
राज्यामध्ये सुमारे ८५.१० टक्के शेतकरी अल्प व मध्यम गटातील असून त्यांची भूधारण क्षमता सरासरी १.४ हेक्टर एवढी आहे. शेतीत मजूर आणि पशुधन संख्या कमी होत चालल्याने ट्रॅक्टर व त्यावर आधारित यंत्रांचा (Agriculture Machinery) वापर वाढला आहे. तरीही अल्प व मध्यम क्षेत्रधारक तसेच डोंगराळ भागातील शेतकरी अजूनही बैलचलित यंत्रांचा (Bull Drawn Equipment's) वापर करीत आहेत. याच यंत्रावर संशोधन करण्याच्या दृष्टीने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पांतर्गत विविध राज्यांत नऊ केंद्रे स्थापन झाली आहेत. पैकी २०१० मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे पशुशक्तीचा योग्य वापर योजना केंद्र स्थापन झाले.
शेतकऱ्यांची निकड ओळखली
मराठवाडा, विदर्भ विभागातील शेतकरी आंतरपीक पध्दत अवलंब करतात. शेतीकामांसाठी बैलजोडीचा वापर करतात. हीच बाब परभणी येथील केंद्राने लक्षात घेतली. विविध जिल्ह्यांतील कृषी हवामान विभागानुसार पीक पद्धती, जमिनीचा प्रकार, पशुधन, पारंपारिक अवजारे, पशुखाद्य आदी बाबींची तपशीलवार माहिती संकलित केली. त्यानुसार त्या त्या भागातील बैलचलित यंत्रांची निकड लक्षात घेऊन संशोधनावर भर देण्यात आला.
विविध यंत्रांवर संशोधन
बैलांचा बहुद्देशीय वापर व्हावा, त्यांचे कामांचे वार्षिक तास वाढावेत यासाठी बैलचलित रोटरी यंत्राच्या साहाय्याने शेततळ्यातील तसेच कूपनलिकेतील पाणी उपसणी यंत्र, प्रक्रिया यंत्रे विकसित करण्यात आली. बैलचलित यंत्रे कार्यक्षमतेने वापरता यावीत यासाठी मराठवाड्यातील लाल कंधारी, देवणी या देशी गोवंश पशुधनाच्या ओढशक्तीचा अभ्यास करण्यात आला. त्यातून धसकटे गोळा करणारे, लोखंडी वखर, विविध लाकडी जू, क्रिडा टोकण, सौर फवारणी, कापूस टोकण, दोन व तीन पासेचे कोळपे, ऊस आंतरमशागत, माती लावण व आंतरमशागत, गादी वाफ्यावरील हळद व आले काढणी, एक बैलचलित वखर, सुधारित बैलगाडी, बैलचलित खत पसरणी यंत्र आदी यंत्रे विकसित करण्यात आली आहेत. आरामदायी गोठ्याबाबतही संशोधन झाले.
यंत्रांचा प्रसार
प्रक्षेत्रावरील प्रात्यक्षिकांद्वारे कृषी विज्ञान केंद्र, स्वंयसेवी संस्था यांच्यामार्फत राज्यातील १७ ठिकाणी यंत्रांचे संच देण्यात आले. त्यात मराठवाडा व विदर्भातील विविध जिल्ह्यांचा समावेश आहे. धारामित्र संस्था (जि. वर्धा), शेतकरी गट ( लातूर), गोविज्ञान संशोधन केंद्र, देवलापार, नागपूर यांनाही यंत्रांचा पुरवठा करण्यात आला. शेतकऱ्यांकडून त्यास चांगली पसंती आहे.
ठळक यंत्रांची वैशिष्टे
१)बैलचलित बहुपीक टोकण यंत्र
-बियाणे, खत योग्य प्रमाणात देणे शक्य होते. दोन फणांतील अंतर गरजेनुसार बदलता येते.
-वेळ, बियाणे वापरात २० टक्क्यांपर्यंत, मजुरीवरील खर्चात ६५ टक्के तर पेरणीच्या खर्चात ३० ते ५० टक्क्यांपर्यंत बचत शक्य होते. प्रतिदिन पाच एकरांत पेरणी करता येते.
२)कापूस टोकण व खत पेरणी यंत्र
या यंत्राव्दारे खते व बियाणे एकाच वेळी पेरणे शक्य होते. दोन ओळीतील अंतर ९०, १२०, १३५ , १५० सेंटीमीटर ठेवता येते. प्रतिदिन पाच एकरांवर पेरणी करता येते. वेळेत २५ ते ३० टक्के तर मजुरीच्या खर्चात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत बचत शक्य होते.
३) तीन पास कोळपे
प्रति मजुराच्या साहाय्याने तीन ओळींतील आंतरमशागत, खत देण्याचे काम एकाचवेळी करता येते. एका दिवसात अडीच ते तीन एकरांत कोळपणी करणे व खते देणे शक्य होते. पारंपरिक पध्दतीपेक्षा ३० ते ४० टक्के वेळेची तसेच खर्चात बचत होते. कोळप्याला दोन्ही बाजूने फण बसविण्याची सोय आहे. गादीवाफ्यावरील पिकांमध्ये कोळपणी व सऱ्या मोकळ्या करता येतात.
४)हळदीला माती लावणे
हळदीत एकाच वेळी आंतरमशागत व माती लावता येते. तण काढण्याची क्षमता ९० टक्क्यापर्यंत असून प्रतिदिन कार्यक्षमता एक हेक्टर आहे.
५)बहुउद्देशीय पेरणी ,फवारणी, रासणी यंत्र
खते, बियाणे पेरणी तसेच रासणी व तणनाशकाची फवारणी अशी चार कामे हे यंत्र करू शकते.
पेरणीनंतर पेटी काढून तेथे कोळपे बसवून कोळपणी व फवारणी करता येते. यातून मजुरी खर्चात ४० ते ५० टक्के बचत होते. प्रति मजुराव्दारे चालणाऱ्या यंत्राची क्षमता प्रतिदिन ४ ते ५ एकर आहे.
६) सुधारित जू
बैलगाडी, वखरणी, आंतरमशागतीच्या कामांसाठी सुधारित जू विकसित करण्यात आले आहेत.
बैलजोडीच्या मानेवर व्यवस्थित बसण्यासाठी अर्धवर्तुळाकार आकार दिला आहे. वजन पारंपरिक जूपेक्षा १५ ते २० टक्के कमी आहे. बैलजोडीची कार्यक्षमता १५ ते २० टक्क्याने वाढते तर ओढशक्ती १० ते १५ टक्के कमी लागते.
संपर्क- डॉ. स्मिता सोलंकी- ८००७७५२५२६
प्रथिनयुक्त सकस आहार
बैलांची ओढशक्ती, कामाचा वेग वाढविण्यासाठी प्रथिनयुक्त उपयुक्त सकस आहार तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे. यामध्ये ज्वारी, सरकी पेंड, भरडलेला मका, तूर, मूग, चुनी, मीठ हे घटक विशिष्ट प्रमाणात एकत्र केले जातात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.