प्रत्येक ठिकाणची भौगोलिक स्थिती, जमिनी, सिंचन स्रोत समान नसतात. त्यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार मृद् व जल संधारणाचे उपाय करावे लागतात. सध्याच्या काळात शेतात मृदा आणि जलसंधारणाची (Soil And Water Conservation) कामे करुन घेण्याचा काळ आहे.
मृद् व जलसंधारण कामांच्या निर्मितीमध्ये तसेच देखभाल दुरुस्तीमध्ये लोकसहभाग फार महत्त्वाचा असतो. भूजलाचा (Grond Water) उपसा मोठ्या प्रमाणात होतो मात्र त्याप्रमाणात भूजलाचे पुनर्भरण होत नाही. परिणामी, भूजलपातळी खोल जात आहे.
भूजल म्हणजेच पावसाच्या पडलेल्या पाण्यापैकी जमिनीत मुरलेले पाणी. पिकाला वर्षभर पाणी उपलब्ध होण्यासाठी पडलेल्या पावसाच्या पाण्याचे संधारण करणे अतिशय महत्त्वाचे असते.
मृद्संधारणासाठी डोंगर उतारावर व पडीक जमिनीवर सलग समतल चर, बांधबंदिस्ती, नालापात्रात माती आणि सिमेंटचे बांध यासारखे कामे करणे गरजेचे आहे. यामुळे विहिरीतील पाणीपातळीत वाढ होऊन सिंचनक्षेत्रात वाढ होते.
परिणामी, पिकांच्या उत्पादकतेतही वाढ होते. जलसंधारणासाठी करण्यात येणाऱ्या उपायांमध्ये गॅबियन बंधारा बांधणे हा एक उपाय आहे.
ज्या ठिकाणी पाऊसमान जास्त आहे त्याठिकाणी गॅबियन बंधारा उपयुक्त ठरतो. तर हा गॅबीयन बंधारा कसा बांधायचा याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.
जाळीच्या सांगाड्यात दगडांचा जो बांध घातला जातो, त्याला ‘गॅबियन बंधारा’ असे म्हणतात.
ज्या ठिकाणी पर्जन्यमान आणि नाल्याच्या तळाचा उतार जास्त असतो. तेथे पाण्याच्या प्रवाहामुळे दगडी बांध टिकू शकत नाहीत. अशा ठिकाणी गॅबियन बंधारा उपयुक्त ठरतो.
पाण्याबरोबर वाहून येणारी माती बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला अडविली जाते. त्यामुळे जमिनीची धूप देखील रोखली जाते.
गॅबियन बंधारा बांधावयाच्या नाल्याची रुंदी १० मीटरपेक्षा अधिक नसावी. तसेच बंधाऱ्याची उंची १ मीटरपेक्षा जास्त नसावी.
नाल्याच्या वळणावर हा बंधारा बांधू नये. गॅबियन बंधाऱ्यासाठी निवडलेली जागा खडकाळ नसावी.
निवडलेल्या जागेत नाल्याच्या पात्रात दोन्ही बाजूंकडील काठ चांगले खोदून घ्यावेत. नंतर बांध बांधावयाच्या जागेवर १५ बाय १५ सेंमी आकाराची लोखंडी जाळी अंथरावी. त्या जाळीवर दगड रचून घ्यावेत.
मोठ्या दगडांमधील पोकळ्या लहान दगडांनी भरून घ्याव्यात. दगड रचून झाल्यानंतर जाळी तारेने बांधून घ्यावी. बांधाची माथा रुंदी ०.५० मीटर ठेवावी. तसेच बांधाच्या बाजूला १:१ या प्रमाणात उतार ठेवावा.
कोणत्याही परिस्थितीत पुरामुळे बांध वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी दगड उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी गॅबियन बंधारा बांधावा. गॅबियन बंधाऱ्यामुळे पाण्याबरोबर वाहून येणारी माती बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला अडविली जाते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.