
राजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन केंद्राने विकसित केलेल्या रुंद वरंबा सरी पद्धतीने कांदा लागवडीचे प्रमाण तुलनेने विदर्भात कमी आहे. रुंद सरी वरंबा, ठिबक सिंचन व त्याद्वारे विद्राव्य खतांचा वापर अशा सुधारित तंत्राचा पारंपरिक कांदा लागवडीसोबत तुलनात्मक अभ्यास अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत अकोला व नागपूर येथील तज्ज्ञ करत आहेत. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या अभ्यासातून ३३ टक्क्यांपर्यंत पाणी बचत, कांद्याचा एकसमान आकार, दर्जा सुधार, साठवणीमध्ये पाच महिन्यांपर्यंत टिकवण असे सकारात्मक निष्कर्ष पुढे आले आहेत.
तंत्रशुद्ध लागवड पद्धत
कमी पाण्यात अधिक उत्पादकता
तुलना कांद्याची मुळे दोन इंचांपेक्षा खाली जात नाही. त्यामुळे जमिनीचा मगदूर आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता यानुसार वारंवार पाणी द्यावे लागते. जानेवारीत असणारे तापमान, पाण्याचे होणारे बाष्पीभवन यानुसार दोन पाणी पाळ्यांतील अंतर ठरविले जाते. मार्च, एप्रिल महिन्यांत दर दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी पाणी द्यावे लागते. या पिकाला पाणी कमी किंवा जास्त झाले तरी उत्पादकता प्रभावित होते. पारंपरिक सिंचन पद्धत ः बियाणे फेकून किंवा यंत्राद्वारे लागवडीमुळे बियाणे अधिक वापरले जाते. सपाट वाफ्यामध्ये लागवड करताना दोन रोपांतील अंतर कमी अधिक राहिल्याने रोपांची गर्दी कमी अधिक होऊन उत्पादनावर व दर्जावर परिणाम होतात. तसेच सपाट वाफ्यामध्ये पाटपाणी पद्धतीने पाणी देताना दोन पाण्यातील अंतर समान ठेवण्यात अडचणी येतात. ठिबक सिंचन ः रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये दोन झाडे आणि दोन ओळींतील अंतर समान (दहा सें.मी.) ठेवले जाते. परिणामी, अन्नद्रव्य, पाणी, सूर्यप्रकाश आणि हवा मिळवण्यासाठी स्पर्धा होत नाही. प्रत्येक रोपाला पोषक घटक सम प्रमाणात मिळतात. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेमध्ये ठिबक पद्धतीमुळे दर दुसऱ्या दिवशी आणि समान पाणी देता येते. यामुळे पाणी बचत होते. सरासरी ३३ टक्के पाणी बचत होते. पाण्यात १०० टक्के विद्राव्य खते फर्टिगेशनद्वारे समान मात्रेमध्ये विभागून देता येतात. यामुळे उत्पादकता व दर्जा वाढण्यास मदत होत असल्याचे दोन वर्षांच्या अभ्यासातून दिसून आले आहे. कांद्याचा आकार एकसारखा आणि प्रत चांगली मिळाल्याने बाजारात चांगला दर मिळतो. फायदे सुधारित तंत्रामुळे कांद्याची काढणीपश्चात टिकवणक्षमता अधिक (काढणीपासून पाच ते सहा महिने) मिळते. पारंपरिक पद्धतीमध्ये कांद्याची साठवणक्षमता केवळ तीन महिन्यांपर्यंत असते, अशी माहिती डॉ. श्याम घावडे आणि डॉ. अनिल पिंपळे यांनी दिली. महाराष्ट्रात लागवड क्षेत्र अधिक उत्पादकता कमी कांद्याचे उत्पादन आणि क्षेत्र याचा विचार केल्यास देशाच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्रात ५२ ते ५८ टक्के कांदा उत्पादन होते. त्यानंतर गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगण या राज्याचा क्रमांक लागतो. गुजरातमध्ये क्षेत्र कमी असले तरी महाराष्ट्राच्या तुलनेत उत्पादकता अधिक आहे. ३४ राज्यांपैकी १० ते ११ राज्यांतच फायदेशीर कांदा लागवड होते. ही प्रमुख राज्येच देशाची कांद्याची गरज भागवतात. परिणामी, दरात वाढ झाल्यास शासनावर दबाव येतो. कांद्याच्या बाजारपेठेवर एनएचआरडीएफ, नाफेड आणि डीओजीआर (राजगुरुनगर) अशा तीन संस्था लक्ष ठेवून असतात. देशातील प्रत्येक राज्याची गरज, मागणी आणि पुरवठा याचे नियंत्रण या संस्थांद्वारे होते. कांदा लागवड देशात ११ लाख हेक्टर तर महाराष्ट्रात ५ लाख हेक्टरपेक्षा अधिक आहे. कांद्याच्या या आहेत हंगामनिहाय जाती ः रब्बी हंगामासाठी ‘अकोला सफेद’ची शिफारस. राजगुरुनगर केंद्राच्या तीन हंगामासाठी उपलब्ध कांदा जाती ः खरीप-लेटखरीप ः (गडद लाल रंग)- एन-५३, बसमत ७८०, भीमा सुपर, फुले समर्थ, भीमा रेड, भीमा शुभ्र, अॅग्री फाउंड व्हाइट, रब्बी (लाल कांदा) ः भीमा शक्ती, एएफएलआर, (भगवा) एन-२-४-१. (पांढरा) फुले सफेद आणि अकोला-सफेद, भीमा शुभ्रा, भीमा श्वेता, ॲग्री फाउंड व्हाइट.
डॉ. श्याम घावडे, ७०२०५७५८६७
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.