डॉ. सुजित यमगर
Smart Agriculture : पॉलिहाउस आणि शेडनेटमध्ये टोमॅटो, सिमला मिरची, काकडी तसेच फूल आणि औषधी वनस्पतींचे दर्जेदार उत्पादन घेतले जाते. या पद्धतीमध्ये अचूकता, कार्यक्षमता आणि पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाची गरज आहे. याचाच विचार करून, पॉलिहाउस आणि शेडनेटमध्ये शेतकऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यास नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी विद्युत मल्टी टूल वाहक यंत्राची निर्मिती केली आहे. हे एक आधुनिक कृषी यंत्र आहे. विशेषतः हरितगृह आणि सुरक्षित शेतीमध्ये या यंत्राचा वापर करण्यात येतो.
मल्टी टूल वाहक यंत्राच्या साह्याने शेतीमधील विविध प्रक्रियांना एकाच यंत्राने हाताळता येते. या यंत्राच्या साहाय्याने जमिनीची तयारी, गादीवाफा निर्मिती, फवारणी आणि परागीकरण करता येते. याशिवाय, यंत्राच्या साहाय्याने पिकांची हाताळणी, काळजी घेणे, छाटणी आणि वाहतूक यांसारखी पूरक कामे करता येतात. शेतीतील ही नवकल्पना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना त्यांच्या कामात अधिक परिणामकारकता आणण्यास सक्षम बनवते.
यंत्राची वैशिष्टे
हे यंत्र बॅटरीवर चालते. त्यामुळे पारंपरिक डिझेल इंजिनांच्या तुलनेत इंधनाचा खर्च आणि उत्सर्जनामुळे होणारे प्रदूषण कमी होते.
इंजिन चालित यंत्रणेमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालणे शक्य आहे.
शेतकऱ्यांच्या खर्चात बचत,पर्यावरण स्नेही तंत्रज्ञान.
हरितगृह, शेडनेट शेतीमध्ये वापरण्यासाठी फायदेशीर.
लहान आणि मध्यम प्रमाणात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त. यामुळे वेळ आणि श्रमांची बचत. संसाधनांचा जास्तीत जास्त वापरकरून पीक उत्पादनात सुधारणा.
शेतातील कामे अधिक सहज आणि जलदगतीने पूर्ण करण्याची क्षमता.
यंत्राची कार्यक्षमता
हे यंत्र चालविण्यास सहज सोपे आहे.
ट्रॅक रुंदी आणि टायरच्या पृष्ठभागाने मृतभार आणि गतीमध्ये बदल होऊन देखील कोणतेही महत्त्वाचे फरक दर्शवले नाहीत.
स्लिपेज, विद्युत प्रवाह, व्होल्टेज आणि शक्ती मृतभार आणि गती वाढल्यामुळे वाढते.
यंत्राने रस्त्यावर २० किमी प्रति तासाच्या गतीने ४०० किलो भार यशस्वीपणे वाहून नेला.
कमाल वळण व्यास आणि कमाल क्लिअरन्स व्यास अनुक्रमे ६.९ मीटर आणि ७.७५ मीटर आहे.
यांत्रिक ब्रेकसह थांबण्याचे अंतर १.७५ मीटर आणि विद्युत ब्रेकसह ३.५ मीटर मोजले गेले.
डॉ. सुजित यमगर, ९७३०७६४४७७
(कृषी उपकरणे आणि ऊर्जा विभाग, भारतीय कृषी संशोधन संस्था,नवी दिल्ली)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.