AI Update : परिस्थिती ओळखून उपाय सुचविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता

Artificial Intelligence : मागील भागामध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्ता कसे कार्य करते, याची माहिती घेतली. या भागामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे विशिष्ट वस्तू किंवा ती वस्तू ज्या परिस्थितीमध्ये आहे, ती परिस्थिती ओळखण्याचे तंत्रज्ञान व त्यामागील नेमक्या तत्त्वांची माहिती घेऊ.
AI Update
AI UpdateAgrowon
Published on
Updated on

डॉ. सुनील गोरंटीवार

Indian Agriculture : कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर पुढील घटक व त्या घटकांच्या वेगवेगळ्या अवस्था ओळखण्यासाठी केला जातो. ही ओळख पटल्यानंतर प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेऊन त्याबाबत आवश्यक तो सल्ला देणे शक्य होते.

किंवा घटक आणि त्याची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून योग्य तो संदेश पुढील कार्य करणाऱ्या यंत्रणेला देता येतो.

१) पिकातील प्रकार व अवस्थांची ओळख पटवणे

अ) पिकाचा प्रकार ओळखणे. (उदा. गहू, भात, ऊस, ज्वारी, बाजरी, मका, कांदा इत्यादी)

ब) पिकांच्या वाढीच्या अवस्था ओळखणे. (उदा. गहू पिकामधील मुकुट मुळे फुटण्याची अवस्था, कांडी धरण्याची अवस्था, फुलोरा आणि चीक भरण्याची व्यवस्था, दाणे भरण्याची अवस्था इ.

क) पिकांवर पडलेले विविध जैविक ताण (उदा. तांबेरा, करपा इ. रोग अथवा मावा या किडींच्या प्रादुर्भावामुळे दिसणारी लक्षणे) व अजैविक ताण (उदा. जास्त तापमान किंवा जमिनीमध्ये आवश्यकतेपेक्षा ओलावा कमी उपलब्ध असल्याचा ताण इ.)

२) जमीन व मातीतील विविध घटक

अ) जमिनीमधील मृदा/माती, मातीचा प्रकार (उदा. हलकी, मध्यम, भारी तसेच पाणथळ क्षारयुक्त इ.)

ब) मातीमध्ये उपलब्ध असलेल्या विविध पोषक अन्नद्रव्यांचे प्रमाण (उदा. नत्र, स्फुरद पालाश, कर्ब इ.)

AI Update
Agriculture AI : रोगग्रस्त गहू दाणे ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

ओळख पटविणे

एकदा नेमके काय झाले, याची ओळख पटली की त्या माहितीचा पुढील पीक व्यवस्थापन प्रणालीमध्ये कार्यक्षम व काटेकोरपणे वापर होऊ शकतो.

१) पिकावर जर रोग व किडीचा प्रादुर्भाव झाला असेल, तर त्याचा पिकावर जैविक ताण येतो. त्याच्या लक्षणावरून रोग व किडीचा प्रादुर्भाव, त्याचे प्रमाण व त्याद्वारे पडलेला जैविक ताण ओळखणे व त्यांचे व्यवस्थापन करणे.

२) जमिनीमध्ये पोषक मूलद्रव्यांची कमतरता असेल तर त्याचा प्रभाव पीक व पिकाच्या वाढीवर पडतो. पीक त्याप्रमाणे त्या कमतरतेची लक्षणे दर्शवितात. ती लक्षणे ओळखून त्याप्रमाणे व्यवस्थापन करणे.

३) अधिक तापमान किंवा जमिनीमध्ये आवश्यक असणाऱ्या ओलाव्यापेक्षा कमी ओलावा यामुळे पिकावर अजैविक ताण येतो. पीक त्याप्रमाणे काही लक्षणे दर्शविते. ती ओळखून त्याप्रमाणे सूक्ष्म वातावरण किंवा सिंचन व्यवस्थापन करणे.

४) मातीचा प्रकार व त्यामध्ये उपलब्ध असलेली मुख्य पोषक अन्नद्रव्ये इ. ओळखणे. पिकाच्या प्रकार आणि शिफारशीप्रमाणे जमिनीतून द्यावयाच्या अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करणे.

५) क्षारयुक्त व पाणथळ जमीन ओळखून त्याप्रमाणे त्या प्रकारच्या जमिनीमध्ये लागवड करण्यायोग्य पिके ठरविणे, त्या पिकांचे व्यवस्थापन, त्याचप्रमाणे पिकाच्या प्रकाराप्रमाणे जमिनीतील क्षार व्यवस्थापन, निचरा व्यवस्थापन इ.

६) पीक व पिकाचा प्रकार ओळखणे : यामुळे देशाच्या किंवा राज्यांच्या विविध भागांमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध पिकांच्या लागवडीखालील क्षेत्राची माहिती घेता येते. त्या माहितीद्वारे पीक लागवडीच्या काळात वेगवेगळ्या निविष्ठांचे नियोजन करणे नियोजनकर्त्यांना शक्य होते.

७) पीक व पिकाच्या प्रकाराच्या माहितीसोबतच पिकाची वाढीच्या अवस्था व पिकावर पडणाऱ्या विविध ताणांची माहितीही मिळवता येते. या सर्व घटकांचा पिकाच्या उत्पादनावरील परिणामांचा अंदाज घेता येतो. एखाद्या विभागातील त्या पिकाचे उत्पादन नेमके किती राहील, याची माहिती काढता येते. त्यानुसार पिकाची काढणी/कापणी, वाहतूक, साठवणूक यासोबतच वितरण व विक्रीचे व्यवस्थापन व नियोजन कार्यक्षमपणे व प्रभावीपणे करता येते.

कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पीक व पिकाचा प्रकार, माती व मातीचा प्रकार व हवामान याप्रमाणे पिकास आवश्यकतेप्रमाणे व जेव्हा गरज असेल तेव्हा व तितक्याच मात्रेमध्ये निविष्ठा देणे शक्य होते. यातून निविष्ठांची बचत साधते.

अतिरिक्त निविष्ठांच्या वापरामुळे होऊ शकणाऱ्या संभाव्य विपरीत परिणामांपासून बचाव शक्य होतो. पिकांना वेळीच मिळालेल्या आवश्यक घटकांमुळे उत्पादनात त्याच्या अत्युच्च क्षमतेपर्यंत वाढ मिळवणे शक्य होते.

शेतातील परिस्थितीनुसार योग्य तो सल्ला देणे

कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे पीक व त्याभोवतीच्या परिस्थिती ओळखून, त्यानुसार योग्य तो सल्ला देण्याच्या तंत्रज्ञानामध्ये साधारणतः पुढील चार प्रक्रिया येतात.

१) प्रतिमेचे संकलन (प्रतिमा संग्रहालय) :

लेखाच्या मागील भागामध्ये नमूद केल्याप्रमाणे एखादी बाब (उदाहरणार्थ, जसे वनस्पती, पिकाचा प्रकार, पिकावर पडलेला ताण इत्यादी) ओळखावयाची असल्यास प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये त्या बाबीची प्रतिमा (कॅमेरा किंवा त्यासाठी विकसित करण्यात आलेल्या विशिष्ट संवेदकाद्वारे) घेऊन त्या प्रतिमेची जुळवणी संगणक स्मृतीमध्ये साठवलेल्या विविध प्रतिमेंशी करावयाची असते.

संगणकीय स्मृतीमध्ये साठविलेल्या अनेक प्रतिमेंपैकी प्रत्यक्ष परिस्थितीमधील प्रतिमा ज्या प्रतिमेशी जुळते त्या प्रतिमेशी संलग्न माहिती ही प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये घेतलेल्या प्रतिमेची ओळख दर्शविते.

म्हणजेच, कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापराचा पहिला टप्पा हा विविध बाबींच्या जसं विविध प्रकारच्या पिकांचे, त्यांच्या विविध वाढीच्या अवस्थांतील, ते विविध प्रकारच्या जैविक व अजैविक ताणावर असतानाच्या, विविध प्रकाराच्या मातीच्या प्रतिमांचे संकलन करणे. यालाच आपण प्रतिमांचे संग्रहालय (इमेज लायब्ररी) असे म्हणता येते.

AI Update
Agriculture AI Technology : कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल

२) प्रतिमा जुळवणी प्रणाली :

संगणक स्मृतीमधील प्रतिमा संग्रहालयामध्ये असंख्य प्रतिमा असतात. प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये घेतलेल्या प्रतिमेची त्या प्रतिमेशी जुळवणी करण्यासाठी विशिष्ट प्रकारची संगणकीय प्रणाली विकसित करावी लागते. मग ती संगणकीय प्रणाली प्रत्यक्ष स्थितीतील प्रतिमेची स्मृतीतील प्रतिमेशी जुळवणी करते.

मग त्या प्रतिमेची संलग्न असलेली माहिती म्हणजे प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये घेतलेल्या प्रतिमेची ओळख किंवा गुणधर्म दर्शविते. उदा. आपण प्रत्यक्षात ‘गव्हाच्या दाणे भरण्याच्या अवस्थेची’ प्रतिमा घेतली असल्यास संगणकीय प्रारूप प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये घेतलेली ही प्रतिमा, प्रतिमा संग्रहालयामध्ये गहू पिकाच्या विविध अवस्थांतील असंख्य प्रतिमांशी जुळविण्याचा प्रयत्न करते.

या प्रक्रियेत प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये घेतलेली प्रतिमा ही प्रतिमा संग्रहालयातील असंख्य प्रतिमेपैकी केवळ ‘गव्हाच्या दाणे भरण्याच्या प्रतिमेशी’ जुळते. मग त्या प्रतिमेची संलग्न माहिती ‘गहू पीक- दाणे भरण्याची अवस्था’ अशी असते. ती आपल्याला दर्शविली जाते.

अशाच प्रकारे प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये घेतलेल्या आणि प्रतिमा संग्रहालयामध्ये असलेल्या पाने व अन्य अवयवांवरील ताणांच्या व समस्यांच्या छायाचित्रांशी सांगड घातली जाते. त्यावरून त्या समस्येचे निदान केले जाते. उदा. प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्यास आपणास त्याचे निदान होते.

३) समस्यांच्या निदानाप्रमाणे उपाय (निर्णय समर्थन प्रणाली) :

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी; इतर कृषी विद्यापीठे व कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या संशोधन संस्था याद्वारे कृषी क्षेत्रातील विविध समस्यांवर संशोधन करून त्यांचे निदान व उपाय सुचविले जातात.

प्रक्रिया क्रमांक १ व २ द्वारे समस्यांची ओळख व निदान झाल्यास त्या समस्या व निदान यांच्याशी निगडित उपाय किंवा सल्ला उपलब्ध करून द्यावयाचा असतो. त्यासाठी या प्रक्रियेमधील तिसरा टप्पा म्हणजे ओळख व निदान झाल्यावर योग्य तो उपाय सुचविण्यासाठी व सल्ला देण्यासाठीची निर्णय समर्थन प्रणाली.

४) वापरकर्ता हस्तक्षेप प्रणाली (मोबाइल ॲप्लिकेशन)

शेतकरी त्याच्या शेताची प्रत्यक्ष स्थिती एखाद्या छायाचित्राद्वारे पाठवून त्याबाबतचे निदान व उपाययोजना यांची माहिती मागू शकतो. त्याची ओळख पटवून सुचविण्यात आलेला उपाय किंवा सल्ला हा शेतकऱ्यांना त्वरित पाठवता येतो.

या दोन्ही प्रकारे माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एखादे विशिष्ट साधन (उदा. संगणक, मोबाइल किंवा अन्य) आवश्यक असते. आता बहुतांश शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन उपलब्ध असल्यामुळे त्यामध्ये कार्य करू शकणारे एखादे ‘मोबाईल ॲप्लिकेशन’ विकसित करण्याची आवश्यकता असते.

कृषी क्षेत्रामध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान’ आधारित संपूर्ण प्रणाली तयार करण्यासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली यांच्या ‘राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प’ अंतर्गत कार्यरत ‘हवामान अद्ययावत शेती व पाणी व्यवस्थापन’ या केंद्राद्वारे आराखडा तयार केला आहे.

अन्य काही संस्थांच्या साह्याने हा आराखडा प्रत्यक्षात प्रणालीच्या स्वरूपात रूपांतरित करण्याचे कार्य सुरू आहे. या अनेक संस्था परस्पर सहकार्यांमधून कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सुलभपणे करण्याच्या दृष्टीने प्रणाली विकसित करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com