शाश्वत शेतीकडे वाटचाल सुरूच...

शेत बांधावरील प्रयोगशाळेच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेला सुरुवात झाली, ती एरंडा, मालेगाव (वाशीम) येथून. जय किसान शेतकरी गटाच्या ४ शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन. मग १७ ऑक्टोबर २०२० रोजी श्री चोंधे फार्म्स, वढू खुर्द (ता. हवेली, जि. पुणे), जय किसान शेतकरी गट एरंडा (ता. मालेगाव, जि. वाशीम), श्री रसाळ फार्म, निघोज (ता. पारनेर, जि. नगर) अशा चार ठिकाणी शेतबांधावरील प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली.
Laboratory Of Farm Bund
Laboratory Of Farm Bund Agrowon

शेत बांधावरील प्रयोगशाळेच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेला सुरुवात झाली, ती एरंडा, मालेगाव (वाशीम) येथून. जय किसान शेतकरी गटाच्या ४ शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन. मग १७ ऑक्टोबर २०२० रोजी श्री चोंधे फार्म्स, वढू खुर्द (ता. हवेली, जि. पुणे), जय किसान शेतकरी गट एरंडा (ता. मालेगाव, जि. वाशीम), श्री रसाळ फार्म, निघोज (ता. पारनेर, जि. नगर) अशा चार ठिकाणी शेतबांधावरील प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली. त्यामागे असे उद्दिष्ट होते, की शेतकऱ्यांनी स्वतःसाठी स्वतःच्या शेतातच नैसर्गिक (जैविक व सेंद्रिय) निविष्ठा बनवाव्यात. कारण या निविष्ठा बनविण्यासाठी आवश्यक ७० ते ८० टक्के घटक आपल्या घरात, शेतात किंवा गावात उपलब्ध असतात. काही गोष्टी विकत घेतल्या तर उत्तम खते, वाढ प्रवर्तके, कीडनाशके स्वतःच्या शेतावरच बनविता येतात. त्यातून पीक उत्पादनातील खर्चात मोठी बचत साधते. सेंद्रिय व जैविक घटकांच्या वापरातून उत्पादनात व दर्जात वाढ मिळते. जमिनीची क्षारता कमी होऊन सुपीकता वाढण्यात मदत मिळते.

Laboratory Of Farm Bund
Laboratory Of Farm BundAgrowon

मानव विकास मिशनचे आयुक्त नितीन पाटील, वाशीम जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार यांनी शेत बांधावरील प्रयोगशाळेला भेट देऊन कौतूक केले.

प्रयोगशाळा उभारणीसाठी प्रशिक्षण ः

शेतबांधावरील प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी थोडेसे प्रशिक्षण पुरेसे आहे. या प्रशिक्षणामध्ये जैविक व रासायनिक कीडनाशक म्हणजे काय, त्यातील फरक, नैसर्गिक घटकांचे महत्त्व, ते घरगुती पातळीवर कसे बनवता येईल, याची माहिती दिली जाते. सोबतच मातीचा नमुना कसा काढायचा, त्यातील किंवा शेणखत, गांडूळखतातून सूक्ष्मजीव कसे वेगळे काढायचे यांची प्रात्यक्षिके केली जातात. उपयुक्त आणि हानिकारक सूक्ष्मजीव कसे ओळखायचे, हे शिकवले जाते. पुढे त्यांची वाढ व जतन करणे, त्यातून अर्क, सूक्ष्मजीव मीडिया व फॉर्म्युलेशन तयार करणे शिकवले जाते.

  • यात प्रामुख्याने बुरशीजन्य सूक्ष्मजीव (ट्रा-यकोडर्मा, मेटारायझिम, बिव्हेरिया, व्हर्टिसीलिअम), जिवाणूजन्य सूक्ष्मजीव (बॅसिलस, स्युडोमोनास, लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया) निर्मितीचा समावेश.

जैविक अर्कामध्ये प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश.

१) घरातील गूळ, ताक, धान्य कडधान्यापासून जैविक स्लरी,

२) ट्रायकोडर्मापासून जैविक अर्क,

३) लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरियापासून जैविक अर्क,

४) सी विड, निम तेल, करंज तेल, पोटॅशियम हुमेट पासून जेलयुक्त निविष्ठा,

५) शेणगौरीवर सूक्ष्मजीवांचे कोटिंग किंवा आवरण तयार करणे,

६) तेलबियांच्या पेंडीवर ट्रायकोडर्माची बुरशी वाढवून त्यापासून जैविक अर्क,

७) शिल्लक चहापत्तीपासून जैविक अर्क निर्मिती,

८) सोयाबीन, कायटिन, कायटोझेनपासून जैविक अर्क निर्मिती.

Laboratory Of Farm Bund
Laboratory Of Farm BundAgrowon

पुणे येथील श्री चोंधे फार्ममध्ये पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रशिक्षण सुरू असताना.

दाणेदार सेंद्रिय खतांची निर्मिती.

१) बेसल डोससाठी थर्मल डिकंपोस्टिंग खत,

२) शाबूदाणा किंवा तांदूळ किंवा बेसनपीठ वापरून सी वीड, नीम तेल, करंज तेल, पोटॅशियम हुमेटपासून ग्रॅन्युल्स बनविणे.

सूक्ष्मजीव व जैविक अर्क निर्मितीसाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान

१)सॉलिड स्टेट फर्मेंटेशन

२) लिक्विड फर्मेंटेशन

३) सेमी सॉलिड फर्मेंटेशन.

आजवर तयार झालेल्या शेतबांधावरील प्रयोगशाळा ः

एकूण ३७

१) आधुनिक यंत्रणेवर आधारित प्रयोगशाळा ः पुणे (३), वाशीम (३), नगर (१), यवतमाळ (१).

२) मूलभूत प्रारूप (फक्त इडली कुकर व गॅस शेगडी/सिलिंडर वापरून) ः राहू, ता. दौंड, जि. पुणे (५), पारगाव सुद्रिक, ता. श्रीगोंदा, जि. नगर (५), पुरंदर (जि. पुणे) (३), फलटण (जि. सातारा) (१).

३) नियोजित (लवकरच सुरू होणाऱ्या) प्रयोगशाळा ः उस्मानाबाद (१), महुवा, भावनगर, गुजरात (१)

४) मानव विकास मिशन व कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या पुढील प्रयोगशाळांसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

वाशीम (१२; ११ प्रयोगशाळा व १ शेतकरी प्रशिक्षण केंद्र), पालघर (१ शेतकरी प्रशिक्षण केंद्र), राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, पुणे अंतर्गत आदिवासी शेतकरी बांधवांसाठी प्रयोगशाळा, गोहे (मंचर, पुणे)(१ प्रयोगशाळा)

प्रशिक्षण केंद्रे

१) पुण्यधाम आश्रम, कोंढवा, पुणे.

२) फार्म लॅब्ज, श्री चोंधे फार्म्स, वढू खुर्द, पुणे.

३) जय किसान शेतकरी गट, एरंडा, मालेगाव, वाशीम.

४) फार्म लॅब्ज, श्री साकला फार्म, यवतमाळ.

या शेतबांधावरील प्रयोगशाळेत केलेले विशिष्ट प्रयोग व त्यांचे निष्कर्ष ः

ट्रायकोडर्मासारखी बुरशी खालील घटकांवर खूप चांगल्या प्रकारे वाढते.

  • - वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांच्या मीडियावर. त्यात यीस्ट एक्स्ट्रॅक्ट, पेप्टोन, माल्ट एक्स्ट्रॅक्ट, नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्य इ.

  • -वेगवेगळ्या तेलबिया पेंडीवर. मशिन बेस तेलघाण्यापेक्षा लाकडी तेलघाण्यावरील पेंडीवर तिची वाढ अधिक चांगली होते.

  • -शेणाच्या गौरीवरही ट्रायकोडर्माची बुरशी चांगली वाढते. मात्र फक्त मायसेलियल प्रकार तयार होतो. कोनिडीयल प्रकार तयार होण्यासाठी त्यात काही विशिष्ट घटक (माल्ट एक्स्ट्रॅक्ट, पेप्टोन) टाकावे लागतात.

  • -हॉटेलमधील टाकाऊ अन्नपदार्थांवर.

  • -मेथीच्या जुडीच्या शिल्लक देठ, पालापाचोळा यांच्या रसातही चांगली वाढ होते.

  • -ट्रायकोडर्माप्रमाणे अन्य कोणते उपयुक्त सूक्ष्मजीव वाढतात, यांचा अभ्यास सुरू आहे.

पद्मभूषण डॉ. विजय भटकर (वरिष्ठ संगणक तज्ज्ञ), डॉ. प्रसाद वाडेगावकर (विभाग प्रमुख, बायोटेक्नॉलॉजी, अमरावती विद्यापीठ), षण्मुगराजन (जिल्हाधिकारी, वाशीम), नितीन पाटील (आयुक्त, मानव विकास मिशन, महाराष्ट्र), शंकर तोटावार सर (जिल्हा कृषी अधीक्षक, वाशीम.) अशा वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विविध बांधावरील प्रयोगशाळांना भेट दिली असून, ही नाविन्यपूर्ण संकल्पना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकेल, असे मत मांडले.

Laboratory Of Farm Bund
Laboratory Of Farm BundAgrowon

ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते दहावी वर्गातील मुलींसाठी घेतलेल्या प्रशिक्षण वर्गात सामील विद्यार्थिनी स्वतः जैविक घटकांची निर्मिती करताना.

शेतबांधावरील प्रयोगशाळेमुळे घडलेल्या बदलाचा आढावा

शेतकरी गट ः जय किसान शेतकरी गट, एरंडा, मालेगाव, वाशीम.

  • २०१० पर्यंत : १०० % रासायनिक पद्धतीने शेती.

  • २०११-२०१८ : बाजारातून वेगवेगळे सूक्ष्मजीव किंवा जैविक अर्क घेऊन एकात्मिक शेती करत होते.

  • २०१९ ते २०२० : स्वतः सूक्ष्मजीव किंवा जैविक अर्क शिकले.

  • २०२१ ते आजपर्यंत : स्वतः शिकून विदर्भ किंवा मराठवाड्यातील अन्य शेतकऱ्यांना ते प्रशिक्षण देत आहेत.

शेत पिकात आजपर्यंत झालेले बदल ः

  • २०१०- २०१५ : पारंपरिक पीक उत्पादन (तूर, सोयाबीन, हरभरा, गहू)

  • २०१६-२०२२ : पारंपरिक पिकांना भाजीपाला पिके (उदा. वांगी, मेथी पालक, कोथिंबीर, मुळा इ.), व फळपिकांची (उदा. डाळिंब, कलिंगड, संत्रा, सीताफळ, पेरू इ.), नगदी पिके (उदा. हळद, ऊस इ.) यांची जोड दिली आहे.

खताचा वापर व पिकाची उत्पादकता ः

  • रासायनिक खतांचा व कीडनाशकांच्या वापरात ५० टक्क्यांपर्यंत बचत.

  • काही शेतकऱ्यांना नत्रयुक्त खतांच्या वापरात ५० ते ७०% बचत.

  • नैसर्गिक व जैविक निविष्ठांसाठीच्या खर्चातही ४० ते ५०% बचत.

  • पिकाच्या उत्पादकता ४० ते ५० % वाढल्याचे निदर्शनास आले.

  • वाशीम व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विशिष्ट अनुभव ः

  • -शेतबांधावर तयार केलेल्या निविष्ठांमुळे तूर व हरभरा पिकातील मर रोगाचा प्रादुर्भावाची समस्या कमी झाली.

  • -सोयाबीन व हरभरा पिकात अधिक नैसर्गिक निविष्ठा वापरल्यामुळे त्यातील पोषकता व चव वाढली असावी. कारण हे पीक अवशेषही वेगवेगळी जनावरे आवडीने खाताना आढळली. म्हणजेच जनावरांनाही विषमुक्त अन्नाची चव कळते. माणसांना ती कधी कळणार, हाच खरा प्रश्न आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com