Efforts to prevent over exploitation : आवडीचे अन्नपदार्थ असतील, तर जसे आपण गरजेपेक्षाही जास्त म्हणजे तडस लागेपर्यंत खाऊ शकतो, तसेच वनस्पतीही त्यांच्या गरजेपेक्षा जास्त अन्नद्रव्याची उचल करू शकतात. मका रोपे ही त्यांना आवश्यक असलेल्या स्फुरदाच्या प्रमाणापेक्षा २५ ते ८० टक्के अधिक स्फुरद घेत असल्याचे वेस्ट लाफायेट (इंडियाना) येथील कृषी संशोधन सेवेत (ARS) कार्यरत शास्त्रज्ञांनी शोधले आहे. हे अतिप्रमाणात घेतलेल्या स्फुरदामुळे मका पिकाचे तर नुकसान होतेच, पण जमिनीही निकस होत जातात. हे टाळण्यासाठी शास्त्रज्ञ सध्या प्रयत्न करत आहेत.
मका पीक हे अन्नद्रव्याची उचल मोठ्या प्रमाणात करत असल्यामुळे त्यांना खादाड पीक म्हणून ओळखले जाते. काही वेळी ते इतके अधिक स्फुरद शोषते, की त्याचा उत्पादनावर विपरित परिणाम होतो. नत्र आणि पालाशचे शोषण अधिक होत असल्याचे पूर्वीच्या अभ्यासातून पुढे आले होते.
स्फुरदाबाबत असा कोणताही थेट संबंध अद्याप स्थापित झालेला नसल्याचे राष्ट्रीय मृदा धूप प्रयोगशाळेतील मृदाशास्त्रज्ञ चाड पेन यांनी सांगितले. त्यामुळे अधिक संशोधन करताना चाड पेन आणि पर्ड्यू विद्यापीठाचे कृषिशास्त्राचे प्रा. जेम्स कॅम्बेराटो व त्यांचे पदवीचे विद्यार्थी मॅट विथॉर्न यांनी अत्याधुनिक "ग्रो रूम" आणि हायड्रोपोनिक्स प्रणाली वापरून प्रयोग केले.
यात वाळूने भरलेल्या भांड्यांमध्ये मकाची वाढ केली. यात मुळांलगतचे वातावरण आणि स्फुरद वापरण्याची वेळ अचूकपणे नियंत्रित करता आली. त्यातून स्फुरदाच्या जैव उपलब्धतेवर लक्ष ठेवणे शक्य झाले. यातून जैविक आणि रासायनिकदृष्ट्या बाहेरील शेताप्रमाणेच मक्याचे पीक तयार होते. संशोधकांनी २०१९ मध्ये मक्याचे अनेक संकरीत वाण वापरून प्रयोगांना सुरुवात केली. त्याचे निष्कर्ष अॅग्रोनॉमी जर्नल (जानेवारी २०२३) मध्ये प्रकाशित केले.
निष्कर्ष
मक्याच्या संकरीत रोपांना कमाल धान्य उत्पादनापर्यंत पोहोचण्यासाठी प्रति झाड सरासरी ५८० मिलिग्रॅम स्फुरद आवश्यक असते. त्यापेक्षा जास्त स्फुरद उचल केलेल्या झाडांच्या धान्य उत्पादनात घट झाली. या अधिक प्रमाणामुळे मुळांपासून धान्यापर्यंत तांबे आणि झिंकची हालचाल (लिप्यंतरण) कमी होत असल्याचे पेन म्हणाले.
सध्या मका पिकासाठी स्फुरदाच्या असलेल्या शिफारशी अधिक अचूक करण्याची आवश्यकता या संशोधनातून पुढे आली. कारण आपण खते देत असताना जमिनीमध्येही कमी अधिक प्रमाणात अन्नद्रव्ये शिल्लक असतात. त्यांचा वापरही पिकाच्या मुळाकरवी केला जातो. त्यामुळे जमिनीमध्ये असलेल्या घटकांचे प्रमाणही आपल्याला अचूकतेने माहिती असणे गरजेचे आहे. कारण अचूक ५८० मिलिग्रॅम स्फुरद रोपाला पुरवणे शक्य होईल. स्फुरद हेही एक नैसर्गिक उपलब्ध घटक असून, विविध देशांतील खाणींतून त्यांचे उत्खनन करून जगभर निर्यात केले जाते.
पी ट्रॅप प्रणाली़
पेन यांच्या अन्य एका संशोधनातून पी-ट्रॅप ही प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. या सॉफ्टवेअरच्या सहसंशोधनामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतामधील स्फुरदाची नेमकी उपलब्धता, ते पिकांना उपलब्ध करण्याचे नियोजन शक्य होते. यामुळे दिलेल्या खतातून जमिनीमध्ये शिल्लक राहणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण कमी करणे शक्य होते. सामान्यतः जमिनीमध्ये शिल्लक राहणारे हे जादाचे स्फुरद पावसाच्या पाण्यासोबत वाहून जलस्रोतात जाते. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता खराब होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.