Kandi Kolsa : पऱ्हाट्यापासून कांडी कोळसा बनविण्याचे तंत्र

उपलब्ध होणाऱ्या पऱ्हाट्याच्या साह्याने कांडी कोळसा तयार करण्याची प्रक्रिया साधारण एक ते दोन महिन्यांच्या आत
 Kandi Kolsa
Kandi Kolsa Agrowon
Published on
Updated on

राहुल साळवे, डॉ. पुरुषोत्तम नेहारकर, डॉ. पुरुषोत्तम झंवर

शेतीमध्ये कापूस वेचणी झाल्यावर शिल्लक राहणाऱ्या पऱ्हाट्यांचे काय करायचे हा मोठा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर असतो. बहुतांश शेतकरी पऱ्हाट्याचा वापर इंधन म्हणून करतात किंवा शेतातच जाळून टाकतात. इंधन किंवा कोणत्याही कारणासाठी शेताजवळ पऱ्हाट्या साठवल्यास, त्यातील कीड व रोगाचे अवशेष पुढील हंगामातील पिकामध्ये प्रादुर्भाव करू शकतात. साठवणीमधून होणाऱ्या किडी-रोगाच्या प्रादुर्भावाची समस्या दूर करण्यासाठी पऱ्हाट्यांपासून कांडीकोळसा तयार करता येतो. एका एकरामध्ये सुमारे सहा क्विंटल पऱ्हाट्या मिळतात. उपलब्ध होणाऱ्या पऱ्हाट्याच्या साह्याने कांडी कोळसा तयार करण्याची प्रक्रिया साधारण एक ते दोन महिन्यांच्या आत संपवावी. या यंत्राच्या साह्याने अन्य पीक अवशेषांच्या साह्याने कांडी कोळसा तयार करण्याचा उद्योग वर्षभर चालवणे शक्य आहे.

 Kandi Kolsa
Coal : अवैध कोळसा भट्टीवर कारवाई

कांडीकोळसा प्रक्रिया तंत्रज्ञान

भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेतील तज्ज्ञांनी शेतातील काडीकचरा वापरून कांडी कोळसा तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यात कोळसा निर्मितीची भट्टी, कांडी कोळसा बनविण्याचे यंत्र आणि त्यांच्या व्यवस्थित ज्वलनासाठी चूल तयार केली आहे.

कोळसा तयार करण्याची भट्टी

ही एक लोखंडी पिंपासारखी भट्टी असून, तिला मधोमध एक झडप असते. यात पऱ्हाट्या बारीक करून आतमध्ये टाकतात. निम्म्यापेक्षा जास्त भरल्यावर तो पेटवून देऊन झडप बंद करतात. त्यामुळे भट्टीत जितका ऑक्‍सिजन आहे, तोपर्यंत पऱ्हाट्या जळून कोळसा तयार होतो. म्हणजेच ऑक्‍सिजनचा अपुरा पुरवठा केला तर कोळसा तयार होतो. भट्टी पेटवल्यानंतर पाच तासांनी झडप उघडून कोळसा बाहेर काढावा.

 Kandi Kolsa
आरोग्यदायी गूळ बनविण्याचे आधुनिक तंत्र

कांडी कोळसा तयार करण्याचे यंत्र

भट्टीत तयार झालेल्या कोळसा शेणामध्ये कालवून हे मिश्रण यंत्रामध्ये टाकतात. हे यंत्र स्क्रू प्रेस तंत्रज्ञानावर चालते. कोळसा व शेण एकत्र केलेले मिश्रण स्क्रूच्या साह्याने यंत्रामध्ये पुढे ढकलले जाते. यंत्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या गोलाकार नळीतून प्रेस होऊन कांडी कोळसा बाहेर येतो.

चूल

तयार झालेला कांडी कोळसा साध्या पारंपरिक चुलीमध्येही जाळता येतो. मात्र इंधनाची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने विशिष्ट चूल तयार करण्यात आली आहे. या चुलीमध्ये दोन जाळ्या बसवलेल्या असून, त्या जाळ्यांमध्ये हा कोळसा भरतात. या चुलीखाली कागद पेटवून ठेवतात. त्यामुळे कोळसा पेट घेतो. कोळसा पेटल्यावर लाल निळसर रंगाची ज्योत मिळते. चार माणसांचा स्वयंपाक बनविण्यासाठी सरासरी ४०० ते ५०० ग्रॅम कोळसा लागतो.

फायदे

पऱ्हाट्यांची योग्यरीत्या विल्हेवाट लावता येते.

शेतातच कापसाच्या पऱ्हाट्या जाळल्याने होणारे वायुप्रदूषण कमी करता येते.

स्वस्त, सोपे आणि पर्यावरणासाठी हानिकारक नसलेले जैविक इंधन ग्रामीण भागात सहज तयार करता येते.

ग्रामीण भागात रोजगाराची संधी.

कापूस विक्रीपश्‍चात घ्यावयाची काळजी

विक्रीनंतर कारखान्यामध्ये येणाऱ्या कापसाची स्वच्छता करण्यासाठी पक्के प्लॅटफॉर्म तयार केलेले असावेत. येथे जिनिंगपूर्व सफाई विशेषतः वेचणी किंवा साठवणुकीदरम्यान आलेली अशुद्धता कमी केली जाते. यामुळे जिनची तुटफुट सुद्धा कमी होते. जिनिंग मशिनरीपर्यंत कापसाची वाहतूक करतानाही त्यामध्ये तंबाखू, गुटखा यांच्या पुड्या, केस गुंतवळ, कपड्याचे तुकडे इ. ची कापसामध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. जिनिंग मशिनरी ते प्रेसिंग युनिटपर्यंत कापसाची वाहतूक करताना रुईने भरलेले पोते ओढत नेऊ नये. त्याऐवजी हातगाडीचा वापर करावा. गाठींचे पॅकिंग करण्यापूर्वी कापूस वेगवेगळा करून नंतर भरावा. गाठी चांगल्या दाबून नंतर लोखंडी पट्टीने बांधून घ्यावे. गाठ बांधताना ती पूर्णपणे कपड्याने झाकलेली असावी. गाठीवर नाव किंवा नंबर टाकताना शाईचा रुईसोबत संपर्क येणार नाही याची दक्षता घ्यावी. कापसात आलेल्या ओलाव्यामुळे कापसाच्या प्रतीवर परिणाम दिसून येतो. ही बाब लक्षात ठेवावी. किडीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या किडक्या कापसाचे प्रमाण ठरवून प्रतवारी करणे आवश्यक ठरते. अन्यथा, सर्व कापसाची गुणवत्ता कमी होते.

- राहुल साळवे, (पीएच.डी. स्कॉलर),

९१६८४९७८८३

(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com