Agricultural Technology : शेतकऱ्यांच्या गरजांनुसार 35 हून अधिक यंत्रांची निर्मिती

पुण्यातील चांगली नोकरी सोडून त्यांनी अकोला या आपल्या गावाकडे वाट धरली. ३५ हून अधिक यंत्रांची निर्मिती व एक हजारांहून अधिक शेतकऱ्यांना विक्री याद्वारे तीन वर्षांहून अधिक काळ घेतलेली मेहनत आता नावारूपाला येऊ लागली आहे.
Agricultural Technology
Agricultural TechnologyAgrowon

एकीकडे गावाकडील काहींचे मोठ्या शहरात जाऊन नोकरी वा व्यवसाय करायचे स्वप्न असते. दुसरीकडे शालेय जीवनापासून मित्र असलेल्या अक्षय वैराळे (Akshay Vairale) आणि अक्षय कवळे (Akshay Kavale) या दोघांनी पुण्यासारख्या मोठ्या शहराकडून अकोला या आपल्या गावची वाट पकडली.

अक्षय बी.ई. (मेकॅनिकल), तर अक्षयनेही त्याच शिक्षणासह ‘एमबीए’ पदवी घेतली आहे. अक्षय सांगतात, की पुणे येथील कृषी अभियांत्रिकी विषयातील (Agricultural Engineering Subject) प्रसिद्ध कंपनीत नोकरीस होतो.

त्याचवेळी यंत्रे-अवजारे (Machines) याबाबत अधिक रस निर्माण झाला. त्यातून स्वतःचा व्यवसाय उभा राहू शकतो व शेतकऱ्यांच्या समस्या (Farmer Issue) सोडवल्या जाऊ शकतात असा विचार आला.

अखेर दोघा मित्रांनी तीन- साडेतीन वर्षे नोकरीचा अनुभव घेतल्यानंतर गावी ‘स्टार्टअप’ उद्योग उभारण्याची तयारी सुरू केली.

यंत्रनिर्मितीचा अनुभव

हा काळ होता २०१८ ते २०१९ चा. सुरुवातीला एक वर्ष शेतकऱ्यांकडे जाऊन मजूरबळ व यंत्राबाबतच्या त्यांच्या गरजा- समस्या जाणून घेतल्या.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात (Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University) जाऊनही अधिक माहिती घेतली. त्यानंतर ‘ॲग्रोश्युअर प्रॉडक्ट अँड इनोव्हेशन’ या ‘स्टार्ट अप बेस’ कंपनीची मुहूर्तमेढ रोवली.

केवळ ५०० चौरस फूट जागेत यंत्रनिर्मितीचे काम सुरू केले. कामाच व्याप वाढत गेला तसा रोजगारही निर्माण होऊ लागला.

सध्या चार ते पाचजण नियमित व हंगामात तेवढेच कामगार वाढवले जातात. ‘एमआयडीसी’ कडे प्रस्ताव देऊन सात हजार चौरस फूट आकाराचा भूखंड मंजूर झाला आहे. पुढील प्रयत्न सुरू आहेत.

यंत्रांची विविधता व वैशिष्ट्ये

१) आज शेतीची विभागणी झाल्याने क्षेत्र कमी झाले आहे. महागडी अवजारे खरेदी करणे, मजुरी देणे परवडत नाही हे ओळखून, तसेच छोट्या व मध्यम गटातील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन अवजारे विकसित केली.

२) महिलांना हाताळता येतील अशी कमी वजनाची व सुलभ असणारी यंत्रे बनविली.

३) आतापर्यंत सुमारे ३५ प्रकारच्या यंत्रांची निर्मिती. पंजी, बूमस्प्रेअर, कल्टिव्हेटर. (शासकीय अनुदान यादीत समाविष्ट).

४) कल्टिव्हेटर, पंजी, पट्टा पास, व्ही पास, फवारणी यंत्र, तिऱ्ही, एक्का, तीन पास, सारायंत्र, डवरे, बेड मेकर, रिजर, पेरणी यंत्र, सब सॉयलर अशी विविधता.

५) पॉवर वीडर व रीपर- डिझेल, पेट्रोलवर चालणाऱ्या इंजिनावर आधारित.

६) बाजारात उपलब्ध पॉवर वीडरमध्ये मुख्य ‘रोटाव्हेटर’चे काम राहते. मात्र ‘ॲग्रोश्‍युअर’च्या या यंत्राद्वारे मशागत, पेरणी, डवरे, कोळपे, फवारणी, सऱ्या पाडणे आदी कामेही होतात.

Agricultural Technology
VNMKV Implements : परभणी विद्यापीठ विकसित बैलचलित अवजारे उत्‍तर प्रदेशातही लोकप्रीय

७) खत एकसमान पसरविणारे ट्रॅक्टरचलित यंत्र. यात खताच्या पाच बॅग्ज बसतात. एकरी सुमारे तासाभरात हे काम होते.

८) साडेतीन एचपी क्षमतेचे इंधनचलित कोळपणी यंत्र. लहान तसेच मोठ्या अंतराच्या पिकांमध्ये उपयुक्त. (सोयाबीन, कापूस, हरभरा). त्यातून मजुरी खर्चात ६० ते ७० टक्के बचत होऊ शकते.

९) बैलजोडी वा ट्रॅक्टर पावसाळ्यात चालवणे कठीण होते. अशावेळी या यंत्राचा उपयोग. दिवसभरात चार एकर ते पाच एकर काम होते. लहान किंवा लांब पास लावण्याची सुविधा. फवारणीसाठीही उपयुक्त.

१०) महिलासुद्धा चालवू शकतात.

११) अशाच प्रकारचे मनुष्यचलित टोकण यंत्र. बियाण्याची एकसमान अंतरावर व योग्य खोलीवर टोकण करता येते. दाट किंवा पातळ न होता बियाण्याची बचत होऊ शकते.

दिवसभरात दोन ते तीन एकरांत टोकण होते. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर. सोयाबीन, हरभरा, कापूस, मका, तूर आदींमध्ये उपयुक्त.

१२) ट्रॅक्टरचलित डवरे. दिवसभरात २० एकरांतील डवरणी शक्य.

१३) ‘बेडमेकर’ अधिक मल्चिंग पेपर अंथरण्यासाठी यंत्र.

शेतकऱ्यांकडून प्रतिसाद

अक्षय म्हणाले, की यंत्र उपलब्ध करण्यापूर्वी कृषी विद्यापीठाकडे त्याच्या चाचण्या घेतल्या जातात. त्याचे अहवाल घेतले जातात. शेतकऱ्यांच्या शेतातही चाचण्या होतात. दोन वर्षांत एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत यंत्रे पोहोचविण्यात यश मिळवले आहे.

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण या राज्यांतील शेतकऱ्यांकडूनही विचारणा वाढली आहे. औरंगाबाद येथे यंदा १३ ते १६ जानेवारी काळात झालेल्या ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शनातही स्टॉल उभारला होता. त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.

स्पर्धेत मारली बाजी

भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून राबविण्यात येणाऱ्या ‘डीपीआयआयटी’अंतर्गत ‘स्टार्टअप’ उपक्रमात दोघा मित्रांनी भाग घेतला.

या विषयातील स्पर्धेत देशातील दोन हजार स्पर्धकांतून २९ जणांची निवड झाली. त्यात दोघांच्या यंत्राला महाराष्ट्रातून एकमेव स्थान मिळाले.

या उत्कृष्ट कामगिरीसाठी १० लाखांचे पाठबळ मिळाले. शिवाय कानपूर ‘आयआयटी’ तज्ज्ञांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

कौशल्य विकास विभागामार्फत जिल्हा नावीन्यता परिषदेकडूनही गौरव होऊन पाच लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे.

अक्षय म्हणाले, की भाभा अणू संशोधन केंद्राला (बीएआरसी) आम्ही ‘मिनी थ्रेशर’ यंत्र पुरवले आहे. ते ‘सिंगल फेज’वर चालते. त्याचे प्रयोग सुरू आहेत.

पुढील टप्प्यात ‘बीएआरसी’ व ‘आयसीएआर’ यांच्या संयुक्त कार्यक्रमासोबत करार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अक्षय कवळे, ८२०८८९४५६३, अक्षय वैराळे, ८८३०७४९०७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com