फुटीच्या नियोजनातून हमखास घडनिर्मितीचे तंत्र

दर्जेदार व वजनदार घडांच्या निर्मितीसाठी फुटींची संख्या, काड्यांची जाडी वाढवून, पक्वता वेळेत साधण्यासाठी नियोजन करावे लागते. वेलीचे प्रत्येक पान कार्यक्षम राहण्यासाठी सूर्यप्रकाशात येईल, असे नियोजन करावे.
Grape
Grape Agrowon

घडनिर्मिती करता फुटींच्या संख्येचे नियोजन-

१) फुटीची संख्या

अ) बावर (मंडप) पद्धतीच्या मांडवात प्रति चौरस फुटास एक फूट असावी.

ब) वाय पद्धतीच्या मांडवामध्ये सव्वा चौरस फुटास एक फूट असे प्रमाण असावे. उदा. ९ × ५ म्हणजेच ४५ चौरस फूट अंतरामध्ये ३६ फुटी असाव्यात.

क) काड्या पसरून वाढवणे -

ठेवलेल्या काड्या सर्वत्र सारख्या पसरून वाढवल्या, त्यावरील जास्तीत जास्त पानांना व डोळ्यांना सूर्यप्रकाश मिळतो. त्यामुळे डोळ्यांमध्ये घडनिर्मिती सक्षम व मोठ्या आकाराची होते. अधिक पाने उन्हामध्ये आल्यामुळे ती प्रकाश संश्‍लेषणाद्वारे अधिक अन्न तयार करतात. त्याचा फायदा फळ छाटणीनंतर वजन व दर्जेदार उत्पादन मिळण्यासाठी होतो.

ड) काड्या कमी करण्याची वेळ व पद्धत -

-नवीन वाढलेल्या काड्यामध्ये एकाच ठिकाणी दोन काड्या असल्यास एकमेकांची व अन्य पानांची सावली पडते. अशा ठिकाणच्या काड्या कमी करून सर्वत्र सारख्या पसरून राहतील, असे नियोजन करावे. त्यासाठी काड्या नऊ ते दहा इंचाच्या झाल्यानंतर मध्यम आकाराच्या काड्या ठेवाव्यात. (म्हणजे फार जाड व फारच बारीक काड्या कमी कराव्यात.)

-आडव्या व जमिनीकडे वळलेल्या काड्यांना सूर्यप्रकाश कमी मिळतो. त्या काड्या सतत हलत्या राहतात. अशा प्रकारच्या काड्यामध्ये घडनिर्मिती कमी होते. म्हणून या लोंबत्या काड्या प्रथम कमी कराव्यात. शक्यतो उभ्या काड्या ठेवल्यास त्यांतील अधिक पानांना सूर्यप्रकाश मिळतो. तसेच एखाद दुसरी फारच मोठी फूट अथवा फारच छोट्या काड्या कमी कराव्यात. एक वयाच्या एक सारख्या आकाराच्या काड्या ठेवल्यास त्यांची पक्वता एकाच कालावधीत होते. त्यातून एक सारखी घडनिर्मिती मिळू शकते.

सबकेन करणे-

अ) जास्तीत जास्त काड्यांची किंवा सर्व काड्यांची सबकेन एका वेळेस केल्यास त्या एकाच वेळेस सबकेन टॉपिंगला येतात. एकसारखी घडनिर्मिती होऊन फळ छाटणीनंतर एकसारखी बाग फुटण्यास मदत होते.

ब) फुटींना दहा ते बारा पाने आल्यावर पाच ते सहा पानावर सबकेन करावी. त्याच वेळेस काही फुटी जर आठ पानांच्या असतील तरीही त्याची चार पाने ठेवून सबकेन करावी. म्हणजे जास्तीत जास्त सबकेन एका वेळेस होऊन जातील.

क) सबकेनच्या बगलफुटी कमी करणे-

सबकेन केल्यानंतर बगलफुटी वाढू लागतात. ८० टक्‍क्यांहून अधिक फुटींना दोन ते चार पाने आल्यावर पुढील एक बगलफूट ठेवून बाकीच्या बगलफुटी कमी कराव्यात. हे काम वेळेतच होणे आवश्यक आहे. फार उशीर झाल्यास सबकेनला जाडी कमी मिळते व लवकर पक्व होत नाही. परिणामी अन्नद्रव्याचा साठा कमी होतो. अंतिमतः घडांचा आकार छोटा राहतो. नानासाहेब पर्पल, जम्बो या द्राक्ष जातीस काड्या कमी ठेवून, एका काडीस दोन सबकेनसुद्धा आपणास करता येतील. जिथे माल कमी मिळण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी काड्यांची संख्या निम्म्यावर आणावी. एका काडीला दोन बगलफुटी म्हणजे दोन सबकेन ठेवून आपण घडनिर्मिती वाढवून घेऊ शकतो. तसेच काही ठिकाणी बाग फारच कमी फुटलेली असेल तर त्या ठिकाणी एका काडीला एक ऐवजी दोन किंवा तीन सबकेन धरून त्या ठिकाणच्या पानांचे क्षेत्रफळ व त्यावर नंतर येणाऱ्या घडांची संख्या आपण आत्ताच भरून काढू शकतो. सबकेन केल्यानंतर व बगलफुटी काढल्यानंतर ओलांड्यावर तळातून पुन्हा नव्याने काही फुटी फुटायला सुरुवात होऊन गर्दी होते. अशा नव्याने फुटलेल्या फुटी टॉपिंग करतेवेळी कमी कराव्यात. तळातील गर्दी कमी होऊन सर्व पाने व डोळ्यांना चांगला सूर्यप्रकाश मिळेल, ते सक्षम घडनिर्मितीकरिता फायद्याचे ठरते.

ड) सबकेनचे टॉपिंग- सबकेनला मागे आणि पुढे मिळून १४ ते १६ पाने आल्यावर टॉपिंग करावी. चौदावे- सोळावे पान आपल्या

करंगळीच्या नखाएवढे येताच टोकावरच टॉपिंग करावी. अगदी टोकावर टॉपिंग केल्याने पुढील शेंड्याला बगलफुटी लवकर फुटत नाही. अन्नद्रव्याचा साठा वाया जात नाही. तसेच पुन्हा पुन्हा शेंडे मोडावे लागत नाहीत. परिणामी, मजुरीही कमी लागते. या एकदम छोटी टॉपिंगचा दुसरा फायदा म्हणजे काड्या आडव्या पडत नाहीत. अधिक दिवस काडी उभी राहून जास्तीत जास्त पानांना सूर्यप्रकाश मिळतो. परिणामी अन्नसाठा वाढतो.

टॉपिंग वेळेत न झाल्यास होणारे तोटे-

सबकेनला १४ ते १६ पाने आल्यावर टॉपिंग वेळेतच झाली पाहिजे. जर सतरा-अठरा पाने किंवा त्यापेक्षा जास्त पाने आल्यानंतर टॉपिंग केल्यास,

१) काड्या आडव्या पडतात, काही काड्या जमिनीकडे लोंबत्या राहतात. पाने पानावर पडतात. तळातील पाने सावलीत येऊन घडनिर्मिती कमी होते. वजन मिळत नाही.

२) काडीची पक्वता उशिरा येते. त्यातच पाऊस लवकर सुरू झाल्यास काडीची पूर्ण पक्वता होत नाही. त्याचा घडनिर्मितीवर वाईट परिणाम होतो.

३) ज्या काड्या जमिनीकडे लोंबत्या असतात, त्यांचे पेरे मोठे होतात. घडनिर्मिती कमी होण्याचे हेही एक कारण असते.

४) पुढे ढगाळ व पावसाळी वातावरण तयार होते. अशा हवामानात घडनिर्मिती कमी होऊन उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

५) टॉपिंगला उशीर झाल्यास काड्यांची गुंतागुंत वाढून अधिक मजुरी लागते.

सूर्यप्रकाश व घडनिर्मिती संबंध -

वीस वर्षे चाललेल्या प्रयोगाचे निष्कर्ष अमेरिकेतील डॉ. मार्क ॲलन मॅथ्यूस यांनी द्राक्ष पिकामध्ये सूर्यप्रकाश व घडनिर्मिती यातील संबंधांचा अभ्यास व प्रयोग सुमारे वीस वर्षे केले. त्याचे निष्कर्ष थोडक्यात,

१) जेथे डोळ्यावर सूर्यप्रकाश पडला नाही, तेथे फारच कमी घडनिर्मिती झाली. बऱ्याच ठिकाणी घडनिर्मिती झालीच नाही.

२) जसा काडीवर सूर्यप्रकाश पडतो, तसतशी काडीची जाडी व पक्वता वाढून घडनिर्मिती चांगली होते.

सूर्यप्रकाश सर्वत्र चांगला मिळण्यासाठी, १) नेमक्या फुटी, २) वेळेत टॉपिंग, ३) माफक पाणीपुरवठा, ४) डोळ्यांपर्यंत सूर्यप्रकाश जाईल अशी काडी संख्या व त्यावरील पानांची मांडणी अशा गोष्टी करणे महत्त्वाचे आहे.

फळ छाटणीनंतर दर्जेदार माल व वजन मिळण्याकरिता अन्नसाठा तयार करून घेण्यासाठी अटी

१) काडीची जाडी आठ ते दहा मि.मी. असावी. मामासाहेब पर्पल, जम्बो या जातींमध्ये ती दहा ते बारा मि.मी. असावी.

२) सर्व काड्या एक सारख्या जाडीच्या असाव्यात. एक सारख्या वयाच्या असाव्यात.

३) पाने हिरवी, जाड पण लवचिक असावीत. पिंगट पिवळट नसावी. चकाकणारी निरोगी असावीत.

४) पान संख्या एका काडीस १४ ते १५ पाने असावी.

५) ७५ टक्के पाने सूर्यप्रकाशात असावीत.

६) ४० टक्के सूर्यप्रकाश जाळीदारपणे जमिनीवर पडावा.

७) जास्तीत जास्त काड्या उभ्या राहिल्यास जास्त पाने सूर्यप्रकाशात येतात.

------

पानांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ॲसिड २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात दर १५ दिवसांनी एक या प्रमाणे ४ ते ५ फवारण्या उपयोगी ठरू शकतात. यामुळे पानांचा हिरवेपणा वाढतो. पानांची जाडी वाढते. पानांचा टिकाऊपणा वाढतो. त्याचबरोबर पोटॅश व फॉस्फरस वेलीस उपलब्ध होते. काही प्रमाणात डाऊनी नियंत्रणातही उपयोगी ठरत असल्याचे दाभोळकर प्रयोग परिवारात केलेल्या प्रयोगात आढळले आहे. तथापि, ही अधिकृत शिफारस नाही.

--------

वासुदेव काठे, ९९२२७१९१७१

(लेखक कृषी पदवीधर असून, दाभोळकर प्रयोग परिवाराचे महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com