Agriculture Technology : सौर ऊर्जेद्वारे शेततळ्यात साठवता येईल पावसाचे पाणी

Solar Power Generation : आपल्या शेताच्या संरक्षित सिंचनासाठी शेततळे तयार करण्याचा पर्याय शेतकरी मोठ्या प्रमाणात निवडत आहेत. त्यात केलेल्या पाण्याच्या साठ्याद्वारे पिकाचे शाश्‍वत उत्पादन मिळवत आहेत.
Solar Project
Solar ProjectAgrowon

श्रीनिवास देशपांडे

Solar Technology : आपल्या शेताच्या संरक्षित सिंचनासाठी शेततळे तयार करण्याचा पर्याय शेतकरी मोठ्या प्रमाणात निवडत आहेत. त्यात केलेल्या पाण्याच्या साठ्याद्वारे पिकाचे शाश्‍वत उत्पादन मिळवत आहेत. शेतकऱ्यांची गरज, उपलब्ध जागा आणि आर्थिक क्षमता याप्रमाणे शेततळ्याचा आकार कमी अधिक असतो. अलीकडे शेतकऱ्यांनी लाखो - कोट्यवधी लिटर्स क्षमतेची शेततळी बांधलेली दिसतात.

त्यात पावसाचे पाणी गोळा करण्याच्या दृष्टीने शेततळ्याची जागा ही शक्यतो खोलगट भागातील निवडण्याची आवश्यकता असते. पण बहुतांश शेतकरी त्याच्या उलट शेतातील उंच भागात शेततळी बांधली जातात. त्याचे कारणही गुरुत्वाकर्षणाद्वारे (उताराने) संपूर्ण शेतात सिंचन करणे असा सांगितला जातो.

मात्र उंचावरील या शेततळ्यामध्ये शेतात पडणारा लाखो करोडो लिटर्स पावसाचा अपधाव (रन ऑफ) शेततळ्याकडे वळविणे शक्य होत नाही. हे आपल्या शेतात पडणारे सारे पाणी वाहून जाते. मग शेततळे भरण्यासाठी विहिरी किंवा बोअरवेलच्या पाण्याचा वापर केला जातो. म्हणजे भूगर्भामध्ये खूप खोलवर हजारो वर्षापासून साचलेले पाणी उपसून शेततळ्यात सोडले जाते.

जे पाणी भूगर्भात बाष्पीभवनापासून सुरक्षित राहिले असते, ते वर सूर्यप्रकाशामध्ये आणून वाफ होण्यासाठी ठेवले जाते. त्यामुळे शेततळ्याचा पावसाचे वाहून जाणारे पाणी साठवण्याचा मूळ उद्देश बाजूला पडत असल्याने जलतज्ज्ञांकडून त्याबाबत सातत्याने आक्षेप घेतले जात आहेत. ही बाब लक्षात ठेवून शेतकऱ्यांनी आपले शेततळे योग्य स्थानी तयार करावे, हेच योग्य.

Solar Project
Solar Project : सव्वा तीन हजार ग्राहकांच्या घरांवर सौरऊर्जा यंत्रणा

पण ज्यांनी मुळात लाखो रुपये खर्चून शेततळे तयार केले आहे, त्यांनीही कोणत्या उपाययोजना राबविल्यास शेतात पडणारे पावसाचे पाणी उंचावरील शेततळ्याकडे नेता येईल, हे आपण पाहू. कोणतीही उपाययोजना राबवायची, तर प्रथम शेताच्या खोलगट भागात पावसाचे पाणी साठवणीची व्यवस्था करावी लागेल.

तेथून पाणी उचलून तळ्यात नेऊन सोडण्यासाठी पाइपलाइन व पंपाची व्यवस्था करावी लागेल. अर्थात, हा पंप चालविण्यासाठी विजेचीही आवश्यकता व खर्चही वाढेल. पावसाच्या पाण्याने शेततळे मोफत भरून घेण्यासाठी एक सोपा उपाय सुचवण्याचा माझा प्रयत्न आहे.

...अशी असेल सिंचन शेततळे भरण्याची संरचना

सध्याच्या आपल्या शेतातील उंच भागातील शेततळ्यास आपण ‘सिंचन शेततळे’ असे म्हणू. हे सिंचन शेततळे पावसाच्या पाण्याने भरून घेण्यासाठी शेताच्या खालच्या उताराकडील भागात एक पाणी गोळा करणारे तळे (इन टेक पॉन्ड) घ्यावे. त्याचा आकार सिंचन शेततळ्याच्या क्षमतेवर अवलंबून असेल. आपल्या शेतात पडणारे पावसाचे पाणी या इन टेक पॉन्डकडे वळविण्यासाठी चाऱ्या खोदून घ्याव्यात.

या चाऱ्यांमध्ये पीव्हीसीचे गटर्स बसवून फिल्टर्स तयार करावेत. त्याच प्रमाणे विविध पद्धती उदा. छोटे दगड, गिट्टी, मोठी वाळू यांच्या साह्याने चारीतील पाणी संथ व गाळविरहित स्वच्छ होईल, असे पाहावे. असे स्वच्छ पाणी इनटेक टाकीमध्ये घ्यावे. ते पाणी पंपाद्वारे भागातील सिंचन शेततळ्यामध्ये पोहोचवायचे आहे. त्यासाठी योग्य अश्‍वशक्तीचा मोनो ब्लॉक पंप व पाइपलाइन करावी लागेल.

Solar Project
Agriculture Solar Power Generation : शिळ्या कढीला ऊत

येथे खरेतर सोलर पंप बसविण्याचा विचार करता येत असला तरी पावसाळ्यात ढगाळ वातावरणामुळे आवश्यक तेवढी शक्ती निर्माण होऊ शकणार नाही. अशा वेळी सोलर पॅनेल्स बसवून नेट मीटरिंगच्या साह्याने विजेचे उत्पादन करता येईल. उन्हाळ्यात केलेल्या ऊर्जेच्या बळावर ही प्रणाली शून्य खर्चात पावसाळ्यात चालेल. म्हणजे पावसाळ्यात मोनो ब्लॉक पंप वीज मंडळाच्या वीज पुरवठ्यावरच चालणार असल्याने तो पूर्ण क्षमतेने चालवता येईल.

या यंत्रणेच्या उभारणीसाठी आवश्यक तिथे स्थानिक तंत्रज्ञ आणि नेट मीटरिंग प्रणालीबाबत महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे अभियंते मदत करू शकतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावर शेततळे भरून झाल्यामुळे भूजल उपसण्याची आवश्यकता राहणार नाही. हे भूजल आपल्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व अत्यंत तातडीच्या कामांसाठी सुरक्षित राहिल. थोडक्यात, बाष्पीभवन न होणाऱ्या भूगर्भाच्या बँकेत जलसाठा सुरक्षित राहू शकेल.

बाष्पीभवन रोखण्यासाठी फ्लोटिंग (तरंगते) सोलर पॅनेल्स

पावसाळ्यात पावसाच्या साह्याने शेततळ्यामध्ये भरलेल्या पाण्याचेही बाष्पीभवन होणार आहे. ते रोखण्यासाठी शेततळ्यावर तरंगते सोलर पॅनेल्स बसविण्याचा विचार करावा. त्यातून तयार होणारी वीज पुन्हा नेट मीटरिंग प्रणालीद्वारे वीज मंडलाला पुरवली जाते. त्यातून आपल्या शेती व घराचे वीजबील शून्य होऊ शकते.

शेततळ्याचा आकार मोठा असेल सोलर पॅनेल्सने निर्माण होणारी ऊर्जा ओपन ॲक्सिस प्रणालीने वीज मंडळाला विकून उत्पन्नही मिळू शकते. साधारणपणे १० वर्गमीटर क्षेत्रफळात एक किलोवॉट सौरऊर्जा निर्माण होते. आपल्या शेततळ्याच्या आकारानुसार किती सौरऊर्जा तयार होईळ, याचा अंदाज मिळू शकतो. यासाठी वेगवेगळ्या कंपनीच्या सौर पॅनेल वितरकांकडून किती गुंतवणूक करावी लागेल, याचाही अंदाज घ्यावा. मात्र एकदाचा भांडवली गुंतवणूक केल्यास वीज आणि पाणी दोन्ही मध्ये बचत साधणे आपल्याला शक्य आहे, हे लक्षात घ्यावे.

फ्लोटिंग सोलर पॅनेल्सचे फायदे

बाष्पीभवनामुळे पाणी वाया जाणे कमी होते.

शेतजमिनीवर सोलर पॅनेल्स लावल्यास त्याखाली अडकणारी जमीन आपल्याला पीक लागवडीसाठी वापरता येत नाही. अशा वेळी शेततळ्याच्या जागेतच सोलर पॅनेल बसून जात असल्याने ही शेतीक्षेत्र अन्य पिकांसाठी खुले राहते.

पावसाळ्याचे दोन ते तीन महिने वगळता वर्षभर सूर्यप्रकाश उपलब्ध असल्याने वीज निर्मितीही मोठ्या प्रमाणात निर्माण होते.

श्रीनिवास देशपांडे ७०६१०१४०२३

(सेवानिवृत्त सहसंचालक (अभियांत्रिकी), भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महाराष्ट्र शासन)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com