कमी खर्चातील सौर ऊर्जा आधारीत जलशुद्धीकरण यंत्रणा

ग्रामीण भागातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी प्रामुख्याने भूजलावर अवलंबून आहेत. खोलवर जाणारे भूजल आणि त्यातील वाढते क्षारांचे प्रमाण यांमुळे पाण्याची उपलब्धता आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका वाढत आहे. त्यावर मात करण्यासाठी फलटण येथील निंबकर कृषी संशोधन संस्थेमध्ये पर्जन्य जल संवर्धन आणि सौर ऊर्जेवर आधारीत शुद्धीकरण तंत्र विकसित केले आहे.
rain water harvesting unit
rain water harvesting unit

ग्रामीण भागातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी प्रामुख्याने भूजलावर अवलंबून आहेत. खोलवर जाणारे भूजल आणि त्यातील वाढते क्षारांचे प्रमाण यांमुळे पाण्याची उपलब्धता आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका वाढत आहे. त्यावर मात करण्यासाठी फलटण येथील निंबकर कृषी संशोधन संस्थेमध्ये पर्जन्य जल संवर्धन आणि सौर ऊर्जेवर आधारीत शुद्धीकरण तंत्र विकसित केले आहे. 

ग्रामीण भारतामध्ये पिण्याच्या पाण्याची शुद्धतेबाबत आणखी प्रचंड काम करण्यासारखे आहे. एकूण भारतीय लोकसंख्येच्या ६६ लोक ग्रामीण भागात राहत असून, त्यातील ८५ टक्के लोक भूजलाचा पिण्यासाठी वापर करतात. मात्र, भूजलाचा वापर शेतीसह अन्य कारणांसाठी केला जात असल्याने त्याची पातळी खाली जात आहे. पर्यायाने भूजलाची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यात क्षारांचे प्रमाणही वाढत आहे. क्षारांमध्ये फ्लूरॉईड, नायट्रेट, लोह आणि आर्सेनिकसारखे आरोग्यासाठी घातक ठरणारे घटक आढळून येत आहेत.  हे क्षार कमी करण्यासाठी सध्या वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाळण यंत्रणाचा वापर केला जातो. मात्र, त्यातील अनेक यंत्रणांसाठी विजेची उपलब्धता असणे आवश्यक असते. पाण्यातील आरोग्यासाठी हानिकारक ठरणाऱ्या जैविक घटक दूर करण्यासाठी क्लोरीनेशन ही पद्धतही राबवली जाते.  अशा स्थितीमध्ये भूजलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पावसाच्या पाण्याची साठवण आणि सौर ऊर्जेवर आधारीत शुद्धीकरण तंत्र फलटण (जि. सातारा) येथील निंबकर कृषी संशोधन संस्थेमध्ये (NARI) विकसित करण्यात आले आहे. हे सौर ऊर्जेवर चालणारे आणि कोणत्याही रसायनाचा वापर नसलेले सोपे तंत्र (DWT) आहे. हे संशोधन करंट सायन्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. 

असे आहे तंत्रज्ञान

अ) छतावरील पावसाचे पाणी गोळा करणे ( रेन वॉटर हार्वेस्टिंग)   छतावर पडणारे पावसाचे पाणी प्रवाहाच्या नियंत्रणाद्वारे टाकीमध्ये जमा केले जाते. इमारतीच्या निकषाप्रमाणे पाच माणसांच्या कुटुंबाच्या रहिवासासाठी किमान आवश्यक क्षेत्रफळ ९.५ वर्गमीटर इतके आहे. नारी संस्थेच्या एका खोलीच्या छताचे क्षेत्रफळ हे १२ वर्गमीटर इतके आहे. पाणी गोळा करण्यासाठी कोरुगेटेड जीआय घटकाचा वापर करण्यात आला.   फलटण हे सह्याद्री पर्वतरांगांच्या पूर्वेला स्थित असून, पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. येथे वार्षिक ५०० मि.मी. पाऊस प्रामुख्याने वर्षाच्या तीन ते चार महिन्यांमध्ये पडतो. येथील वातावरणानुसार पडणाऱ्या पावसाचा विचार करता पाच व्यक्तींच्या कुटुंबासाठी १० ते १५ लिटर पिण्यायोग्य पाणी हे प्रमाण पुरेसे होते.  छतावरील पाणी गोळा करण्यासाठी पावसाच्या प्रमाणानुसार योग्य आकाराच्या अर्ध गोलाकार पीव्हीसी पाइपचा वापर केला आहे. पाणी साठविण्यासाठी ३ हजार लिटर क्षमतेची प्लॅस्टिक टाकी वापरण्यात आली. पावसाचे प्रमाण, छताचा आकार आणि साठवण यंत्रणेचा विचार केला असता एकूण क्षमतेच्या ८० टक्के इतके पाणी साठवता आले.  ब) पावसाच्या पाण्यातील तरंगता काडी, कचरा इ. साफ करणे

  • पाण्यामध्ये कचरा, पाला पाचोळा जाऊ नये, यासाठी स्टेनलेस स्टीलची जाळी बसविण्यात आली. डासांची पैदास होऊ नये, यासाठी टाकीवर कापड बांधण्यात आले.   
  • पावसाच्या पाण्यामध्ये क्षार आणि अन्य हानिकारक रसायने असत नाहीत. मात्र, वाहणाऱ्या वाऱ्यासोबत वाहणारी धूळ, सेंद्रिय पदार्थ कुजणे या बरोबरच पक्षी, प्राणी यांनी छतावर केलेली घाण त्यात मिसळली जाऊन प्रदूषणाचा धोका असतो. या कारणामुळे पाण्याचा रंग पिवळसर होऊ शकतो. हे टाळण्यासाठी तुरटी ( २० मिलिग्रॅम प्रती लिटर) हा चांगला आणि स्वस्त पर्याय आहे. तुरटीमुळे पाण्यातील प्रदूषक घटक तळाला खाली बसतात. त्याचप्रमाणे तुरटीमुळे काही प्रमाणात हानिकारक ठरणाऱ्या जिवाणूंही अकार्यक्षम होतात. 
  • नारी संस्थेच्या केलेल्या परीक्षणात गोळा केलेल्या पाण्यातील सूक्ष्मजीवांचे सरासरी प्रमाण १६०० इतके होते. म्हणजेच पावसाचे पाणीही सरळ पिण्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यासाठी त्याचे शुद्धीकरण आवश्यक ठरते. या शुद्धीकरणासाठी सौर ऊर्जा तंत्राचा वापर करण्यात आला. 
  • क) सौर उष्णतेद्वारे पाण्यातील सूक्ष्मजीव काढून टाकणे

  • सामान्यतः पावसाचे पाणी गोळा करण्याचे तंत्र हे प्रामुख्याने औद्योगिक कामासाठी, बागकाम किंवा स्वच्छतेसाठी वापरले जाते. मात्र, नारी संस्थेने विकसित केलेल्या या तंत्राद्वारे वर्षभर पिण्यासाठी पावसाचे पाणी उपलब्ध होऊ शकते.   
  • नारी संस्थेने विकसित केलेल्या या तंत्रामध्ये सौर ऊर्जेच्या साह्याने पाणी गरम केले जाते. या यंत्रणेची क्षमता १५ लिटर इतकी असून, त्यात चार नलिका एका मॅनीफोल्डला जोडलेल्या आहेत. अगदी ढगाळ दिवसानंतर ही तीन तासांपर्यंत पाण्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअस इतके स्थिर राहते. इतके तापमान पाण्यातील सूक्ष्मजीव अकार्यक्षम करण्यासाठी पुरेसे असते. 
  • गेल्या दीड वर्षातील चाचण्यांमध्ये ९८ टक्के वेळा या प्रक्रियेतून शुद्ध मिळत असल्याचे दिसून आले आहे.
  • वर्षातील केवळ ६ ते ७ दिवस पाण्याचे तापमान शुद्धीकरण करण्याच्या क्षमतेपेक्षा कमी राहत असल्याचे आढळले आहे. 
  • ग्रामीण शाळांमध्ये करण्यात आले प्रात्यक्षिक

  • फलटण जवळच्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये नारी या संस्थेने या तंत्राच्या चाचण्या घेण्याचे नियोजन केले. त्यासाठी बजाज कंपनीने त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत आर्थिक निधी उपलब्ध करून दिला. यामुळे विद्यार्थ्यांना सौर ऊर्जेचाही परिचय होत आहे. 
  • खर्च आणखी कमी करण्यासाठी...   या संपूर्ण तंत्रामध्ये पाण्याच्या टाकीची किंमत सर्वाधिक असून, एकूण किमतीच्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक खर्च त्याचाच आहे. ग्रामीण भागातील गरीब लोकांपर्यंत हे तंत्र पोचवण्यासाठी हा खर्चाचा भार पूर्ण अथवा काही अंशी कमी करावा लागेल. शासनाच्या पेयजल सर्वांसाठी या योजनेअंतर्गत दरवर्षी ५ ते १० कोटी रुपये खर्च होतात. त्यातून काही अनुदान या तंत्रज्ञानासाठी मिळाल्यास हे तंत्र आणखी स्वस्त होऊ शकते, असे मत संस्थेच्या अध्यक्षा नंदिनी निंबकर यांनी व्यक्त केले. 

    - anilrajvanshi50@gmail.com

    (अनिल राजवंशी हे निंबकर कृषी संशोधन संस्था (नारी), फलटण येथे संचालक असून, नंदिनी निंबकर या अध्यक्षा आहेत.)  

    Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

    ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com