संवर्धित शेतीची काटेरी वाट

ब्राझील सरकारने विना नांगरणी शेती करिता पेरणी करणारी यंत्रे तयार करण्यासाठी देशातील सर्व कारखानदारांची एकत्र बैठक घेतली. या कारखानदारांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत संवर्धित शेती तंत्रज्ञानाला उपयुक्त विविध आकारांतील यंत्रे तयार केली. याचाच परिणाम म्हणून ब्राझीलमधील ८० टक्क्यांपेक्षा जास्त शेती विना नांगरणी पद्धतीने केली जाते. आपल्यालाही या तंत्रज्ञानाचा अवलंब आता केला पाहिजे.
Sustainable Agriculture
Sustainable Agriculture Agrowon

साधारणपणे २००५ मध्ये माझ्या शेतीत उसानंतर भाताचे पीक घेत असता वरंब्यातील जमिनीखालील उसाचे अवशेष जागेलाच कुजवून त्याचे सेंद्रिय खत जमिनीला मिळवून देण्याचा प्रयोग प्रथम केला. हे खोडके जागेला कुजवायचे कसे यावरील चिंतनातून माझ्या शेतीत विना नांगरणी शेतीचा जन्म झाला. जमिनीखालील अवशेष कुजू दिल्याने जागेला सेंद्रिय खत तयार झाले, त्यामुळे एकाच वर्षात जमिनीची १५ ते २० वर्षांच्या वापराने घटलेली सुपीकता आणि उत्पादकता भरून निघाली, उत्पादकता मूळ पदावर आली. १५ ते २० वर्षे ऊस आणि भाताचे भरपूर उत्पादन घेऊन जी जमीन खराब झाली होती, ती एकाच वर्षात परत १५ ते २० वर्षांपूर्वीप्रमाणे पिकू लागली. ही बाब मी अनेक वेळा वाचकांपुढे आणली आहे.

पुढे अशी बातमी कानावर आली, की २००८ मध्ये नवी दिल्ली येथे एक जागतिक पातळीवरची परिषद भरणार आहे. सहा दिवसांच्या परिषदेमध्ये १०० पेक्षा जास्त देशातील शास्त्रज्ञ ‘विना नांगरणीची शेती’ या विषयासंबंधी आपले संशोधन प्रबंध वाचणार आहेत. मला तेथे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे नवी दिल्लीमध्ये कृषी खात्यात उच्च पदावर असलेल्या मित्राकडून या परिषदेमधील संशोधन प्रबंध मी मिळविले. जवळपास ११०० मोठ्या आकारातील पानांचे हे साहित्य, स्मरणिका, मुख्य शोधनिबंध व शिल्लक शोध निबंधाचा सारांश उपलब्ध झाले. माझा अभ्यासाचा विषय हा होता, की आपण संवर्धित शेती का स्वीकारली? जगभरातील शास्त्रज्ञांनी का स्वीकारली? यामध्ये कोठे काही समान विचारांचा धागा जुळतो आहे का? पुढे या विषयावर माझे ‘नांगरणीशिवाय शेती’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या सर्व जुन्या आठवणींना मुद्दाम उजाळा दिला आहे.

या परिषदेची ‘आयएफएडी‘ ही जागतिक पातळीवरील संस्था मुख्य प्रायोजक होती. त्यांचे बोधवाक्य आहे, ‘जगभरातील ग्रामीण गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करणे’. यासारखे थोडेफार काम आपण करू शकलो तर खूप झाले, या उद्देशाने पुढील १५ वर्षांची वाटचाल सुरू आहे.

संवर्धित शेतीच्या वाटचालीचा अभ्यास ः

संवर्धित शेतीचे तंत्र शेतकऱ्यांना थेट शेतात मदत करू शकते. शेतकऱ्यांपुढील अनेक समस्यांचे निराकरण आपोआप होते. हे प्रत्यक्ष काम करू लागल्याशिवाय लक्षात येत नाही. मी गेली १२ वर्षे अनेक मार्गाने तंत्र शेतकऱ्यांपुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु एकूण शेतीचा व्याप पाहता या पद्धतीकडे वळणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. लगेच खूप मोठे परिवर्तन व्हावे, अशी अपेक्षा धरणेही चुकीचे आहे. जगभरातील संवर्धित शेतीच्या वाटचालीचा अभ्यास केल्यास यापेक्षा फारसा वेगळा अनुभव नाही. याला अपवाद फक्त दक्षिण अमेरिका खंडातील चार देश.

ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे व पॅराग्वे या चार देशात ८० टक्क्यांपेक्षा जास्त शेती संवर्धित पद्धतीने केली जाते. ब्राझील या देशाचे राष्‍ट्रीय धोरण आपल्याला अभ्यासण्यासारखे आहे. या देशात तेलाच्या खाणी अजिबात नाहीत. संपूर्ण देशाला १०० टक्क्यांपेक्षा पेट्रोलियम तेल आयात करावे लागते. येथील सरकारचे धोरण असे आहे, की कमीत कमी पेट्रोलियम, इंधनाचा वापर झाला पाहिजे. त्यांचे मुख्य पीक ऊस आहे. उसापासून इथेनॉल आणि साखर बनविले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील साखरेच्या दरानुसार किती टक्के साखर आणि इथेनॉल यांचे धोरण राष्ट्रीय पातळीवर ठरते. हा देशात सर्वांत जास्त साखर निर्यात करणारा आहे. परंतु प्रसंगी मोठ्या प्रमाणावर इथेनॉलही निर्यात केले जाते. भारतात गेले १५ ते २० वर्षे

सातत्याने इथेनॉल धोरणात प्रचंड धरसोड चालू आहे. यातून सरकारला जास्तीत जास्त पेट्रोलियम आयातीमध्ये रस आहे असे दिसते. यावर यापेक्षा जास्त खोलात न जाणे मी पसंत करतो.

आपल्याला जमीन सुपीकतेसाठी ब्राझीलची वाटचाल अभ्यासण्यासारखी आहे. ब्राझीलमध्ये संवर्धित शेतीचे बीजारोपण चिली देशातील शास्त्रज्ञाने केले. परंतु चिली देशाने मात्र संवर्धित शेतीकडे अजिबात लक्ष दिले नाही. हा विरोधाभास नोंद करण्यासारखा आहे. ब्राझील सरकारने विना नांगरणी शेती करिता पेरणी करणारी यंत्रे तयार करण्यासाठी देशातील सर्व कारखानदारांची एकत्र बैठक घेतली. कारखान्यांना लहानापासून मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत सर्वांसाठी विना नांगरणीने पेरणी करणारी यंत्रे तयार करण्याचे आवाहन केले. मोठ्या शेतकऱ्यासाठी मोठी यंत्रे, मध्यम शेतकऱ्यासाठी मध्यम ट्रॅक्टरवर चालणारी यंत्रे आणि त्यापेक्षा लहान शेतकऱ्यासाठी मानवी हाताने चालविण्याची यंत्रे विकसित करण्यासाठी निधीची तरतूद केली. कारखानदारांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन विविध यंत्रे तयार करून दिली. याचाच परिणाम म्हणजे या देशातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त शेती विना नांगरणी पद्धतीने केली जाते.

इंधनाची बचत महत्त्वाची ः

मी एक मध्यम आकाराचा शेतकरी, शून्य मशागत तंत्राचा अवलंब केल्याने दरवर्षी किमान १२५ ते १५० लिटर डिझेलची बचत करतो. नेरळचे भात उत्पादक शेतकरी चंद्रशेखर भडसावळे दरवर्षी ५०० लिटर डिझेल वाचवितात. एखादे गाव, तालुका, जिल्ह्याने हा उपक्रम राबविला तर किती डिझेलचे ज्वलन थांबेल याचे गणित करणे अवघड आहे. ब्राझीलच्या संवर्धित शेती तंत्रज्ञान उपक्रमाची नोंद जागतिक अन्न व कृषी संघटनेने घेतली आहे. गरजेप्रमाणे ही यंत्रे आफ्रिकेतील गरीब राष्ट्रातील शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून दिली. आफ्रिकेतील गरीब, अविकसित राष्ट्रांमध्ये संवर्धित शेतीच्या प्रसाराला चालना मिळाली. जागतिक अन्न व कृषी संघटनेमध्ये संवर्धित शेतीसंबंधी स्वतंत्र विभाग असून त्याचे मुख्य कार्यालय रोम (इटली) येथे आहे. कोणत्याही परिस्थितीत देशात कमीत कमी डिझेलचा वापर झाला पाहिजे, हे प्रथम प्राधान्याचे राष्ट्रीय धोरण असले पाहिजे.

भारतातील संवर्धित शेती ः

पंजाब, हरियाना आणि उत्तर प्रदेशचा हिमालयाकडील भागामध्ये भात, गहू लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. येथे पाऊस उशिरा पोहोचतो. त्यांच्या खरीप भाताच्या पेरण्या जुलैमध्ये होतात, कापणी ऑक्टोबरअखेर ते नोव्हेंबरमध्ये होते. त्यानंतर मशागत करून गहू पेरणीसाठी डिसेंबर महिना उजाडतो. यामुळे गव्हाला थंडीचा कालावधी कमी मिळतो. लवकर पेरणी झाल्यास उत्पादन वाढते हे सिद्ध झाल्यानंतर या भागात संवर्धित शेतीचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. सपाट जमीन, मोठ्या आकाराचे क्षेत्र, चांगल्या जमिनीमुळे विना नांगरणी तंत्र तेथे यशस्वीरीत्या स्वीकारले गेले. या यशस्वितेमुळे चौथ्या जागतिक संवर्धित शेतीसाठी परिषदेचे यजमानपद भारताला मिळाले. या परिषदेला आपले काही शास्त्रज्ञ उपस्थित होते. त्यांची प्रतिक्रिया अशी आहे, की महाराष्ट्रात अशी परिस्थिती नाही. खरीप कापणी ते रब्बी पेरणी यामध्ये आरामात ३० ते ४० दिवसांचा कालावधी मिळतो. मग आपण चांगली पूर्वमशागत करून रब्बीची पेरणी करावी. कार्यक्रमातील एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाने आपले विचार मांडत असताना सांगितले, की संवर्धित शेती ही काळाची गरज आहे. परंतु आमच्याकडील जमिनी इतक्या कठीण आहेत की मशागत केल्याशिवाय पेरणी करता येणार नाही. महाराष्ट्रातील शेतकरी लहान आहे, त्याला विना नांगरता पेरणी करणारी महाग यंत्रे खरेदी करणे शक्य नाही. एक डास झटकल्यासारखे आपल्या शास्त्रज्ञांनी या तंत्राला बाजूला सारून टाकले. आता यावर निधी, मनुष्यबळाचा अभाव ही इतरही कारणे पुढे येऊ शकतात.

मी मुद्दाम ब्राझीलचे उदाहरण आपल्यासमोर ठेवले आहे. मुख्य शोध निबंधात बांगलादेशसाठी पॉवर टीलरवर चालणारी यंत्रे ऑस्ट्रेलियातील कारखानदारांनी विकसित करून दिल्याचा उल्लेख आहे. बांगलादेशात पॉवर टिलरकडून मोठ्या प्रमाणावर संवर्धित शेती केली जात असल्याचे संदर्भ आहेत. संवर्धित शेतीवर काम करायचे असल्यास विना नांगरणीच्या पेरणी यंत्राशिवायही आपण आपल्या परिस्थितीला तंत्रे विकसित करणे आता काळाची गरज आहे.

संपर्क ः प्र. र. चिपळूणकर, ८२७५४५००८८ (लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com