अशोक कोळपे ठरतेय शेतकऱ्यांना उपयोगी

शेतीत मजूर ही सर्वात मोठी समस्या ठरत असून या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न सातारा जिल्ह्यातील चिंचनेर येथील अशोक ज्ञानोबा जाधव यांनी केला आहे. सर्व पिकांसाठी उपयोगी सुलभ व श्रम, वेळ व पैसा यात बचत करणारे मानवचलित कोळपे त्यांनी स्वकल्पनेतून तयार केले आहे.
अशोक जाधव यांनी तयार केलेले कोळपे
अशोक जाधव यांनी तयार केलेले कोळपे

शेतीत मजूर ही सर्वात मोठी समस्या ठरत असून त्यामुळे वेळेत आणि दर्जेदार कामे होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न सातारा जिल्ह्यातील चिंचनेर येथील अशोक ज्ञानोबा जाधव यांनी केला आहे. सर्व पिकांसाठी उपयोगी सुलभ व श्रम, वेळ व पैसा यात बचत करणारे मानवचलित कोळपे त्यांनी स्वकल्पनेतून तयार केले आहे. शेतकऱ्यांकडूनही त्यास चांगला प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत सुमारे अडीचहजार ते तीनहजार कोळप्यांची विक्री झाली आहे.   सातारा जिल्ह्यातील चिंचनेर (ता. जि. सातारा) हे सैनिक पंरपरा असलेले बागायती पिके घेणारे गाव आहे, या गावातील कंपनीतून सेवानिवृत्त झालेले अशोक ज्ञानोबा जाधव हे जेष्ठ शेतकरी आहेत. सन १९९१ पासून ते शेती करतात. सध्या त्यांचे वय ७१ वर्षे आहे. त्यांची सुमारे दोन एकर बागायती शेती आहे. यामध्ये कमी अधिक प्रमाणात सोयाबीन व ऊस ही पिके ते घेतात. यापूर्वी हळद, टोमॅटो आदी पिके घेण्याचाही त्यांना अनुभव आहे. गरजेतून शोधले तंत्र जाधव यांनी काही वर्षांपासून आपली शेती अधिकाधिक सेंद्रिय केली आहे. शेतीत मजूर ही मोठी समस्या त्यांना यायची. सेंद्रिय पध्दतीकडे कल असल्याने तणनाशकांचा वापरही त्यांना करायचा नव्हता. त्या दृष्टीने त्यांनी सायकल कोळप्याचा वापर करून बघितला. त्यातही कष्ट, वेळ, दर्जा यांची काही प्रमाणात उणीव जाणवली. मग कृषी प्रदर्शनांना भेटी दिल्या. त्यात मोठी औजारे जास्त दिसून आली. कमी खर्चात सुलभ असे काही दिसून न आल्याने स्वकल्पनेतून त्यांनी कोळपे तयार करण्यास सुरूवात केली. अशोक कोळपण्याची निर्मिती सुरवातीस दोन लोखंडी गज घेतले. त्याची दोन्ही टोके वाकडी केली. त्यास खाचा पाडून त्यास बारीक तार वापरली. त्याच्या मागे पाईपचा वापर केला. मात्र तारेचा ताण कमी होणे, वजनास जड आदी समस्या जाणवू लागल्या. मग सुधारणा सुरू केली. वजन कमी करण्याच्या दृष्टीने लोखंडी पाईप ऐवजी लाकडी दांड्याचा वापर केला. भरीव ऐवजी पोकळ पाईपचा वापर केला. पुढील बाजूस दुचाकी वाहनांना ब्रेक्ससाठी वापरल्या जाणाऱ्या केबलचे दोन पदर काढून त्याचा तार म्हणून वापर केला. एका रॉडद्वारे तार ओवून घेत केबलला ताण दिलाय या सर्व बदलांमुळे त्रुटी दूर होऊ काम करणे सोपे झाले. कामांची दर्जाही सुधारला. कोळपे तयार करण्यासाठी ३०० ते ३५० रूपये खर्च आला. त्यास अशोक कोळपे असे नाव दिले. अशोक कोळपाची वैशिष्ट्ये

 • वजन सुमारे सहाशे ग्रॅमच्या आसपास असल्याने हातातून वाहून नेणे तसेच महिलांनाही वापर करणे शक्य.
 • एक मनुष्य एकरी दोन दिवसांत काम पूर्ण करू शकतो.
 • तुटणे-फुटणे आदी त्रास नसल्याने देखभालीचा खर्च नाही.
 • आकाराने लहान असल्याने सर्व प्रकारच्या पिकांत वापर करता येतो.
 • कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर
 • जाधव म्हणतात की सायकल कोळप्याच्या तुलनेत या कोळप्याचे फायदे अधिक आहेत.
 • सायकल कोळपे एका रेषेत चालते. आमचे कोळपे खुरप्याप्रमाणे सर्व बाजूला फिरवता येते.
 • रोपांच्या मधल्या भागातील तणही ते काढते. तारेची रूंदी सुमारे सात इंच आहे.
 • एका ठिकाणी उभे राहून तीन चे चार ओळींमधील तण काढता येते.
 • याचा वापर करण्यासाठी शेतात वाफसा असणे गरजेचे आहे.
 • पाहणी व कौतूकही अनेक शेतकरी प्रत्यक्ष शेतात येऊन कोळप्याचा वापर पाहात आहेत. आत्तापर्यंत सुमारे २५०० ते तीनहजार पर्यंत विक्री झाल्याचे जाधव यांनी सांगितले. त्याची किंमत चारशे रूपये आहे. वेल्डिंग व्यवसायातील एका व्यक्तीकडून गरजेनुसार सध्या निर्मिती केली जात आहे. मागणी प्रमाणे पुरवठा करता यावा यासाठी भविष्यात स्वतःचे ‘वर्कशॅाप’ सुरू करण्याचाही विचार आहे. ‘पाणी फाऊंडेशन’कडूनही खरेदी झाली आहे. आमदार महेश शिंदे, कोल्हापूरचे कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गुरूदत्त काळे, कृषी उपसंचालक विजय राऊत, तालुका कृषी अधिकारी अजित पिसाळ, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भूषण यादगीरवार, संग्राम पाटील यांनीही त्याचे प्रात्यक्षिक पाहिले आहे. कृषी साहायक धनंजय फडतरे यांचेही प्रोत्साहन मिळाले आहे. नुकतीच एका गुलाब उत्पादकाची समस्याही कोळप्यातून दूर झाल्याचे जाधव यांनी सांगितले. सेंद्रिय शेतीवर भर जाधव सेंद्रिय पध्दतीच्या नियोजनावर अधिक भर देतात. फारच गरज भासल्यास ते रसायनांचा वापर करतात. ऊस पाचट व्यवस्थापन, गांडूळ खत, जीवामृत, दर्शपर्णी, हिरवळीच्या खतांचा वापर ते दहा वर्षांपासून करीत आहेत. शेतीला पूरक म्हणून तीन वर्षांपासून २५ शेळ्यांचे पालन ते करीत आहेत. दोन देशी गायी देखील आहेत. संपर्क- अशोक जाधव- ७२७६६०७१९९, ९५२७९४९०१०

  Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

  ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  agrowon.esakal.com