ये जैविक व अजैविक ताण सहन करण्याची क्षमता अधिक असते.

४) कलमी भाजीपाला रोपांमध्ये पांढऱ्या मुळांची भरपूर वाढ होत असल्यामुळे मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा अधिक होतो.

५) कलम तंत्रज्ञानामुळे भाजीपाला पिकासाठी खतांची मात्रा व पाणी कमी लागते.

६) कलम तंत्रज्ञानामुळे फळांचा आकार, उत्पादन व गुणवत्ता सुधारते.

शेतकऱ्यांच्या शेतीवर प्रात्यक्षिके ः

कलम तंत्रज्ञान प्रात्यक्षिक चाचणीचा चांगला सकारात्मक परिणाम पाहून ‘नाबार्ड'ने २०२२-२३ साठी ‘भाजीपाला पिकामध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे व भाजीपाला पिकांमध्ये कलम तंत्रज्ञान वापर (वांगी व ढोबळी मिरची)‘ हा प्रकल्प बारामती, पुरंदर व दौंड येथील १०० शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यास सुरवात केली आहे.

१) लागवडीनंतर फक्त १ ते २ टक्के रोपांची मर आढळून आली.

२) पांढऱ्या मुळांची वाढ जास्त झाल्यामुळे रोपे लवकर वाढीस लागतात. उत्पादन लवकर चालू झाले.

३) भाजीपाला पिकावर बुरशीजन्य रोगांचा फारच कमी प्रादुर्भाव आढळून आला आहे.

४) वांगी, ढोबळी मिरची उत्पादन ३० ते ३५ टक्यांनी वाढले.

५) पाण्याचा ताण असेल किंवा जास्त पाण्यामध्येही रोपांची वाढ चांगली होते.

६) रोपांची वाढ जोमदार असल्यामुळे एकरी रोपे २० ते २५ टक्के कमी लागतात.

७) पीक व्यवस्थापनात कीटकनाशक, बुरशीनाशक फवारणी खर्चात बचत झाली.

संपर्क ः यशवंत जगदाळे,९६२३३८४२८७

(प्रकल्प प्रमुख, भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बारामती,जि.पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com