हरितगृहातील गुलाबावरील फुलकिड्यांचे व्यवस्थापन

देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात आर्थिक मूल्य असलेले गुलाब हे महत्त्वाचे पीक आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यामध्ये हरितगृहातील संरक्षित गुलाब शेतीचा एकूण भारतीय फुलशेती उद्योगात मोठा वाटा आहे. दर्जेदार फुलांच्या उत्पादनासाठी कीड-रोग नियंत्रणाकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागते.
Rose
RoseAgrowon

अलीकडे गुलाबावरील विविध किडींपैकी फुलकिडे (थ्रीप्स) ही महत्त्वाची कीड ठरू लागली आहे. या रसशोषक किडीमुळे फुलांचे उत्पादन आणि दर्जावर विपरीत परिणाम होतो. पारंपरिक गुलाब शेतीसोबत हरितगृहातील संरक्षित शेतीमध्येही त्यांचा धोका वाढला आहे. ही कीड वनस्पतींच्या कोवळी पाने, फुलांच्या कळ्या, दांडे यांचे गंभीर नुकसान करते. परिणामी, जगभरातील फूल उत्पादकांना मोठा फटका बसतो.

फ्लॉवर थ्रीप्स

शास्त्रीय नाव ः फ्रँक्लिनिएला ऑक्सीडेंटलिस (पेरगांडे)

हंगामानुसार फुलकिडीचा प्रादुर्भाव :

फुलकिडींचा प्रादुर्भाव वर्षभर आढळतो. फुलकिडे वर्षभर नवीन कोवळ्या पानांचे व फुलांचे नुकसान करीत असतात. फुलकिड्यांची सर्वाधिक संख्या नोव्हेंबर-डिसेंबर आणि एप्रिल -मे महिन्यात आढळते. तापमान आणि आर्द्रतेचा परिणाम फुलकिडींच्या संख्येवर होतो. या महिन्यात कमाल तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअस, किमान तापमान १० ते १५ अंश सेल्सिअस तापमान आणि ६० ते ७० टक्के आर्द्रता असते. अशा कालावधीत फुलकिड्यांचे प्रमाण वाढते.

वर्णन आणि जीवन चक्र :

फुलकिड्याचे प्रौढ सामान्यतः एक ते दोन मिमी लांब असून, आकाराने लहान असतात. अंडी ते प्रौढ जीवन अवस्था पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन आठवडे लागतात. तथापि, अंड्यापासून प्रौढ होईपर्यंतचा काळ तापमानावर अवलंबून असतो. तापमान २६ ते २९ अंश सेल्सिअस (७९ आणि ८४ अंश फॅरनहिट) दरम्यान असताना जीवन चक्र सात ते १३ दिवसांत पूर्ण होऊ शकते. मादी ४५ दिवस जगते. आयुष्यकाळामध्ये १५० ते ३०० अंडी घालते.

- अंडी अवस्था : अंडी दोन ते साडेचार दिवसांत उबतात.

- अळी अवस्था : यात दोन टप्पे असतात.

पहिली अळी अवस्था : लहान आणि पांढरी असते. एक-दोन दिवसांत मोठी होते.

दुसरी अळी अवस्था : ही अळी कोवळी पाने व फुलांचे रस शोषून घेतात. ते विकसित होत असलेल्या पर्णसंभाराखाली किंवा फुलांच्या पाकळ्या जोडणीच्या ठिकाणी आढळतात.

- कोष अवस्था : कोषावस्थेमध्येही विकासाचे दोन टप्पे असतात.

पहिला टप्पा : पूर्व कोषावस्था (प्रीप्युपा अवस्था)

दुसरा टप्पा ः कोषावस्था (प्युपा अवस्था)

काही प्रजाती मातीत सुप्त अवस्थेत जातात, तर काही प्रजाती पानांवरच सुप्त अवस्थेत जातात. पूर्व कोषावस्थेचा कालावधी ८-१० दिवसांचा असतो आणि सुप्त कालावधी २-४ दिवस असतो. पाक जीवन चक्र सुमारे १२ ते २० दिवसांत पूर्ण होते.

- प्रौढ अवस्था ः साधारण सहा दिवसांनी सुप्त अवस्थेतून प्रौढ थ्रीप्स बाहेर पडतो. प्रौढांना पंख असले तरी ते नीट उडता येत नाही. हरितगृहातील पंखे आणि बाह्य वायूझोतांबरोबर संपूर्ण हरितगृहामध्ये पसरतात. प्रौढ फुलकिडे काही विशिष्ट रंग (पिवळा, निळा आणि पांढरा) आणि वनस्पतींच्या हालचालींकडे आकर्षित होतात.

नुकसानीचा प्रकार :

अप्सरा आणि प्रौढ या दोन्ही हानिकारक अवस्था आहेत. कोवळी पाने आणि फुलांच्या पृष्ठभागावर इजा करून त्यातील स्रवणारा रस शोषतात. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये कोवळ्या पानांवर व फुलांवर लाल, तपकिरी डाग किंवा रेषा दिसतात. पुढे प्रभावित कोवळी पाने वरच्या दिशेने वळतात. जुनी झाल्यावर वेडीवाकडी होतात. फुलकळीच्या सुरुवातीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास कळ्यावर डाग पडतात. विशेषत: बाह्य सेपल्स पाकळ्या विकृत होतात. कळ्या अर्धवट

उघडतात किंवा वेळेपूर्वी बंद होतात. फुलांच्या पाकळ्यांवर चांदीसारख्या पांढऱ्या किंवा तपकिरी रेषा पडून फुले खराब होतात. प्रभावित फुलांच्या पाकळ्या उलगडून पाहिल्यास फुलकिड्यांच्या विविध अवस्था मोठ्या संख्येने दिसतात.

सर्वेक्षण आणि निरीक्षण ः

-थ्रीप्सचा प्रादुर्भाव वेळीच लक्षात येण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी नियमित सर्वेक्षण केले पाहिजे. त्यासाठी हरितगृहामध्ये झाडाजवळ प्रति १००० वर्गमीटरमध्ये १०-१५ पिवळे/ निळे चिकट सापळे लावावेत.

- प्रति चिकट सापळा पाचपेक्षा अधिक फूलकिडे आठवड्याला आढळल्यास फवारणीचे नियोजन करावे.

-तसेच आठवड्यातून १-२ वेळा प्रत्यक्ष पाहणीही करत राहावी. त्यासाठी फुले स्वच्छ पांढऱ्या कागदावर हलक्या हाताने झटकावी. कागदावर ते स्पष्ट दिसून येतात.

-फुले असलेल्या गुलाब झाडांकडे थ्रीप्स लवकर आकर्षित होतात. उमललेली फुले वेळीच पिंच करून घ्यावी.(उदा. उमललेली पिवळी व पांढरी फुले)

यामुळे वाढतो फुलकिडीचा प्रादुर्भाव ः

-ज्या वनस्पतीमध्ये कर्बोदके, प्रथिने, स्टेरॉल्स आणि जीवनसत्त्वे अशा पोषक तत्त्वे अधिक असतात. त्यावर फुलकिडीच्या वाढीचा दर अधिक असतो. नवीन फुलकिड्यामुळे पुनरुत्पादन क्षमता वाढते.

- वनस्पतीमध्ये अमिनो ॲसिड आणि प्रथिने मुबलक असल्यासही फुलकिडे वाढीस पोषक वातावरण तयार होते. अशा झाडावर फुलकिडीची मादी अधिक अंडी घालते.

- वनस्पतीमध्ये नत्राचे प्रमाण अधिक असल्यास त्यावर फुलकिडींचा अधिक हल्ला होतो.

- मादी सामान्यत: पानांच्या पृष्ठभागाच्या खाली किंवा फुलांच्या पाकळ्यांमध्ये आतील भागात अंडी घालते. स्पर्शजन्य कीटकनाशकांची फवारणी पोहोचू शकत नाही. यामुळे फुलकिडींची संख्या वाढते.

मशागतीय नियंत्रण :

रोपे आणून लावण्यापूर्वी हरितगृह व आजूबाजूच्या परिसरातील तणे काढून घेतल्याची खात्री करावी. पुढे नियमित अंतराने तणनियंत्रण करून साफसफाई करावी.

थ्रीप्सच्या प्रादुर्भावाचे स्रोत नष्ट करण्यासाठी हरितगृहात स्वच्छता राखावी.

जैविक नियंत्रण :

-जैविक नियंत्रणासाठी भक्षक फायटोसाइड माइट्स, ॲम्बलिसीयस कुकुमेरिस आणि ए. स्विस्क हे कोळी १ ते ५ प्रति रोप प्रमाणात उपयोगी ठरतात.

-लेकॅनिसिलियम लेकॅनी किंवा बिव्हेरिया बॅसियाना या जैविक कीडनाशकाची ५ मिलि किंवा ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. विशेषत: २० ते २५ अंश सेल्सिअस तापमान आणि ८० टक्क्यांपेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता अशा थंड आणि दमट हवामानात जैविक कीडनाशकाच्या फवारणीची कार्यक्षमता वाढते.

-किडींचे प्रमाण आटोक्यात ठेवण्यासाठी वनस्पतिजन्य कीडनाशके उपयोगी ठरतात. उदा. निंबोळी फॉर्म्यूलेशन तीव्रतेनुसार, १ टक्का प्रमाणात २.५ मिलि आणि ५ टक्के प्रमाणात ०.५ मिलि प्रति लिटर पाणी. एकरी ६०० ते ८०० लिटर द्रावण वापरावे.

रासायनिक नियंत्रण :

किडीच्या निरीक्षणातून प्रमाण कमी असताना नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न करावेत. थ्रीप्सचे एका फवारणीद्वारे संपूर्ण नियंत्रण होत नाही.

थ्रीप्स आटोक्यात येईपर्यंत पाच दिवसाच्या अंतराने किमान दोन वेळा फवारणी करावी. थ्रीप्स आटोक्यात आल्यानंतर सात ते दहा दिवसांच्या अंतराने पुढील फवारणी करावी. फुलकिड्यांमध्ये कीटकनाशकांप्रति प्रतिकारकता विकसित होऊ नये, यासाठी एकदा वापरलेले कीटकनाशक पुढील किमान चार आठवड्यांपर्यंत वापरू नये. कीटकनाशकांचा आलटून-पालटून वापर करणे फायदेशीर ठरते.

फवारणीची कार्यक्षमता जोखण्यासाठी चिकटसापळ्याचे दर आठवड्याला निरीक्षण करत राहावे. त्यात चिकटणाऱ्या फुलकिड्यांची संख्या कमी होत असल्यास आपली फवारणी उपयोगी ठरली, हे लक्षात येते.

दशरथ पुजारी, ९८२३१७७८४४ / ९८८१०९७८४४

(लेखक निर्यातक्षम फुलशेती उद्योगातील २० वर्षांपेक्षा अधिक अनुभवी व कृषी पदवीधर आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com