कोविड १९ च्या काळात टाळेबंदीमुळे अनेक उद्योगाचे नुकसान झाले. अनेक उद्योगही बंद पडले. शेतकऱ्यांची कामे थोड्याफार अडथळ्यांनंतरही सुरू होती. या काळातच कोल्हापूर जिल्ह्यातील म्हासुर्ली पैकी कुंभारवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी राजू भाऊ सुतार यांनी कौशल्याला कल्पकतेची जोड देत छोटे मळणी यंत्र तयार केले. तशीच अनेक यंत्रे बनवून त्याची विक्री करण्यातही यश मिळवले. राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली पैकी कुंभारवाडी येथील राजू भाऊ सुतार ( वय ३५) हे प्रयोगशील शेतकरी. गेल्या पंधरा वर्षापासून घरची तीन एकर शेती सांभाळताना त्यांची भात आणि ऊस ही प्रमुख पिके आहेत. सोबतच सुतारकाम, थोडेसे वेल्डिंग अशी कामेही करतात. छोट्या मोठ्या अवजारांची दुरुस्ती, ट्रॅक्टरचलित अवजारांचे काही भाग तयार करतात. जिल्ह्यात भाताचे क्षेत्र अधिक असले तरी ती खाचरांमध्ये म्हणजेच तुकड्या तुकड्यात होते. मोठ्या आकारांची मळणी यंत्रे वापरणे अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडणारे ठरत नाही. गेल्या दोन वर्षापासून छोटेसे मळणी यंत्र तयार करण्याची कल्पना मनामध्ये घोळत असली तीर वेळ मिळत नव्हता. कोविड १९ मुळे टाळेबंदी झाली. प्रथमच इतका मोकळा वेळ मिळाला. या काळातच त्यांनी काही घरगुती साधने, कोल्हापुरातून सुटे भाग आणून प्रयोग सुरू केले. त्यातून छोट्या मळणी यंत्राची निर्मिती केली. छोटा आकार, वजनाला हलके आणि कमी किंमत या अनेक गुणधर्मामुळे परिसरातील शेतकऱ्यांकडूनही मागणी होऊ लागली. मग ही संधी न सोडता सुतार यांनी मागणीनुसार यंत्रांची निर्मिती करून, वीसहून यंत्रांची विक्रीही केली. असे आहे यंत्र
बाजारातील यंत्रापेक्षा असा आहे फरक मोठ्या यंत्रातील भात मळणी ड्रमचा व्यास ३६ इंचांऐवजी २४ इंच इतका कमी केला. यंत्राची रुंदी अडीच फुटापासून २१ इंचापर्यंत आणली. व्यावसायिक यंत्र हे ट्रॉलीवर बसवले जाते. हा खर्च कमी करत त्याऐवजी स्टॅण्ड लावले. या मळणायंत्राद्वारे भातासह नाचणी, वरई, ज्वारी अशा पिकांची मळणी करता येते. किंमत कमी, मात्र दर्जा चांगला किंमत कमी करण्यासाठी वापरलेल्या घटकांचा दर्जा कमी केला नाही. उलट चांगल्या दर्जाच्या शाफ्ट, बेअरिंग, पत्रे, अँगल, पुली यांचा वापर केला आहे. हे यंत्र पॉवर टिलर, सात अश्वशक्तीचा पंप किंवा सिंगल फेज मोटारवरही चालू शकते. यंत्राचे फायदे छोट्या मळणी यंत्रामुळे खर्चात बचत झाली. विनाकारण मोठे यंत्र घेण्याची गुंतवणूक करावी लागत नाही. शेतकऱ्यांचे मळणीचे काम सुलभ झाले. कमी मनुष्यबळातही काम होते. एकूणच श्रम व वेळ यांची बचत होते. आकाराने लहान असल्याने वाहतूकही सोपी. अधिक चांगल्या मळणीसाठी... यंत्रामध्ये अधिक सुधारणाही केल्या आहेत. भाताचा तूस, पिंजार खराब होवू नये यासाठी राजू सुतार यांनी कल्पकता वापरून १२ मि.मी. ची पट्टी टाकून कटर तयार केला आहे. यामुळे भाताची मळणी चांगल्या प्रकारे होते. भाताची कवळी यंत्रात टाकल्यानंतर पूर्णपणे झडून बाहेर येते. यामुळे पिंजार जनावरांना पशुखाद्य म्हणून वापरण्याच्या योग्यतेचे बनते. दोन महिन्यात वीस यंत्रांची विक्री टाळेबंदी बऱ्यापैकी उठल्यानंतर छोट्या मळणी यंत्राच्या निर्मितीला वेग आला. या काळात अन्य कामे कमी असल्याने सुतार यांनी प्रथम चार यंत्रे तयार केली. त्यांच्या चाचण्या गावातील काही शेतकऱ्यांच्या शेतात घेतल्या. चांगले काम करत असल्याने लोकांकडूनच प्रशंसा सुरू झाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला. एकमेकांकडून झालेल्या तोंडी प्रसिद्धीतून शेतकऱ्यांकडून मागणी वाढत गेली. सुतार यांनी आतापर्यंत वीसहून अधिक यंत्राची विक्री केली. शेतीसोबतच करणार यंत्रांची निर्मिती राज्यातील सर्व भात उत्पादक पट्ट्यामध्ये हे मळणी यंत्र नक्कीच उपयोगी ठरेल, असा विश्वास राजू सुतार व्यक्त करतात. या यंत्राद्वारे केवळ भातच नाही, तर ज्वारी, नाचणी, वरई अशा पिकांचे मळणी करता येते. कोल्हापूर जिल्ह्यात उसाखालोखाल ही पिके आहेत. यामुळे शेतीसोबतच मागणीनुसार यंत्राची निर्मिती सुरू ठेवणार असल्याचेही सुतार यांनी सांगितले. राजू सुतार, ९४०५५६०२२८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.