

चंद्रपूर - जिल्ह्यातील वायगाव भोयर येथील एका शेतकऱ्याने सोयाबीनचे नवे वाण (New Verity Of Soybean) विकसित केले आहे. सुरेश बापुराव गरमडे (Suresh Bapurao Garmade) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. गरमडे यांनी शोधलेल्या सोयाबीनच्या वाणाला केंद्र सरकारच्या दिल्लीस्थित वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाने (Protection of Plant Varieties and Farmers' Rights Authority) कायदेशीर मान्यता दिली आहे. सोयाबीन वाणासाठी असे अधिकार मिळवणारे गरमडे हे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी ठरले आहेत.
हेही वाचा - आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनमधील तेजी टिकून गरमडे हे सोयाबीन उत्पादक शेतकरी (Soybean Producer Farmer) असून बारा वर्षांपूर्वी त्यांच्या सोयाबीनच्या शेतामध्ये त्यांना वेगळ्या गुणधर्माच्या दोन वनस्पती आढळून आल्या. धानाच्या एचएमटी वाणाचे जनक स्वर्गीय दादाजी खोब्रागडे यांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी सतत आठ वर्ष बियाण्याची वाढ करत त्याचे जतन व संवर्धन केले. हे वाण प्रतिकूल हवामानातही 'यलो मोझॅक’ रोगाला बळी पडत नसून एकरी १७ क्विंटल उत्पादन देते. नव्या सोयाबीन वाणाची वैशिष्ट्ये - - एसबीजी-९९७ वाणाच्या झाडाची उंची ७५ सेंटीमीटरपर्यंत वाढते. - एका झाडाला १४० ते १५० शेंगा लागतात. तीन ते चार दाण्याच्या शेंगा सर्वाधिक असतात. - इतर जातीच्या तुलनेत यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त आहे. - एकरी १७ क्विंटल उत्पादन देते. - हे वाण प्रतिकूल हवामानातही 'यलो मोझॅक’ रोगाला बळी पडत नाही. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सुरेश गरमडे यांच्या शेतीची वारंवार पाहणी केली होती. सलग आठ वर्षांपासून एकच निष्कर्ष हाती येत असल्याने कृषी अधिकारीदेखील थक्क झाले होते, असा दावा सुरेश गरमडे यांनी केला आहे. अशा शेतकरी उपयोगी वाणाचे पेटंट मिळवण्यासाठी गरमडे यांनी वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण कायदा २००१ अंतर्गत महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या पाठपुराव्यातून पुणे येथे स्थापन झालेल्या पेटंट प्राधिकरण कार्यालयात मे २०१८ मध्ये प्रस्ताव दाखल केला होता. हा प्रस्ताव दिल्ली येथील मुख्य कार्यालयात पाठवण्यात आला होता. त्यानंतर सलग तीन वर्ष सोयाबीन संशोधन केंद्रात या वाणाचा मागोवा घेण्यात आला होता. तिथे सुद्धा हे वाण सरस आणि वेगळे आढळून आल्याने वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाने गरमडे यांना त्यांच्या जातीचे उत्पादन, विक्री, बाजार, वितरण, आयात किंवा निर्यात करण्याचा अधिकार दिले आहेत. हे वाण सोयाबीनच्या उत्पादनामध्ये क्रांती ठरू शकते. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करू शकते. म्हणून हे वाण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ, असा निर्धार गरमडे यांनी व्यक्त केला आहे. प्रचलित जातींपेक्षा या सोयाबीनची चकाकी आणि रंग गळद असल्याने इतर सोयाबीनच्या तुलनेत या सोयाबीनला जास्त भाव मिळतो असे मत शेतकरी विनोद सावसाकडे यांनी व्यक्त केले. वाण हक्क संरक्षणाच्या कामात गरमडे यांना अनेकांनी सहकार्य केले. त्यामध्ये प्राधिकरणाचे उपसचिव डॉ. एस. बी. गुरव, आत्मा संचालक मनोहरे, तत्कालीन कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, कृषी अधिकारी जयंत धात्रक, तालुका कृषी अधिकारी प्रकाश, श्री.काळे, आत्मा तालुका समन्वयक श्री घागी प्रगतिशील शेतकरी विनोद राऊत, श्रीकांत एकुडे यांचा समावेश आहे.
सोयाबीन संशोधक शेतकरी सुरेश गरमडे यांना एसबीजी-९९७ वान हे संरक्षीत केले आहे. कृषी विभाग त्यांना विविध पातळ्यांवर मदत करत असून महाराष्ट्रात बियाणे विक्रीचा परवाना त्यांना मिळावा यासाठी सहकार्य करणार आहोत. - भाऊसाहेब वऱ्हाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर
सध्या सोयाबीनचे काही वाण कालबाह्य झालेले आहे. त्या ठिकाणी एक वेगळी सोयाबीन जात पुनर्स्थापित करणे गरजेचे होते. ही गरज एसबीजी-९९७ पूर्ण करू शकते. - मारोतराव पालारपवार, माजी प्राचार्य व सोयाबीन संशोधक
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.