Agricultural Drone : बुलडाणा ः महाराष्ट्र शासन आणि मारुत ड्रोन्स यांनी एकत्रितपणे विकसित केलेला ‘मारुत’चा ‘AG365’ हा ड्रोन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (ता. ७) राज्यातील शेतकऱ्यांसाठी सादर केला. त्यांच्या हस्ते बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी लाभार्थ्यांना तो प्रदान करण्यात आला. या वेळी त्यांनी लाभार्थ्यांशी वैयक्तिक संवाद साधताना शेतीमध्ये ड्रोनच्या वापरासंदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रोत्साहित केले. ही कृषी क्षेत्रातील एक सकारात्मक आणि तांत्रिक प्रगतीच्या दिशेने पडलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले.
SMAM (सब-मिशन ऑन अॅग्रिकल्चर मेकॅनायझेशन) ही योजना कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरणाला चालना देणे, यांत्रिकीकरणाला बळकटी देणे यासाठी संपूर्ण भारतभर राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी पहिला आणि एकमेव ‘मारुत’चा ‘AG365S’ हा ड्रोन सादर करण्यात आला. या योजनेचा एक भाग म्हणून कृषी विभागामार्फत हा ड्रोन शेतीमधील अनेक कामांसाठी कसा उपयुक्त ठरू शकतो, याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
या ड्रोनची टक्कर होण्याची शक्यता ओळखून ते टाळणे, जिथून उड्डाण घेतली त्याच ठिकाणी सुरक्षितपणे परत येणे यासह अनेक विश्वासार्ह सुरक्षा वैशिष्ट्ये आहे. या वैशिष्ट्यांमुळे ते शेतकऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले. अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये वाढल्यास सुधारित कृषी पद्धती, पीक व्यवस्थापनामध्ये सुधारणा करणे शक्य होणार आहे. परिणामी, उत्पादनात वाढ शक्य होईल.
या कार्यक्रमामध्ये ‘मारुत ड्रोन’चे कार्यकारी अधिकारी प्रेम कुमार विस्लावथ म्हणाले, की अगदी दुर्गम भागातील जिल्ह्यातील शेतकरी समुदायाला भेडसाविणाऱ्या समस्या सोडविण्याच्या उद्देशाने मारुतचे तंत्रज्ञान पोहोचविण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ड्रोनचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अत्यंत आभारी आहोत. ‘मारुत’च्या ‘AG365’ या ड्रोनचा आरेखन आणि विकास करताना ते शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या कामामध्ये वापरण्यायोग्य बनविलेले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यासाठी केलेल्या गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळू शकेल. वापरण्यासाठी सुरक्षित असलेले हे ड्रोन आकाशामध्ये २२ मिनिटे उडून कामे करू शकतात. शासनाचा पाठिंबा आणि कृषी विभागांच्या भागीदारीमुळे ‘मारुत’चे तंत्रज्ञान खेडोपाड्यापर्यंत पोहोचू शकेल, असा विश्वास वाटतो.
‘मारुत ड्रोन’बद्दल...
मारुत ड्रोन्स ही २०१९ मध्ये तीन आयआयटी पदवीधरांनी स्थापन केलेली स्टार्टअप कंपनी आहे. त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक समस्यांवर ड्रोन-आधारित उपाययोजना देण्यावर आपले लक्ष केंद्रित केले असून, त्यात कृषी क्षेत्राला प्राधान्य दिले जात आहे. कृषी क्षेत्रातील विविध कामांसाठी आवश्यक त्या ड्रोन्सचे आरेखन, विकास आणि निर्मितीतून जागतिक अन्नसुरक्षेला मदत करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी या कंपनीला नुकतीच ४ दशलक्ष डॉलर इतकी गुंतवणूक उपलब्ध झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.