Bio Fuel Production
Bio Fuel ProductionAgrowon

Bio Fuel Production : जैव इंधन निर्मितीतून स्वावलंबी शेतकरी, आत्मनिर्भर भारत

सध्या देश ८० टक्के तेल व इंधनासाठी परावलंबी आहे. दर वर्षी देशाला १० लाख कोटी रुपयांचे परकीय चलन केवळ तेल आयातीवर खर्च करावे लागते. देशाचे सर्वाधिक परकीय चलन इंधन व खत आयातीवर खर्च होते. १०० टक्के आत्मनिर्भर होण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा (RENEWABLE ENERGY), जैव इंधन (BIOFUEL) आणि सेंद्रिय खते या तीन प्रमुख गोष्टींवर प्रामुख्याने भर द्यावा लागेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या तिन्ही गोष्टींचे उत्पादन शेतीतून होऊ शकते. म्हणजेच भारताच्या संपूर्ण आत्मनिर्भरतेचे स्वप्न हे भारतीय शेतकऱ्यांच्या हाती असून, शेतकरीही त्यातून सर्वार्थाने आत्मनिर्भर होऊ शकतो.

आजपासून सुमारे २२ वर्षांपूर्वी म्हणजे २००५ मध्ये एका साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या उद्‌घाटन प्रसंगी मी आपले भारतीय शेतकरी डॉलर पिकवतील आणि अन्नदात्यासोबतच भविष्यातील ऊर्जादाताही (Power Generation) बनतील असे भाकीत केले होते. त्या वेळी सर्वांचे चेहरे नक्कीच प्रश्‍नांकित झाले होते. मात्र आता सर्वांनाच त्याबाबत केवळ खात्रीच वाटते असे नाही, तर या वर्षी भारतीय शेतकऱ्यांनी तयार केलेल्या जैवइंधनामुळे (Bio Fuel) भारताचे तेल आयातीसाठी (Crud Oil Import) खर्च होणारे सुमारे ४० हजार कोटी रुपये किमतीचे परकीय चलन अर्थातच डॉलर वाचले आहेत. सोबतच २७ हजार टन कार्बन उत्सर्जनही (Carbon Emissions) कमी झाले. तसेच पेट्रोलमध्ये १० टक्के प्रमाणात इथेनॉल मिसळल्यामुळे (Ethanol Blending) तितक्या प्रमाणात स्वावलंबी झाला. त्याबद्दल पंतप्रधानांनी या इथेनॉल उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांचे अभिनंदन केले. आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नपूर्तीचे हे पहिले पाऊल आहे.

Bio Fuel Production
Cotton Market: यंदा कापसाची उत्पादकता वाढल्याचा अजब दावा

जैव इंधन -

जैव इंधनामध्ये प्रामुख्याने ऊस रसापासून इथेनॉल, अखाद्य बियांपासून बायो डिझेल, शेतातील काडीकचरा व बगॅसपासून वीजनिर्मिती, शेती व औद्योगिक कचरा व सांडपाण्यापासून बायो सीएनजी व ग्रीन हायड्रोजन हे प्रमुख स्रोत आहेत. त्यात बगॅस व शेती अवशेषांपासून वीजनिर्मिती, ऊस रसापासून व मोलॅसिस सून इथेनॉल निर्मिती या संकल्पना गेल्या २० वर्षांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून यशस्वी झाल्या आहेत. त्याचे व्यावसायिक उत्पादन व वापर सर्व देशभर प्राधान्याने होत आहे. शेती अवशेष व औद्योगिक कचरा, सांडपाण्यापासून बायो सीएनजी (CBG) निर्मिती या संकल्पना नव्याने अस्तित्वात आलेल्या आहेत. केंद्र सरकारचे जैवइंधन धोरण २०१८ नंतर खऱ्या अर्थाने बाळसे घेत आहे. शेतकरी व ग्रामीण तरूणांच्या सहभागातून बायो सीएनजी प्रकल्पाचे जाळे संपूर्ण देशभर राबवता येईल. शेती उत्पादनातून गॅस सीएनजी व सीबीजी या इंधनाची वाढती मागणी संपूर्णपणे भागवता येईल. भारत इंधनाच्या बाबतीत संपूर्ण आत्मनिर्भर होईल, इतकी क्षमता बायो सीएनजीमध्ये आहे. एकूण २०७० पर्यंत शून्य प्रदूषणाची संकल्पना साकार होऊ शकते. तरुणांसाठी स्वयंरोजगारातून, तर शेतकऱ्यांसाठी मूल्यवृद्धीतून आत्मनिर्भरता साधणे शक्य असून, त्याबाबतचे संक्षिप्त प्रकल्प आपण पाहू.

Bio Fuel Production
Soybean Rate : यंदा सोयाबीन उशीरा येणार ?

बायो सीएनजी, सीबीजी

बहुतांश सर्व वाहनांसाठी डिझेल व पेट्रोल अशी खनिज इंधने गेल्या अनेक वर्षांपासून वापरले जात आहे. त्यातून उत्सर्जित होणारा कार्बन वायूही पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक ठरतो. यातील सुमारे ८० टक्के इंधन आयात करावे लागते. गेल्या २० वर्षांपासून सीएनजी हे वायू स्वरूपातील इंधनही सुमारे ९५ टक्के शहरी, तर ५० टक्के ग्रामीण भागापर्यंत पोहचले आहे. मात्र त्याबाबतही सुमारे ९० टक्के परावलंबित्व आहे. त्यामुळे या सीएनजी इंधनामध्ये स्वावलंबनासाठी बायो सीएनजी हा पर्याय सर्वोत्तम ठरू शकतो.

प्रामुख्याने औद्योगिक सांडपाणी उदा. कारखान्यातील एफ्ल्युएंट, डिस्टिलरी प्रकल्पातील स्पेंटवॉश, साखर कारखान्यातील प्रेसमड, बगॅस व अन्य स्वरूपाच्या औद्योगिक कचरा यापासून बायोगॅस डायजेस्टरमध्ये बायोगॅस निर्मिती केली जाते. त्याच्या शुद्धीकरणानंतर तयार झालेला बायो सीएनजी (सीबीजी) कॉम्प्रेस करून वाहनामध्ये इंधन म्हणून वापरला जातो. अशाच प्रकारे

शेतातील काडीकचरा, पिकांचे अवशेष उदा. तुराटी, पऱ्हाटी, उसाचे पाचट, तणस, गव्हाचे काड, भुस्सा व सर्व किंवा शेतीमध्ये प्रत्यक्ष पिके उदा. नेपियर गवत, बांबू, गोड ज्वारीची धाटे इ. घेऊन, त्याचा लगदा डायजेस्टरमध्ये टाकला जातो. त्यातून तयार झालेला बायोगॅस शुद्धीकरणानंतर बायो सीएनजी म्हणून वाहनासाठी वापरला जातो.

नेपियर गवत व शेती कचरा आधारित बायो सीएनजी प्रकल्प-

अ.क्र. --- तपशील --- एकूण

१) --- प्रकल्प क्षमता --- ६ मे.टन बायो सीएनजी प्रति दिवस

२) --- अंदाजित प्रकल्प खर्च --- १५ ते २० कोटी

३) --- प्रकल्पास आवश्यक जागा --- ३ ते ५ एकर

४) --- प्रकल्पास लागणारा कच्चा माल उपलब्धता --- ००

अ) --- नेपियर गवत लागवड एक वर्षासाठी --- ३०० ते ३५० एकर

ब) --- प्रति एकरी उत्पादन (दर २ महिन्यास कापणीनुसार वार्षिक ५ कापण्यामध्ये प्रत्येक कापणीस २० टन याप्रमाणे किमान १०० मे.टन वार्षिक उत्पादन) --- ८५ ते १०० मे.टन प्रति दिवस.

क) --- एकूण वार्षिक उत्पादन (३०० ते ३५० एकर मधून) --- ३० ते ३५ हजार मे.टन

ड) --- प्रकल्पास कच्च्या मालाची आवश्यकता. १ मे.टन गवतापासून १०० ते १२० घ.मी. बायोगॅस उत्पादन. १०००० घ.मी.साठी दररोज १०० मे.टन नेपियर गवताची आवश्यकता --- ३६५ दिवसांकरिता ३०००० ते ३५००० टनची आवश्यकता.

५) --- बायोगॅस उत्पादन- १ टन गवतापासून किमान १०० घ.मी. याप्रमाणे १०० मे. टन गवतापासून --- १०००० घ.मी. गॅस उत्पादन.

६) --- दैनिक सीएनजी उत्पादन- बायोगॅसमध्ये ६० ते ६५ टक्के मिथेन असल्याने १ घ.मी.पासून ६०० किलो, तर १०००० घ.मी. पासून --- ६ टन सीएनजीचे उत्पादन

७) --- प्रकल्पाचे अर्थशास्त्र प्रति दिवसानुसार --- ००

अ) --- प्रकल्प भांडवली गुंतवणुकीचे व्याज (२० कोटी, १० टक्के व्याजदर ३६५ दिवस) --- ५५,००० रु.

ब) --- कच्चा माल- नेपियर गवत १०० टन, दर २००० प्रति टन --- २,००,००० रु.

क) --- उत्पादन प्रक्रिया खर्च, वीज व इतर --- २५,००० रु.

ड) --- कर्मचारी पगार व व्यवस्थापन खर्च --- २०,००० रु.

इ) --- घसारा --- ३०,००० रु.

ई) --- विक्री व इतर खर्च --- २०,००० रु.

फ) --- एकूण खर्च --- ३,५०,००० रु.

८) --- उत्पन्न सीएनजी विक्री- (६ टन गुणिले दर ७५००० प्रतिटन) --- ४,५०,००० रु.

९) --- सेंद्रिय खत विक्री- १०० मे. टनाच्या २५ टक्के एकूण २५ मे. टन गुणिले दर ५००० प्रति टन --- १,२५,००० रु.

१०) --- एकूण उत्पन्न --- ५,७५,००० रु.

११) --- एकूण नफा प्रति दिवस --- २,२५,००० रु.

१२) --- वार्षिक निव्वळ नफा-(३०० दिवस) --- ६.७५ कोटी रु.

सदर प्रकल्पासाठी लागणारे मनुष्यबळ आणि मासिक वेतन

अ.क्र. --- तपशील --- एकूण पदे --- महिना वेतन (रु.) --- एकूण रक्कम (रु.)

१ --- मॅनेजर --- १ --- ५०,००० --- ५०,०००

२ --- केमिस्ट --- ४ --- २५,००० --- १,००,०००

३ --- ऑपरेटर्स --- ७ --- २०,००० --- १,४०,०००

४ --- हेल्पर्स --- १० --- १०,००० --- १,००,०००

एकूण महिन्याचे वेतन --- २२ --- ०० --- ३,९०,०००

वरील मॉडेल प्रकल्प अहवालानुसार,

-६ मे.टन प्रति दिवस सीएनजी प्रकल्पासाठी ४०० ते ५०० एकर नेपियर गवताची लागवड अपेक्षित आहे.

-त्या दृष्टीने साधारणपणे १० किमी परिघातील ५ ते ७ गावांमध्ये प्रत्येकी १०० एकर नेपियर गवताची लागवड करता येईल. अशा प्रकारे ५ ते ७ गावांमध्ये १ याप्रमाणे एका बायोसीएनजी प्रकल्पाची उभारणी करता येईल.

-या गावातील सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी) स्थापन करावी. त्याद्वारे अशा प्रकल्पाची उभारणी केल्यास त्यामधून साधारण २०० ते २५० शेतकरी कुटुंबे, प्रकल्पासाठी लागणारा ५० ते ७५ कर्मचारी वर्ग, नेपियर गवत कापणी व वाहतुकीसाठी लागणारी ५० वाहने व त्यासाठी १०० ते १५० मजूर वर्ग यांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

-शेतकऱ्यांना नापीक किंवा पडीक जमिनीतही नेपिअर गवताची लागवड करून एकरी २ ते २.५० लाखांचे वार्षिक उत्पन्न मिळू शकेल.

- या सात गावांमध्ये सीएनजी प्रकल्पाची वार्षिक अंदाजे ८० ते १०० कोटी रु. उलाढाल होईल.

- या परिसरातील ट्रॅक्टर्स, दुचाकी व चार चाकी वाहने ही बायो सीएनजीवर चालू शकतील. त्यामुळे इंधन खर्चात मोठी बचत होईल. परिसरातील प्रदूषण कमी होईल. यातूनच महात्मा गांधींच्या स्वप्नातील स्वयंपूर्ण खेड्याची, तर नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होऊ शकेल. प्रदूषणमुक्त आत्मनिर्भर भारत व आत्मनिर्भर स्वावलंबी शेतकरी या स्वप्नाचीही पूर्ती होईल.

संपर्क ः ०२४७३-२६५५०२,३,४,५

(चेअरमन व कार्यकारी संचालक, नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि., साईनगर,रांजणी ता. कळंब जि. उस्मानाबाद.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com