चंद्रकांत जाधव
Farm tools : मूळचे मध्य प्रदेशातील व रावेर (ता. जळगाव) येथे स्थायिक झालेल्या अनिल चौधरी यांनी वडिलांचा यंत्रे- अवजारे निर्मितीचा व्यवसाय हिमतीने व मेहनतीने नावारूपाला आणला आहे. शेतकऱ्यांची निकड व मागणी लक्षात घेऊन तयार केलेल्या तसेच श्रम व पैशांत बचत करणाऱ्या विविध तंत्रशुद्ध यंत्रांनी चांगली पसंती मिळवली आहे.
जळगाव जिल्ह्यातील वाघोदा बुद्रुक (ता. रावेर) गावास सातपुड्यातील गारबर्डी धरणाचा फायदा होतो. मुबलक पाण्यामुळे परिसरात समृद्धी आहे. केळी व अन्य फळपिकांची शेती वाढली. काही शेतकरी देशी कापसाचेही जोमदार उत्पादन घेतात. गावाला काळी कसदार जमीन लाभली आहे.
चौधरी यांचा अवजारे उद्योग
मूळच्या मध्य प्रदेशातील लोणी (जि. बऱ्हाणपूर) येथील व रावेर येथे स्थायिक अनिल चौधरी यांची वाघोदा बुद्रुक येथे अवजारे निर्मितीची कार्यशाळा (वर्कशॉप) आहे. आज ती नावारूपाला आली आहे. उदरनिर्वाहासाठी १९६८ मध्ये त्यांचे वडील काशिराम यांनी जळगाव जिल्हा गाठला. कृषिपंप दुरुस्ती व तत्सम कामे ते करू लागले. शिक्षण घेत असताना अनिल व त्यांचे बंधू फावल्या वेळेत वडिलांना मदत करायचे. अडचणींचा सामना करीत कुटुंबाचा चरितार्थ सुरू होता. दरम्यान, अनिल यांनी बांधकाम (सिव्हिल) विषयातील पदविका घेतली. वडिलांनीही शेती अवजारे निर्मिती व्यवसाय सुरू केला. जबाबदाऱ्या एकामागून एक अंगावर आल्या. मग पुढील शिक्षण घेणे अनिल यांना शक्य झाले नाही. त्यांनी वडिलांसोबत कार्यशाळेत अनुभव घेण्यास सुरुवात केली. सन १९८९ मध्ये रावेरपासून पंधरा किलोमीटरवरील वाघोदा बुद्रुक येथे अवजारे निर्मितीचे युनिट सुरू केले. शेतीत १९९४-९५ नंतर यांत्रिकीकरण वाढू लागले. पंचक्रोशीत केळी, उसाची शेती मोठी असल्याने अनिल यांच्याकडे यंत्रांची मागणी होऊ लागली. शेतकऱ्यांच्या गरजांनुसार यंत्रांची निर्मिती होऊ लागली. आज साडेआठ हजार चौरस फुटाच्या ‘वर्कशॉप’मध्ये पाच कुशल कामगारांसह व्यवसाय विस्तार झाला आहे. लहान बंधू सुनील, काका वामनराव व रामदास हे देखील फॅब्रिकेशन, अवजारे व तत्सम व्यवसायात गुंतले आहेत.
चौधरी यांच्याकडील अवजारे व तंत्र
ट्रॉलीचे संतुलन
वाघोदा बुद्रुक परिसरात केळीच्या बागा अधिक आहेत. शेतरस्ते खराब झाल्याने ट्रॅक्टर ट्रॉली एका बाजूला झुकून उलटते. या समस्येवर अनिल यांनी अभियंत्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करून ट्रॉलीत सुधारणा केल्या. ट्रॉलीच्या टायर जवळील भागात एक चौरस फूट आकारापेक्षा कमी असलेल्या प्लेट्स बसविल्या. मजबूत लोखंडाचा उपयोग प्लेट निर्मितीसाठी केला. या तंत्रामुळे ट्रॉलीची उंची कमी होऊन तिचे संतुलन होण्यास मदत झाली. ती उलटण्याची समस्या कमी झाली. शेतकरी माती, शेणखताची वाहतूक करतात. उंच भागात ट्रॅक्टर चढताना ट्रॉलीतील मातीच्या वजनामुळे ते उलटतात. ही समस्या लक्षात घेऊन ट्रॅक्टरच्या पुढील बाजूस एक ते दीड क्विंटल वजनाचे तणाव तयार केले आहेत. यामुळे ट्रॅक्टरची पुढच्या चाकांवर दबाव येऊन त्याचेही संतुलन होण्यास मदत झाली.
ट्रॉलीची निर्मिती
-मागील म्हणजे एका बाजूला तसेच मागे, उजव्या, डाव्या बाजूला ‘फोल्ड’ होऊ शकणाऱ्या ट्रॉलीची
निर्मिती.
-बारा बाय १० फूट व १० बाय अडीच फूट अशा आकारात दरवर्षी २५ ते ३० ट्रॉली तयार होतात.
-चार टन त्यांची वजन क्षमता.
-काळानुसार मिनी ट्रॅक्टरसाठी मिनी ट्रॉलीचीही निर्मिती. ट्रॉलीसोबत पांजरही देण्यात येते.
फिरती झोपडी
शेतात, सिंचन किंवा रस्ते प्रकल्प आदी ठिकाणी पावसापासून सुरक्षा, सावली या बाबी लक्षात घेऊन फिरती झोपडी तयार केली आहे. ती एका ‘अँगल’वर उभी राहू शकते. घडी करून कुठेही नेता येते. तिचे छप्पर मजबूत ताडपत्रीच्या आधारे केले आहे. त्यास अनेकांकडून मागणी आहे.
हळद ‘बॉयलर’मध्ये सुधारणा
रावेर, यावल व लगत मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर भागात हळदीचे क्षेत्र मोठे आहे. अनेकांनी चौकोनी बॉयलर आणले. मात्र त्यात स्फोट झाल्याच्या घटना घडल्या. या समस्येचा अनिल यांनी अभ्यास केला. बारकावे लक्षात घेतले. त्यातून गोलाकार स्वरूपातील ‘बॉयलर’ तयार केले. त्यात ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ बसविला. त्यामुळे स्फोट होण्याची जोखीम दूर झाली. हे यंत्र ट्रॅक्टर, बैलगाडीला जोडून नेणे शक्य आहे. एक क्विंटल हळद उकळण्यासाठी पूर्वी पाच ते सहा किलो लाकूड लागायचे. आता ते केवळ तीन किलो लागते.
अन्य यंत्रे
-विविध क्षमतेचे पाण्याचे टॅंकर तसेच ट्रॉली कम टँकर- क्षमता तीन हजार लिटर.
-ऊस वाहतुकीसाठी चारचाकी ट्रॉली. त्यास नंदुरबार व अन्यत्र ठिकाणाहून मागणी.
-केळीच्या सऱ्या पाडणारे यंत्र. पल्टी नांगर, ट्रॅक्टरचलित ‘डिक्स हॅरो’.
-भारनियमन लक्षात घेऊन कृषिपंप सुरू करणारे जनरेटर.
व्यवसायातील ठळक बाबी
-ट्रॉलीचा हितेंद्र ट्रेलर हा ब्रॅण्ड प्रसिद्ध. बुलडाणा, धुळे, नंदुरबार, जालना, मध्य प्रदेशातील खांडवा, बऱ्हाणपूर, जळगाव जिल्ह्यांतील विविध तालुक्यांत यंत्रांची विक्री. एक हजारपेक्षा अधिक ट्रॉली गावोगावी दिल्या.
-कार्यशाळा बारमाही सुरू असली तरी वर्षातील काही दिवस मंदीचेही असतात. तर काही वेळेस फुरसतही नसते. परिसरात पिकांबाबत स्थिती अनुकूल असली व शेतकऱ्याकडे दोन पैसे आले तरच तो यंत्रांत गुंतवणूक करतो. त्यावर व्यवसायाचे गणित अवलंबून असल्याचे अनिल सांगतात. व्यवसायात स्पर्धा वाढली आहे. यामुळे नावीन्य, सुधारणा याला महत्त्व आले आहे. सध्या वर्षाला २० ते ३० लाख रुपयांवर त्यांची उलाढाल पोहोचली आहे.
कार्याचा सन्मान
-जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वी यशस्वी कृषी यंत्र निर्माते, उपक्रमशील उद्यमी म्हणून अनिल यांचा गौरव.
-तांत्रिक अडचणी, गरजा लक्षात घेऊन सेवाभाव जोपासला.
-आर्थिक समस्यांमुळे एकेकाळी मूळ गावाहून स्थलांतर करावे लागले. पण कौशल्य, मेहनत व प्रामाणिकपणा यातून व्यवसाय मोठा केला.
-शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन अडचणी, त्रुटी दूर करण्याची तयारी.
-शेतकऱ्यांशी सतत संपर्क, अवजारांचे तंत्र अभ्यासण्यासाठी राज्याबाहेरही दौरे.

अनिल चौधरी, ८६२४९५००८८, ९७६६८३५०६६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.