Onion Planter : नाशिकमधील शेतकऱ्यांना भावतेय कांदा रोपे ‘ट्रान्स्प्लान्टर’ तंत्रज्ञान

नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील सौरभ कदम व प्रसाद देशमुख या दोघा युवकांना कांदा रोपे पुनर्लागवडीचे (ट्रान्स्प्लान्टर) अर्ध स्वयंचलित पद्धतीचे यंत्र विकसित केले. त्यामुळे मजुरीखर्चासह वेळेत व पैशांमध्ये मोठ्या प्रमाणात बचत करून कांद्याचे एकरी उत्पादन व गुणवत्ता वाढवणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे.
Onion Planter in Nashik
Onion Planter in NashikAgrowon
Published on
Updated on

अलीकडील वर्षांत रब्बी कांदा लागवडीखालील (Rabi Onion Cultivation) क्षेत्र वाढत आहे. अशावेळी मजुरांची (Labor Availability) उपलब्धता हे मोठे आव्हान समोर उभे आहे. हंगामात वेळेवर लागवड पूर्ण करताना शेतकऱ्यांची दमछाक होते.

मजूर भेटले तरी लागवड वेळेवर होईल की नाही? झालीच तर रोपांची संख्या, लागवड शास्त्रीय पद्धतीने असेल की नाही, असे प्रश्‍न समोर उभे राहतात.

रोपांची असमान लागवड, लागवडीनंतर (Onion Cultivation) मर, एकरी रोपांची कमी संख्या यादेखील अडचणी होत्या.

त्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यातील कळवण, येवला व निफाड तालुक्यांतील काही शेतकऱ्यांनी यांत्रिक पद्धतीतून कांदा रोपे पुनर्लागवडीचा (Onion Seedling Transplanter) पर्याय शोधला आहे. त्यातून मजुरी खर्च, वेळ व पैशांत बचत करणे शक्य झाले आहे.

Onion Planter in Nashik
Onion Cultivation : कांदा लागवड करताना या गोष्टी लक्षात ठेवा

यंत्रावरील संशोधन

नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील सिव्हिल इंजिनिअर’ सौरभ राजेंद्र कदम व दुग्ध व्यावसायिक प्रसाद अप्पासाहेब देशमुख हे दोन्ही युवक एकमेकांचे मित्र असून, दोघांची पार्श्‍वभूमी शेतकरी कुटुंबाची आहे.

सन २०१६ साली राजगुरुनगर (जि. पुणे) येथील कांदा व लसूण महासंचालनालय येथे हाताने रेष घेऊन बियाणे पेरणीची पद्धत पाहण्यात आली.

त्यापासून प्रेरणा घेत कांदा बियाणे पेरणी यंत्र विकसित केले. त्याला मागणी वाढून व्यावसायिक स्वरूप आले. पुढे मजूरटंचाई व शास्त्रीय पद्धतीने कांदा लागवडीचा अभाव असे मुद्दे समोर आले.

त्यातूनच मग अर्ध स्वयंचलित पद्धतीचे कांदा रोप पुनर्लागवडीचे (ट्रान्स्प्लान्टर) प्रथम आवृत्तीचे यंत्र २०१७ च्या सुमारास विकसित करणे दोघा मित्रांना यश आले.

स्वतःच्या शेताबरोबरच जवळपासच्या कांदा उत्पादकांकडे त्याच्या चाचण्या घेतल्या. त्यातून उद्‍भवणाऱ्या त्रुटी समोर येत गेल्या. त्या दुरुस्त करीत सन २०१९ मध्ये सुधारित यंत्र तयार झाले.

सन २०२० मध्ये बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रदर्शनावेळी त्याची प्रात्याक्षिके घेण्यात आली. सन २०२२ मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रक्षेत्रावर सिंचन विभागाचे डॉ. माने यांच्या मार्गदर्शनखाली चाचण्या घेतल्या.

भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM), काशीपूर (उत्तराखंड) येथे या यंत्राची ‘स्टार्टअप’साठी नोंदणी झाली. त्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ‘रफ्तार’मध्ये निवड झाली.

त्या माध्यमातून संशोधनासाठी १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. सन २०१६ मध्ये यंत्राचे स्वामित्व हक्क (पेटंट) मिळविण्यासाठी भारत सरकारच्या पेटंट कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे.

Onion Planter in Nashik
Onion Planter : वाढत्या मजुरीवर कांदा पेरणी यंत्राचा उपाय

तंत्रज्ञानाचा प्रसार

या यंत्राचा प्रसार जवळपास २१ शेतकऱ्यांपर्यंत झाला आहे. यात नगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील निफाड, येवला, कळवण आदी भागांचा समावेश आहे. त्याशिवाय ‘एनएचआरडीएफ’, जैन इरिगेशन, जळगाव, मध्य प्रदेशातील इंदूर व उज्जैनपर्यंत हे यंत्र पोहोचले आहे.

प्रातिनिधिक उदाहरण द्यायचे, तर कळवण (जि. नाशिक) येथील प्रगतिशील कांदा उत्पादक भूषण कौतिक पगार यांच्याकडे दरवर्षी २५ एकरांपर्यंत रब्बी- उन्हाळी कांदा लागवड असते. मजूर टंचाई जाणवू लागल्याने पारंपरिक पद्धतीने लागवड न करता संबंधित

यंत्राचा पर्याय त्यांनी निवडला. त्याचे दोन फायदे झाले. गेल्या दोन वर्षांपासून लागवडीपूर्व शेत बांधणी, सारे पाडणे या कामांची गरज भासली नाही. शेतबांधणी १५०० रुपये, तसेच सारे पाडणे १५०० ते २००० हजार रुपये असा एकरी खर्च वाचणे शक्य झाले आहे.

पुढील टप्प्यात लागवडीसाठी एकरी १२ ते १३ हजार एकूण मजुरी खर्चाशिवाय मजूर वाहतूक खर्चही वेगळा असतो. त्यामुळे लागवडीपूर्व तीन हजार रुपयांच्या खर्चाबरोबर एकरी लागवड खर्चातही ७ ते ८ हजारांपर्यंत बचत झाली आहे. सुमारे आठ तासांत आठ मजुरांच्या मदतीने एक ते ते सव्वा एकरावर लागवड पूर्ण करणे शक्य झाले आहे.

Onion Planter in Nashik
Onion Cultivation : कांदा दरात फटका बसूनही कांदा लागवडी वाढत्याच

सायंकाळ नंतरही लागवड शक्य

गरज भासल्यास दिवसा काम केल्यानंतर प्रकाश व्यवस्था करून सायंकाळी दुसऱ्या सत्रात ५.३० ते रात्री ११ वाजेपर्यंत पुन्हा तितकीच लागवड करता येते. पारंपरिक पद्धतीत हे शक्य होत नाही.

साहजिकच पारंपरिक लागवडीत येणाऱ्या काही मर्यादांवर हा पर्याय महत्त्वाचा ठरत आहे. दोन रोपांमधील अंतर एकसारखे असल्याने वाढीच्या अवस्थेत त्यांना एकसारखा सूर्यप्रकाश, हवा, पाणी हे घटक मिळतात.

वाफसा अवस्था एकसारख्या पद्धतीने येते. त्यामुळे कंद चांगल्या पद्धतीने पोसतात. प्रतवारी करताना श्रम कमी होतात.

एकसारखा रंग व आकार असल्याने एकरी उत्पादकता वाढली आहे. मागील वर्षी एका एकरात सरासरी ३० क्विंटल उत्पादन मिळाले. जोड कांदा, गोल्टी व चिंगळीचे प्रमाण कमी झाले. या वर्षी ३२ एकर लागवड झाली आहे.

भाडेतत्त्वावर कामातून उत्पन्नाच्या संधी :

मानूर (ता. कळवण, जि. नाशिक) येथील प्रशांत शिवाजी बोरसे म्हणाले, की दोन वर्षांपूर्वी ८ सीटर यंत्राची खरेदी केली.

त्यामुळे घरगुती आठ एकर लागवड पूर्ण करण्यासह अन्य शेतकऱ्यांना एकरी आठ हजार रुपये दराने यंत्र भाडेतत्त्वावर देऊन व्यवसाय करणे शक्य झाले आहे. त्यातून लागवडीचा खर्च कमी होऊन अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. हंगामी ५० एकर क्षेत्रांवर काम होते.

प्रशांत बोरसे- ९४२३२५७३६१

माझ्याकडे १५ एकर कांदा लागवड होते. पारंपरिक पद्धतीने मजूर, वाहतूक, शेती बांधणी, सारा बांधणी असा एकरी १७ हजार रुपयांवर खर्च जायचा.

आता सर्व कामे यंत्राच्या माध्यमातून होतात. त्यातून एकरी आठहजार ते नऊ हजार रुपये खर्चात बचत होत आहे.

-श्याम पंडितराव सानप पाचोरे बुद्रूक, ता. निफाड ८६६८८६३१२९

खरिपात अधिक ओल असल्याने हे यंत्र त्या हंगामासाठी तेवढे उपयुक्त ठरणार नाही मात्र लेट खरीप व रब्बी हंगामात कांदा रोप पुनर्लागवडीसाठी त्याचा वापर सुलभ आहे. पाच ते सहा वर्षे सातत्याने संशोधन व विकास करून यंत्र विकसित केले आहे.

दाट लागवडीच्या पिकांमध्ये किंवा लसूण, कोबी, फ्लॉवर आदींसाठीही त्याचा वापर करणे शक्य आहे. या शिवाय टोमॅटो व अन्य भाजीपाला पिकांसाठी अन्य यंत्र विकसित करण्याचे काम सुरू असल्याचे यंत्राचे संशोधक सौरभ कदम यांनी सांगितले.

संपर्क ः सौरभ कदम, ९७३०१२३००५

ट्रान्स्प्लान्टरची वैशिष्ट्ये ः

मॉडेल. ...किंमत... लागवड क्षमता (प्रति तास)...आठ तासांत लागवड (गुंठे)...यंत्राचे वजन (किलो)...बेडचे अंतर

१.पाच सीटर सिंगल बेड...३.५४ लाख...१८,००० ते २०,०००...३०...६५०...६ फूट

२.सहा सीटर सिंगल बेड...४,२५ लाख...२१,००० ते २३,०००...४०... ८००...७ फूट

३.आठ सीटर सिंगल बेड...५.५१ लाख...२८,००० ते ३०,०००...५०...९५०...४.५ फूट रुंदीचे दोन गादीवाफे

एकरी कामाची तुलनात्मक स्थिती :

घटक पारंपरिक लागवड... यांत्रिक लागवड

मजूर संख्या... २५ ते ३० ... ८ मजूर व १ चालक

वेळ (तास).. .८ किंवा त्याहून अधिक सुमारे ७ तास.

मजुरी खर्च...१२ हजार रुपये... ६ हजार रुपये (मजूर, इंधन, चालक सर्व धरून)

सरासरी रोपांची संख्या (प्रति एकर)...१,९२ हजार... २,४० हजार

लागवड खोली...० ते १२ मिमी...२० ते २५ मिमी

मर होण्याचे प्रमाण...५ ते १० टक्के... ० ते १ टक्का

लागवडीपूर्व करावी लागणारी योजना :

१) ट्रॅक्टर गरज :

पन्नास एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर असल्यास यंत्र चांगल्या क्षमतेने कार्य करते. गती नियंत्रित करून कमी गती ठेवणारा क्रीपर गिअर त्यास असावा किंवा तो बसवून घ्यावा लागतो.

२) जमिनीची अवस्था :

खोल नांगरट करून पूर्वमशागत करताना ढेकळे रोटाव्हेटरच्या माध्यमातून फुटून माती बारीक भुसभुशीत होणे गरजेचे असते. जमिनीत लागवडीपूर्व अधिक ओल नसावी. वाफसा अवस्था असावी.

साधारण ४० ते ४५ दिवसांच्या कालावधीचे सशक्त उपटल्यानंतर दोन तासांच्या आत पुनर्लागवडीसाठी वापरले जावे.

यंत्राची रचना :

  • हायड्रॉलिक पद्धतीने यंत्र उचलण्याची सुविधा

  • दोन्ही बाजूंना टायर्स. गादीवाफ्यावर लागवड करताना रोपांची खोली गरजेनुसार करण्याची सुविधा

  • खुर्चीवर बसून पुनर्लागवड करताना रोपे टाकण्यासाठी २२ कपांची व्यवस्था

  • फिरत्या ‘कप-ट्रे’मधून नरसाळ्यासारख्या आकारातून गुरुत्वाकर्षण पद्धतीने रोपे खाली जाण्याची रचना

  • खाली गेलेली रोपे पक्षाची चोच (birds Beck Mechanism) असलेल्या आकाराच्या साच्यात जाऊन नुकसान न होता रोवण्याची सुविधा.

  • यंत्राच्या मागील भागात गादीवाफ्यावर लागवड झाल्यानंतर शेजारून लागवड सुरू करता यावी यासाठी मार्कर. लागवड झाल्यानंतर ट्रॅक्टर फिरवून घेणे शक्य.

  • ट्रॅक्टरला शाफ्ट जोडून ‘पीटीओ’चलित असून, ५४० आरपीएम गिअरवर कामकाज.

यंत्राच्या साह्याने लागवड करण्याचे फायदे :

  • दोन ओळींतील अंतर १४ सेमी व ओळीतील रोपांचे अंतर १०, १२ व १४ सेमी अंतराने निश्‍चित करता येते

  • लागवड केलेली रोपे आडवी न होता उभी असतात.

  • गरजेनुसार योग्य खोली निश्‍चित करून रोपे लागवड शक्य.

  • यंत्राद्वारे गादी व सपाट पद्धतीचे वाफे बांधणी करण्याची सुविधा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com