Agriculture Technology : रोटाव्हेटर वापरताना घ्यावयाची काळजी

Article by Dr. Sachin Nalawade : रोटाव्हेटर हे दुय्यम मशागतीचे अष्टपैलू साधन असून, त्याला ‘रोटरी टिलर’ या नावानेही ओळखले जाते.
Rotavator
RotavatorAgrowon
Published on
Updated on

Rotavator : रोटाव्हेटर हे दुय्यम मशागतीचे अष्टपैलू साधन असून, त्याला ‘रोटरी टिलर’ या नावानेही ओळखले जाते. या अवजारामुळे एकाच वेळी मातीचे यांत्रिक पद्धतीने पल्व्हराइजिंग, कटिंग, मिक्सिंग आणि सपाटीकरण करणे शक्य होते. परिणामी, जमिनीच्या मशागतीची प्रक्रिया सोपी होते. कष्टही लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात.

मात्र हे अवजार वापरताना त्यांच्या निर्मात्या कंपनीने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आणि मशिन चालविताना योग्य ती सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. जर तुम्ही नव्यानेच किंवा प्रथमच रोटाव्हेटर वापरणार असाल, तर अनुभवी शेतकरी किंवा उपकरणे भाड्याने देणाऱ्या व्यावसायिकांकडून ते चालविण्यातील खाचाखोचा समजून घ्याव्यात. त्याचा फायदा होतो.

रोटाव्हेटरचे विविध प्रकार :

आपल्या शेतीच्या गरजेनुसार कोणता रोटाव्हेटर घ्यावा, हे जाणून घेण्यासाठी प्रथम रोटाव्हेटरचे विविध प्रकार जाणून घेऊ.

मोठ्या आकाराचे (हेवी ड्यूटी) रोटाव्हेटर्स ः शेतीचे क्षेत्र अधिक असल्यास हेवी-ड्यूटी रोटाव्हेटरची आवश्यकता असते. हे रोटाव्हेटर अधिक अश्वशक्तीचे, मजबूत बांधणीचे आणि मोठ्या ब्लेडने सुसज्ज असतात. यात कंपनीनुसार ८ ते १२ फूटी रोटाव्हेटर उपलब्ध असून, त्यासाठी ८० ते १०० एचपीचा ट्रॅक्टर आवश्यक असतो.

Rotavator
Agriculture Technology : गुणवत्तापूर्ण मुरघास निर्मितीचे तंत्र

मध्यम आकाराचे रोटाव्हेटर्स : मध्यम आकाराच्या या रोटाव्हेटर्समध्ये कार्यक्षमता आणि शक्ती यांचे संतुलन साधण्याचा प्रयत्न केलेला असतो. लहान ते मध्यम आकाराच्या शेतांसाठी, फळबागांसाठी मशागतीच्या साह्याने माती तयार करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. यांची बांधणी तुलनेने कमी मजबूत असून, शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टीने तुलनेने परवडणाऱ्या विभागात मोडतात. सामान्यतः या ६ फुटी रोटाव्हेटरसाठी कंपनीनुसार ४५ ते ५५ एचपी ट्रॅक्टरची आवश्यकता असते.

लहान आकाराचे (लाइट ड्यूटी) रोटाव्हेटर्स : लहान शेती, बागकाम किंवा लॅण्डस्केपिंग अशा कामांसाठी लहान आकाराचे रोटाव्हेटर उपयोगी ठरतात. ते वजनाला हलके, कमी शक्तिशाली आणि कमी जागेत बसणारे असतात. हे हाताळण्यास सोपे असून, अन्य दोन प्रकारच्या रोटाव्हेटरपेक्षा स्वस्त असतात. यामध्ये ३ फुटी रोटाव्हेटरसाठी वेगवेगळ्या कंपनीनुसार १२ ते ३० एचपी ट्रॅक्टरची आवश्यकता असते.

रोटरी टिलरमधील भाग

१) ब्लेड्स, २) गियरबॉक्स (सिंगल किंवा मल्टी स्पीड), ३) रोटर शाफ्ट, ४) ट्रॅक्टर जोडण्यासाठी मास्ट, ५) अनुगामी बोर्ड, ६) गियर किंवा चेन कव्हर.

तुमचा रोटाव्हेटर शेतीसाठी कसा वापरायचा?

माती योग्य प्रकारे भुसभुशीतपणा आणून, जमीन चांगल्या प्रकार तयार करण्यासाठी रोटाव्हेटरचा वापर प्रभावी ठरतो. त्या दृष्टीने रोटाव्हेटर वापरताना विचारात घ्यावयाच्या आवश्यक बाबी पुढील प्रमाणे -

ट्रॅक्टरशी सुसंगतता : आपला ट्रॅक्टर रोटाव्हेटर अटॅचमेंटशी सुसंगत असल्याची खात्री करावी. रोटाव्हेटर चालविण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये आवश्यक पीटीओ पॉवर असणे आवश्यक आहे.

अटॅचमेंट सेटअप : उत्पादकाच्या सूचनेनुसार ट्रॅक्टरशी रोटाव्हेटर जोडावा. यामध्ये सामान्यतः रोटाव्हेटरच्या ड्राइव्हलाइनला ट्रॅक्टरच्या पॉवर टेक-ऑफ (PTO) शाफ्टशी जोडून घ्यावा.

खोली समायोजन : जमिनीची किती खोलीपर्यंत मशागत करायची हे ठरवून घेतल्यानंतर रोटाव्हेटर त्या इच्छित खोलीवर सेट करावा. त्यासाठी रोटाव्हेटरवरील खोली नियंत्रण यंत्रणेमध्ये योग्य ते बदल करून घ्यावी. या मशागतीची खोली ही उद्देशानुसार कमी जास्त असू शकते. उदा. सुरुवातीला माती फोडण्यासाठी खोलवर, बियाणे लागवडीसाठी शेत तयार करण्यासाठी उथळ इ.

Rotavator
Agriculture Technology : मृतप्राय वनस्पतीही होऊ शकेल जिवंत

ट्रॅक्टर सेट केल्यानंतर ऊर्जा देणे : ट्रॅक्टरचे इंजिन सुरू केल्यानंतर त्याच्या पीटीओद्वारे रोटाव्हेटरला ऊर्जा दिली जाते. ट्रॅक्टर हळूहळू मशागतीच्या क्षेत्रात चालवा. ट्रॅक्टरच्या पुढे जाण्याने रोटाव्हेटरचे दाते (टाइन्स) फिरत जातील. त्यातून माती मोकळी होत मशागत होईल.

थोडे ‘ओव्हरलॅपिंग’ आवश्यक : शेतात पुढे जात असताना रोटाव्हेटरच्या रुंदीप्रमाणे (३, ६ किंवा १२ फूट) पट्ट्याची मशागत होत जाईल. दुसरी ओळ घेताना पहिल्या ओळीचा काही भाग ओव्हरलॅप करून न्यावा. यामुळे मातीच्या मशागत न झालेल्या पट्ट्या सुटत नाहीत.

नियंत्रित गती : रोटाव्हेटरला प्रभावीपणे कार्य करू देण्यासाठी गती स्थिर ठेवावी. विनाकारण जास्त वेग टाळावा. जास्त वेगामुळे अपेक्षित मशागत, परिणाम मिळू शकत नाहीत.

वळणे आणि कोपरा करणे : नुकसान टाळण्यासाठी आणि नियंत्रण राखण्यासाठी सरीच्या शेवटी ट्रॅक्टर फिरवताना रोटाव्हेटर जमिनीतून वर उचलून घ्यावा. पुन्हा ओळीमध्ये आल्यानंतर पुन्हा खाली करून कामाला सुरुवात करावी.

मशागतीची खोली आणि ताकदीचे व्यवस्थापन : शेतामध्ये जर घट्ट किंवा कडक माती आढळल्यास मशागतीची खोली कमी अधिक करण्याचा योग्य तो निर्णय घ्यावा. निबर जमिनी फोडण्यासाठी रोटाव्हेटर हळूहळू वाढत्या खोलीवर लावण्याचा विचार करा.

वापरानंतरची स्वच्छता : रोटाव्हेटर वापरल्यानंतर त्यावर साचलेली माती आणि काडी कचरा स्वच्छ करावी. गंज आणि अन्य नुकसान टाळण्यासाठी उपकरणे शक्यतो शेडमध्ये ठेवावीत.

रोटाव्हेटरची देखभाल कशी करावी?

नियमित देखभालीमुळे उपकरणे चांगल्या प्रकारे कार्यरत राहतात. उपकरणातील बिघाड टाळता येतो.

वापरापूर्वीची तपासणी : कोणत्याही दृश्यमान नुकसान, सैल बोल्ट किंवा जीर्ण भागांसाठी रोटाव्हेटरची तपासणी करावी. ड्राइव्हलाइन, ब्लेड आणि गिअरबॉक्स तपासावेत. झीज किंवा नुकसानीच्या कोणत्याही खुणा असतील तर दुरुस्त करून घ्याव्यात.

वंगण : सर्व फिटिंग्ज आणि हलणारे भाग यांना ग्रीस करावे. यामध्ये बेयरिंग्ज, पिव्होट पॉइंट्स आणि गिअरबॉक्स घटक समाविष्ट आहेत. घर्षण आणि झीज टाळण्यासाठी पीटीओ शाफ्ट आणि युनिव्हर्सल सांधे यांनाही नियमितपणे वंगण घालणे आवश्यक आहे.

पीटीओ शाफ्ट देखभाल : पीटीओ शाफ्टची त्यातील वाकलेपणा, भेगा यांच्यासाठी तपासणी करावी. सगळे गार्ड जागेवर असावेत. पीटीओ शाफ्ट सुरक्षितपणे जोडलेला आणि लॉक केलेला असल्याची खात्री करा.

साफसफाई : प्रत्येक वापरानंतर अवजारामध्ये अडकलेली माती, काडीकचरा आणि वनस्पतींचे अवशेष काढून टाकावेत. पाती आणि इतर हलणाऱ्या भागांवर विशेष लक्ष द्यावे. स्वच्छ असलेल्या रोटाव्हेटरला गंज आणि यांत्रिक समस्यांचा त्रास फारसा होत नाही.

नियमित देखभाल : तेल बदल, गिअरबॉक्स तपासणी आणि एकंदर सिस्टिम तपासणी यासह नियमित देखभालीचे वेळापत्रक तयार करावे. असे वेळापत्रक रोटाव्हेटरच्या कंपनीकडून शिफारस केले जाते. त्यातील सर्व सेवा नियमाचे अनुसरण करा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com