पृष्ठभागाखाली तयार झालेला घट्ट थर फोडण्यासाठी सबसॉयलरचा वापर आवश्यक आहे. हलक्या व कमी खोलीच्या जमिनीत १.५ फूट खोल आणि भारी, खोल जमिनीत १.५ ते २ फूट खोलीपर्यंत सबसॉयलर चालवावा.कमी निचरा होणाऱ्या भारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी मोल निचरा प्रणालीचा अवलंब करावा.
ज मिनीवरील आधीचे पीक, नंतर घ्यावयाचे पीक, तणांचा प्रकार व प्रमाण, स्थानिक हवामान आणि जमिनीचा प्रकार या बाबींवर जमीन नांगरणे आवश्यक आहे. उसासारखे बहुवर्षायू बागायती पीक आणि भुईमुगासारख्या काही पिकांना जमीन भुसभुशीत लागते, त्यासाठी नांगरट करणे आवश्यक असते. दीर्घ मुदतीच्या काही पिकांसाठी खोल नांगरट करावी लागते. चिकण मातीचे प्रमाण ५० टक्के किंवा त्याहून अधिक असेल, तर अशा जमिनीतील निचरा क्षमता सुधारण्याकरिता तीन-चार वर्षांतून एकदा खोल नांगरट करावी लागते. नांगरट उताराला आडवी करावी. नांगरट उताराला आडवी केली तर पावसाचे पाणी अडते आणि जमिनीत मुरते. सबसॉयलरचा वापर
सबसॉयलर जमिनीच्या पृष्ठभागाखालून १.५ ते २ फूट चालतो. याचा तळी फोडणारा टोकदार फाळ एक फूट लांबीचा असतो. जमिनीत जाणारी मांडी ही २.५ फुटांची असते. पृष्ठभागाखाली तयार झालेला घट्ट थर फोडण्यासाठी सबसॉयलरचा वापर आवश्यक आहे. हलक्या व कमी खोलीच्या जमिनीत १.५ फूट खोल आणि भारी, खोल जमिनीत १.५ ते २ फूट खोलीपर्यंत सबसॉयलर चालवावा. नांगरटीपूर्वी ५ फूट अंतरावर सबसॉयलर चालवावा. सबसॉयलरने ट्रॅक्टरच्या अश्वशक्तीनुसार १.५ ते २ फूट खोलीपर्यंत नांगरट करून जमीन मोकळी केली जाते. जमिनीच्या पृष्ठभागाखालील घट्ट थर फोडला जातो, त्यामुळे जमिनीत हवा भरून माती मोकळी होऊन जमीन भुसभुशीत होते. जमिनीस वाफसा लवकर येऊन हवा खेळती राहते, त्यामुळे जमिनीची मशागत चांगली खोलवर करता येते. जमिनीतील जास्तीच्या पाण्याचा व क्षाराचा निचरा होतो. जमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक सुपीकता वाढण्यास मदत होते. पिकाच्या मुळांची वाढ चांगली होऊन पीक लोळण्याचे प्रमाण कमी होते. सबसॉयलर चालविण्यासाठी डिसेंबर ते मे महिन्याचा कालावधी चांगला असतो. जमिनीमध्ये असणारी पाण्याची पाइपलाइन, विजेची वायर असणाऱ्या ठिकाणी अगोदर मार्किंग करून घ्यावे, ते तुटणार नाही याची दक्षता घ्यावी. सबसॉयलरचा वापर खोडव्यामध्ये करताना खोडकी, जमिनीलगत छाटलेली असावी. सबसॉयलर २ ते ३ वर्षांतून एकदा वापरावा. सबसॉयलरचा वापर केलेली जमीन ८ ते १५ दिवस उन्हामध्ये तापून त्यानंतरच पुढील मशागत करावी. मोल नांगराद्वारे जमिनीपासून ४० ते ७५ सें.मी. खोलीवर पाइपासारखे पोकळ आडवे छिद्र पाडले जातात, याला मोल निचरा पद्धत असे म्हणतात. हे मोल नेहमी जमिनीच्या उताराला समांतर काढावे लागतात. मोल पाडत असताना जमिनीच्या पृष्ठभागापासून मोलपर्यंत जमिनीचा भाग मोल नांगराच्या पातळ प्लेटद्वारे कापला जातो. त्यामुळे जमिनीखालून एक पोकळ फट तयार होते, त्याला मोल म्हणतात. मोल तयार झाल्यानंतर १० ते १५ दिवसांच्या अंतराने मशागत करावी. त्यामुळे मोल वाळण्यास अवधी मिळून ते टणक बनतात. पिकाला पाणी दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर जमिनीवरील पाणी हे जमिनीमध्ये पडलेल्या फटीतून मोलमध्ये जमा होते. तसेच जमिनीमध्ये मुरलेले अतिरिक्त पाणीसुद्धा मोलमध्ये जमा होते. असे साठलेले अतिरिक्त पाणी जमिनीच्या उताराच्या दिशेने जमिनीबाहेर वाहून जाते. साध्या नांगराप्रमाणे मोल नांगर ट्रॅक्टरला जोडून वापरले जाते. प्रत्येकी ४ मीटर अंतरावर हे नांगर वापरायचे असल्याने नांगरटीपेक्षाही कमी खर्च येतो. त्यामुळे क्षारपड - पाणथळ जमिनीमध्ये ज्या शेतकऱ्यांची भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा पद्धत वापरण्याइतकी आर्थिक परिस्थिती नाही, त्यांना ही पद्धत उपयुक्त ठरते. मोल निचरा पद्धतीसाठी साधारणतः हेक्टरी ४ हजार रुपये इतका खर्च येतो. मोल निचरा पद्धत योग्य पद्धतीने केल्यास ३ ते ५ वर्षे टिकू शकते. कमी निचरा होणाऱ्या भारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी तसेच पिकांचे अधिक उत्पादन घेण्यासाठी मोल निचरा प्रणालीचा अवलंब करावा. त्यासाठी दोन मोलमधील अंतर ४ मीटर व खोली ०.६० मीटर ठेवावी. मोल निचरा पद्धत वापरण्यापूर्वी घ्यावयाची दक्षता
जमिनीमध्ये चिकणमातीचे प्रमाण ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असावे. जमीन नैसर्गिक उताराची असावी. उतार कमीत कमी ०.२ टक्के असावा. साधारणतः १ ते १.५ टक्के उतार असलेली जमीन मोल निचरापद्धतीसाठी उत्कृष्ट असते. मोल करताना ४० ते ७५ सें.मी. खोलीवरील मातीमध्ये ओलाव्याचे प्रमाण २० ते २५ टक्के असायला हवे. कारण नांगर ४० ते ७५ सें.मी. खोलीवरून चालवला जातो. त्यामुळे या खोलीवरील माती कोरडी असेल तर तयार होणाऱ्या मोलच्या कडा कोसळतात. तसेच ओलावा जास्त असेल तर नांगर ओढण्यासाठी वापरलेला ट्रॅक्टर जमिनीमध्ये रूतू शकतो. यासाठी मोल नांगर वापरण्याचे वेळी ज्या खोलीवर नांगर वापरायचा आहे, त्या खोलीवरील मातीतील ओलावा साधारणतः २० ते २५ टक्के असावा. मोलमधून निचरा होणारे पाणी शेताबाहेर काढण्यासाठी शेताजवळ ७५ ते ९० सें.मी. खोलीची उघडी चर असावी. दोन मोलमध्ये सर्वसाधारणपणे ४ मीटर अंतर ठेवावे. मोलची खोली ४० ते ७५ सें.मी. ठेवावी. मोलची लांबी सामान्यतः २० ते १०० मीटर ठेवावी. साधारणतः ७५ किंवा त्यापेक्षा जास्त हॉर्सपावरचा ट्रॅक्टर वापरावा. मोल करत असताना ट्रॅक्टरचा वेग सामान्यतः १ कि.मी. प्रतितास किंवा त्यापेक्षा कमी ठेवावा. - वैभव सूर्यवंशी,९७३०६९६५५४ (विषय विशेषज्ञ,कृषी विज्ञान केंद्र,ममुराबाद फार्म,जळगाव)