पिकातील बाष्पोत्सर्जन मोजणारी उपकरणे

गेल्या दोन भागापासून आपण हवामान मापक उपकरणांची ओळख करून घेत आहोत. या भागामध्ये जमिनीतील, वनस्पतीतील बाष्पोत्सर्जन मोजणारी उपकरणे पाहू.
पिकातील बाष्पोत्सर्जन मोजणारी उपकरणे
पिकातील बाष्पोत्सर्जन मोजणारी उपकरणे
Published on
Updated on

शेतकऱ्यांनी सर्व जैविक घटक व आपले पीक याचा संबंध अभ्यासत चालू हवामान स्थिती व भविष्यातील अंदाज घेण्यासाठी हवामान मापक विविध उपकरणांचा अंतर्भाव आपल्या शेतीमध्ये करणे आवश्यक आहे. गेल्या दोन भागापासून आपण हवामान मापक उपकरणांची ओळख करून घेत आहोत. या भागामध्ये जमिनीतील, वनस्पतीतील बाष्पोत्सर्जन मोजणारी उपकरणे पाहू. जमिनीतील ओलावा किंवा मृद बाष्प, आर्द्रता : एकूण वनस्पतीचा वाढ विकास आणि उत्पादन यामध्ये जमिनीतील ओलावा किंवा मृद बाष्प अत्यंत महत्त्वाचे आहे. वनस्पतीच्या शरिरशास्त्रामध्ये सूर्यप्रकाश आणि कार्बन-डाय-ऑक्‍साईड याबरोबर जमिनीतील ओलाव्याचा किंवा पाण्याचा तितकाच महत्त्वाचा सहभाग असतो. वनस्पती शरिरशास्त्रामध्ये जमीन - वनस्पती - वातावरण अखंड ( SPAC ) मानले जाते. जमिनीतील ओलाव्याचा ऱ्हास हा वेगवेगळ्या प्रकारे होतो. जमिनीतून होणारा पाण्याचा ऱ्हास म्हणजेच बाष्पीभवन होय. तर वनस्पतीद्वारे होणारा पाण्याचा ऱ्हास म्हणजेच बाष्पोत्सर्जन होय. मृद बाष्पाचा वनस्पतीच्या किंवा पिकाच्या क्षेत्रांमधील आर्द्रतेवर आणि तापमानावरही परिणाम होतो. सध्या पाऊस, अतिवृष्टीमुळे अनेक काही भागांमध्ये पाणी साचून राहिले. काही भागांमध्ये जोराच्या वाऱ्यामुळे पिके जैविक ताणाला बळी पडलेली आहेत. या जैविक ताणाबरोबरच पिकांमधील बदललेल्या सूक्ष्मवातावरणामुळे जैविक ताणही मोठ्या प्रमाणात किंवा काही भौतिकीय विकृती पिकांमध्ये आढळून येत आहे. सद्यस्थितीमध्ये शेवगा किंवा हादगा किंवा इतर भाजीपाला पीक फुलांवर असल्याने आणि वातावरणाचा विपरीत परिणाम म्हणून फूलगळ मोठ्या प्रमाणात होत आहे. जमिनीतील प्रमाणापेक्षा अधिक ओलाव्यामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडली आहेत. बाष्पोत्सर्जन: जमिनीचा अथवा पाण्याच्या अथवा कुठल्याही भूपृष्ठावरून पाण्याचे वाफेत रूपांतर होऊन पाण्यामध्ये घट होण्याच्या प्रक्रियेला आपण बाष्पीभवन असे म्हणतो. वनस्पतीच्या खोड, पाने यातून होणाऱ्या पाण्याच्या ऱ्हासास आपण उत्सर्जन म्हणतो. बाष्पीभवन अधिक उत्सर्जन या दोन्ही क्रिया एकत्रितपणे जमिनीतील पाण्याच्या प्रमाणात घट करीत असतात. जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण कमी होत असते. जमिनीतून अथवा वनस्पतीद्वारे होणाऱ्या पाण्याच्या ऱ्हासास बाष्पोत्सर्जन असे म्हणतात. बाष्पोत्सर्जनावर हवामान आणि वनस्पती या दोन घटकांचा परिणाम होत असतो. बाष्पोत्सर्जनावर परिणाम करणारे हवामान घटक : पर्यावरणीय घटकांमध्ये प्रामुख्याने वातावरणातील घटक येतात. यामध्ये प्रकाश, वारा, आर्द्रता, मृद व तापमान वातावरणीय बाष्प उपलब्धी, ढग, पाऊस व दव इत्यादी घटक येतात. यामध्ये प्रामुख्याने पाऊस, सूर्यप्रकाश, तापमान, वारा, जमिनीचे तापमान हे हवामान घटक बाष्पोत्सर्जनावर परिणाम करीत असतात. यांत्रिक वजनावर आधारित लायसीमीटर. अलीकडेच डॉ. प्रकाशकिरण पवार या कृषी अभियंत्याने भारतीय बनावटीच्या लायसीमीटरची निर्मिती केली आहे. या संशोधनाची बातमी ॲग्रोवन -टेक्नोवनमध्ये प्रकाशित झालेली आहे. - वरील प्रकारच्या सर्व हवामान घटकांच्या एकत्रित आणि स्वयंचलित नोंदी घेण्यासाठी अलीकडच्या काळामध्ये उपलब्ध असलेले ‘स्वयंचलित हवामान केंद्र' अनेक शेतकरी वापरताना दिसून येत आहेत.  बाष्पोत्सर्जनावर परिणाम करणारे वनस्पतीचे घटक : बाष्पोत्सर्जन हे प्रकाश संश्लेषण, चयापचय प्रक्रियेमध्ये जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच वनस्पती शरीरांतर्गत तापमान समतोल ठेवण्यासाठी उपयुक्त असते. बाष्पोत्सर्जनाचा दर हा वनस्पतीमध्ये प्रामुख्याने पर्णरंध्राद्वारे होणाऱ्या उत्सर्जनावर ( ट्रान्स्पिरेशन)अवलंबून असतो. वनस्पती घटक आणि पर्यावरणीय घटक असे दोन घटक यावर परिणाम करतात. वनस्पती घटकांमध्ये मूळ : खोड गुणोत्तर (रूट : शूट गुणोत्तर ), पर्णघेर (लीफ एरिया), पर्ण रचना ( लीफ स्ट्रक्चर), पर्णरंध्रांची (लीफ स्टॉमेटा ) प्रति चौरस संख्या व त्याचा आकार आणि उघडझाप पद्धती इ. घटक अंतर्भूत आहेत. -मूळ ः खोड गुणोत्तर अधिक असेल तर उत्सर्जन अधिक होते. कारण मुळांचा पसारा अधिक म्हणजेच पाणी शोषण करण्यासाठी क्षेत्रातील वनस्पती शरीरांतर्गत पाणी म्हणजेच पाण्याचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होते. बदलत्या स्थितीत आणि कोरडवाहू परिस्थितीसाठी खास मूळ: खोड गुणोत्तर कमी असणाऱ्या पीक वाणांची निर्मिती करावी लागेल. शेतकऱ्यांनीही पाण्याचे उत्सर्जन कमी ठेवण्यासाठी अशा पिकांचा अंतर्भाव आपल्या पीक पद्धतीमध्ये केला पाहिजे. पर्णरचना : पीकनिहाय पानांच्या विविध रचना आहेत. यात पानांचा सर्वात वरचा थर ( क्युटिकल ) जाड असणे, जाड पेशीभित्तिका असणे आणि पानांवरील लव अथवा केस आणि टोक ( हेअर व जुबेसन्स) अधिक असणे इ. प्रकार आढळतात. या घटकांमुळे वनस्पतीच्या शरीरातून पाण कमी उत्सर्जित होते. त्यांचे शरीरांतर्गत तापमान वाढत नाही. वनस्पतीच्या पेशीचे तापमान नियंत्रित होऊन वनस्पतीचे पिकांचे उत्पादन देण्याचे काम व्यवस्थित चालू राहण्यासाठी पानांची अशी रचना आवश्यक असते.  जास्त पाऊस पडलेल्या ठिकाणी मुळांची वाढ आणि पर्णघेर या दोन्हींची वाढ ऑगस्टच्या मध्यापर्यंत थांबलेल्या होत्या. यामुळे पिकांची वाढ समाधानकारक नाही. अशीच काहीशी स्थिती सप्टेंबर महिन्यामध्ये आढळून आली. जरी शिवारात पीक हिरवेगार दिसत असले तरीही पाऊस उघडल्यावर अजैविक ताण (तापमान ढगाळ वातावरण, अधिक सापेक्ष आर्द्रता इ. ) वाढत आहे. याच जोडीला जैविक ताणही वाढत आहे. हा जैविक आणि अजैविक ताण कोरडवाहू पिकांमध्ये अधिक दिसतो. अतिवृष्टी झालेल्या भागातही ताण स्थिती दिसून येत आहे. अशा दोन्ही परिस्थितीत पीक वाचविण्यासाठी किंवा उत्पादन कमी होऊ नये यासाठी काही उपाययोजना करणे आवश्‍यक असते. पीक वाचविण्यासाठी उपाययोजना :

  • वनस्पतीच्या प्रकारानुसार वनस्पतीच्या पानांमध्ये प्रति चौरस मीटरला १००० ते ६०,००० इतकी पर्णरंध्रे असतात. यामुळे मोठे वृक्ष किंवा मोठ्या पानांच्या वनस्पतींमध्ये पर्णरंध्रांची संख्या अधिक असते. त्यांचा पाणी वापर किंवा व्यय अधिक असतो. मोठ्या वृक्षाच्या प्रति एकर क्षेत्रफळातून, लहान वृक्षापेक्षा अधिक प्रमाणावर पाण्याचे उत्सर्जन होते.
  • विविध पिकांसाठी संरक्षित शेतीचे प्रयोग अधिक प्रमाणात व्हायला हवेत. अगदी साध्या शेडनेटद्वारे काही टक्क्यापर्यंत सावली करणे, तापमान कमी ठेवणे यातून पाण्याची बचत शक्य आहे.
  • अवर्षण काळात दुष्काळी स्थितीत झाडावरील पानांची, फुलांची, फांद्यांची संख्या छाटणीद्वारे कमी करून पीक वाचवता येते. मात्र, एका मर्यादेपर्यंतच आपण फांद्यांची किंवा पानांची संख्या कमी करू शकतो.
  • अतिपावसाच्या किंवा पाणी शेतामध्ये असलेल्या किंवा कोणत्याही कारणाने पाणी साचल्यामुळे पिकांची वाढ होत नसल्यास रासायनिक खतमात्रा विभागून द्याव्यात. शिफारशीप्रमाणे युरिया किंवा पोटॅशिअम नायट्रेट या खतांची पानावर फवारणी करावी.
  • महाराष्ट्रातील दुष्काळी किंवा पूर परिस्थितीला तोंड देणाऱ्या वाणांच्या निर्मितीसाठी जागतिक पातळीवर संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक पातळीवर निवड पद्धतीने शेतकरी व संशोधकांनी अशा वाणांची निर्मितीकडे लक्ष दिले पाहिजे.
  • यासाठी शेतकऱ्यांनी सर्व जैविक घटक व आपले पीक याचा संबंध अभ्यासत चालू हवामान स्थिती व भविष्यातील अंदाज घेण्यासाठी हवामान मापक विविध उपकरणांचा अंतर्भाव आपल्या शेतीमध्ये करणे आवश्यक आहे.
  • डॉ प्रल्हाद जायभाये, ७९८०६८४१८९ (कृषीहवामान शास्त्रज्ञ आणि प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, जालना, अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com