
नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पक बुद्धीने विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कष्ट व मजूरबळ कमी करणारा रोबोट (Robot) विकसित केला आहे. रसायन फवारणी (Chemical Spraying) करण्याबरोबर क्रेट वाहून नेणे व बागेतील गवत काढणी अशा बहुउद्देशीय कामांसाठी (Multipurpose Robot) त्याचा वापर करता येतो असा संबंधित विद्यार्थ्यांचा दावा आहे.
का ळानुरूप शेतीतील तंत्रज्ञानही वेगाने बदलत आहे. ड्रोन, रोबोट, डिजिटल अशी विविध तंत्रज्ञाने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होत आहेत. या क्षेत्रातील नवी पिढीही आपल्या बुद्धिकौशल्याचा वापर करून विविध तंत्रज्ञान विकसित करण्यात गर्क आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचालित स्व. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालय कार्यरत आहे. येथील विद्यार्थी नामदेव पवार, अमोल ठाकरे, अमित कोतवाल आणि जगदीश गांगुर्डे या विद्यार्थ्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेतल्या. त्यादृष्टीने बहुउद्देशीय रोबोटची निर्मिती केली आहे. यात रसायने फवारणी, शेतमाल वाहतूक व तणनियंत्रण अशी तीन कामे शक्य होतात.
संशोधनाची दिशा
संशोधकांपैकी नामदेव पवार या विद्यार्थ्याने यंदाच ‘बीई’ची पदवी घेतली असून, तो मध्य प्रदेशातील एका कंपनीत नोकरीत रुजू झाला आहे. आपल्या प्रयोगांबाबत व त्याच्या उद्देशांबाबत तो म्हणाला, की अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षांपासूनच आम्ही रोबोट विकसित करण्यावर काम करीत होतो. फवारणीच्या अनुषंगाने बोलायचे तर पाठीवरच्या पंपाच्या वापरात श्रम अधिक व अंगावर द्रावण पडण्याचा धोका असतो. अल्पभूधारक शेतकऱ्यांना महागडी फवारणी यंत्रे घेणे शक्य नसते. अशी यंत्रे ट्रॅक्टरचलित असतात. त्यांची किंमत लाखांच्या घरात असते. आमचा रोबोट हा बॅटरीचलित असल्याने इंधनावरील खर्चात बचत करतो. प्रदूषण कमी करू शकतो. द्राक्ष किंवा डाळिंब बागेत सुरक्षित अंतरावर राहून फवारणी करणे यातून शक्य होणार आहे. नामदेव म्हणाला, की आम्हा संशोधक मित्रांपैकी द्राक्ष बाग असलेल्या मित्राकडे यंत्राच्या चाचण्या घेतल्या आहेत. बागायतदारांशी संवाद साधून, त्यांच्या समस्या लक्षात घेऊन त्याची निर्मिती केली आहे.
संशोधनात योगदान
द्राक्ष व डाळिंब उत्पादकांकडून विद्यार्थ्यांच्या या कार्याचे कौतुक झाले आहे. या संशोधन- निर्मिती प्रक्रियेत नामदेवसह जगदीश गांगुर्डे, अमित कोतवाल अमोल ठाकरे या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. त्यांना प्राध्यापक एस. पी. इंगळे यांनी मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेशकुमार लोढा, सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी, सहमानद सचिव झुंबरलाल भंडारी, व सुनीलकुमार चोपडा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे, उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी व यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. डी. संचेती आदींनी या संशोधनाला दाद दिली आहे.
रोबोटचा तांत्रिक तपशील
रोबोट अर्डीनो (Arduino) या तंत्रप्रणालीवर कार्य
‘कॉम्प्युटर ट्रान्स्मीटर रिमोट कंट्रोल’चा वापर
अल्युमिनिअम पत्र्यांची पेटीसारखी रचना. मधल्या भागात फवारणी टाकी किंवा क्रेट ठेवता येतात.
पेटीवर टी आकाराची दांडी. आडव्या दांडीला दोन्ही बाजूंना नोझल्स. मध्ये मोटर. उभी दांडी झाडाच्या उंचीनुसार खालीवर करणे शक्य. आडव्या दांडीला योग्य ॲगल दिल्याने फळझाडाचा आकार पाहून फवारणीचे कव्हरेज मिळावे. (कमाल पाच फूट व किमान तीन फूट अंतर यामध्ये उंची निश्चित)
चार चाके. ती फिरण्यासाठी दोन गिअर मोटर्स व चाके फिरणे व वळण घेण्यासाठी ‘फोर व्हील ड्राइव्ह’ पद्धतीचा वापर. चाकांचा परीघ १२ इंच.
मोटर्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या ‘चेन ड्राइव्ह’वर कामकाज
फवारणी द्रावण संपल्यानंतर (Level indication) पूर्वसूचना देण्यासाठी ‘फ्लोट सेन्सर’.
बारा व्होल्ट क्षमतेच्या दोन बॅटरीज व त्यावर चालणार पंप.
‘रिमोट सेन्सिंग रेंज’ ५०० मी. असल्याने बांधावर थांबून वापरणे शक्य.
बॅटरी एकदा चार्ज केल्यास अर्धा तासात
१० ते १२ गुंठे क्षेत्रावर फवारणी. फवारणी
द्रावण ठेवण्यासाठी ६० लिटर टाकीचा
वापर.
यंत्रासाठी आलेला खर्च- ४० हजार रु.
वापरकर्त्याने रिमोटला सूचना (कमांड) दिल्यानंतर मायक्रोकंट्रोलर पुढील कार्य सूचित करतो.
यंत्राच्या पुढील भागास तण कापणीचे पाते जोडले आहे. जमिनीच्या प्रकारानुसार व गरजेनुसार जमिनीपासून हवे ते अंतर व उंची ठेवता येते.
चालवण्यासाठी कुशल व्यक्तीच हवी असे नाही. मजुरीचा खर्च कमी. श्रम, खर्च व वेळेचीही बचत
नोझलमध्ये बदल केल्यास कांदा पिकासाठीही फवारणी शक्य.
यंत्राचे वजन ३६ किलो. फवारणी झाल्यानंतर बांध किंवा बोदालगतचे भाग कडक होण्याची शक्यता कमी.
शासकीय किंवा सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण फवारण्यांसाठीही उपयुक्त.
शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असल्याने शेतीच्या विविध प्रश्नांची मला जाणीव आहे. दरवर्षी पिकांवर फवारणी करण्यासाठी लागणारे यांत्रिकीकरण महाग होत आहे. इंधन खर्च, मजूरटंचाई हे प्रश्न देखील आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊनच आम्ही बहुपयोगी रोबोट विकसित केला आहे. पुढील काळात सौरऊर्जेचा वापर करून यंत्राची कार्यक्षमता वाढवणे, रिमोटच्या ऐवजी मोबाईल ॲपचा वापर या सुधारणा करण्याचा विचार आहे.
- नामदेव पवार,
संशोधक विद्यार्थी ७७०९०७४८७५
आधी फवारणीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्राचा वापर करतो. एकरी २०० ते ३०० लिटर पाणी लागते.या यंत्राच्या वापरातून पाण्याचे प्रमाण कमी होते. शरीरावर होणाऱ्या कीटकनाशकांच्या घातक परिणामांपासून बचाव होऊ शकतो. डिझेलवरील खर्च तसेच फवारणीसाठीचा वेळ व खर्च यात बचत झाली.
- दत्ता कोतवाल, चांदवड, जि. नाशिक ९१६८५३३०२३
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.