दूध प्रक्रिया उद्योगातील उपकरणे

दुधावर प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक यंत्रांचा वापर केल्यामुळे स्वच्छतेचे निकष पाळणे अधिक सोपे होते. त्यामुळे दुधाची गुणवत्ता आणि चव टिकून राहते.
दूध प्रक्रिया उद्योगातील उपकरणे
दूध प्रक्रिया उद्योगातील उपकरणे

दूध हा नाशीवंत पदार्थ असल्यामुळे उत्पादित आणि संकलित दुधाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. टिकवणक्षमता वाढविण्यासाठी दुधावर विविध प्रक्रिया करणे गरजेचे असते. या सर्व प्रक्रिया करण्यासाठी विविध उपकरणांची आवश्‍यकता असते. दुधावर प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक यंत्रांचा वापर केल्यामुळे स्वच्छतेचे निकष पाळणे अधिक सोपे होते. त्यामुळे दुधाची गुणवत्ता आणि चव टिकून राहते. तसेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खराब होण्याची शक्यता कमी होते. दूध गरम करण्यासाठी यंत्र (पाश्‍चरायझर)  दुधाची टिकवणक्षमता वाढविण्यासाठी दूध निर्जंतुक करणे आवश्‍यक असते. त्यासाठी दूध तापविणे किंवा पाश्‍चरायझेशन करणे ही अत्यंत प्रभावशील प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये ७२ अंश सेल्सिअस तापमानावर १५ सेकंदांसाठी दूध गरम केले जाते. त्यानंतर ४ अंश सेल्सिअसपर्यंत थंड करून साठवून ठेवले जाते. या प्रक्रियेमुळे दुधातील घातक जिवाणू, विषाणू नष्ट होतात. असे दूध पिण्यास अधिक सुरक्षित असते. दूध तापवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बॅच पाश्‍चरायझर (एलटीएलटी-लो टेम्परेचर लाँग टाइम) किंवा प्लेट पाश्‍चरायझर (एचटीएसटी-हाय टेम्परेचर शॉर्ट टाइम) या यंत्राचा वापर केला जातो. बॅच पाश्‍चरायझर

 •  हे उपकरण लहान स्तरावर दूध प्रक्रिया करणाऱ्या दूध उत्पादकास अत्यंत फायदेशीर आहे. तसेच वापरण्यास सोपे व सुरक्षित आहे.
 •  हे उपकरण गोलाकार आकाराचे असून स्टेनलेस स्टीलच्या दुहेरी पत्र्याचे बनलेले असते. दोन पत्र्यांदरम्यान गरम पाणी किंवा वाफ फिरवली जाऊन आतील दूध अप्रत्यक्षरीत्या गरम होते. यामुळे दुधाची करपण्याची शक्‍यता कमी असते. उपकरणातील दूध एकसमान तापविण्यासाठी उपकरणात एक ढवळणीदेखील बसवलेली असते. तापलेले दूध याच उपकरणातून थंडदेखील करता येते.
 •  उपकरणाची क्षमता ५० ते ५०० लिटर इतकी आहे. या उपकरणात दूध ६३ अंश सेल्सिअस तापमानावर ३० मिनिटांसाठी तापवून निर्जंतुक करता येते.
 •  दही, आइस्क्रीम, पनीर इत्यादी पदार्थ करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.
 • होमोजिनायझर (एकजीव करण्याचे उपकरण)

 •  होमोजिनायझर म्हणजे उच्च दाबावर दुधावर प्रक्रिया केले जाते. या प्रक्रियेमुळे दुधावर साय येत नाही.
 •  या उपकरणाच्या मदतीने ३३ ते निश्‍चित ५५ अंश सेल्सिअस तापमानावर दूध एकजीव (होमोजिनायझ) केले जाते.
 •  या प्रक्रियेमध्ये साधारण २००० ते २५०० पीएसआय दाबांवर दूध एकजीव केले जाते.
 •  हे अर्धस्वयंचलित यंत्रासाठी थ्री फेज व ४१० व्होल्ट ऊर्जा लागते.
 •  या प्रक्रियेमुळे दुधातील पिवळेपणा कमी होऊन दुधाच्या पृष्ठभागावर थर जमा होण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे वाहतुकीदरम्यान दुधातील फॅटचे प्रमाण सर्वत्र समान राहण्यास मदत होते.
 • क्रीम सेपरेटर

 •  दुधातील स्निग्धांश वेगळे करण्यासाठी दूध प्रक्रिया उद्योगात क्रीम अथवा मलई सेपरेटर वापरतात.
 •  या यंत्राद्वारे प्रति तास ५ लिटर ते १ लाख लिटर किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने दुधावरील मलई वेगळी करता येते.
 •  यंत्राचा बहुतांश भाग स्टेनलेस स्टीलचा बनलेला असतो.
 •  यंत्र चालवण्यासाठी ०.५ एचपी ते विविध एचपी क्षमतेच्या इलेक्‍ट्रिक मोटारचा वापर करण्यात येतो.
 •  या यंत्रामध्ये एका बाजूने दूध टाकून दुसऱ्या बाजूकडून मलई व स्कीम मिल्क (स्निग्धांशविरहित दूध) बाहेर येते.
 •  यंत्रामधून आवश्‍यक तेवढ्याच फॅटचे दूध मिळवता येते.
 • दूध थंड करण्यासाठी यंत्र फ्रिज  फ्रीजमध्ये १ लिटरपासून ते २० लिटरपर्यंत दूध ५ ते १० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत ठेवता येते. बाजारात २५० ते ५०० लिटर क्षमतेचे फ्रिज उपलब्ध आहे. बल्क कुलर 

 •  हे स्टेनलेस स्टीलपासून बनविलेले असून चौकोनी, आयताकृती आणि अंडाकृती आकाराचे असते.
 •  बल्क कुलर हे दुहेरी पत्र्याचे बनविलेले असतात. आतील-बाहेरील पत्र्यांमध्ये थर्माकोल, ग्लासवुल किंवा उष्णतारोधक पदार्थांचा लेप दिलेला असतो. त्यामुळे बल्क कुलरमधील दुधाच्या तापमानावर बाहेरील वातावरणातील तापमानाचा परिणाम होत नाही.
 •  बल्क कुलरमधील दूध थंड करण्यासाठी कॉम्प्रेसरची जोडणी केलेली असते. हे बल्क विद्युत किंवा जनरेटरवर चालविता येतात.
 •  उपकरणाच्या वरील बाजूस एक झाकण असून, एक ढवळणीसुद्धा जोडलेली असते. या ढवळणीमुळे दुधाचे तापमान सर्व ठिकाणी समान राखले जाते. दुधावर साय येत नाही.
 •  यामध्ये दुधाचे तापमान ५ ते १० अंश सेल्सिअस राखता येते. त्यामुळे दुधाची टिकवणक्षमता वाढते.
 • डीप फ्रीजर 

 •  डीप फ्रिजर हे स्टेनलेस स्टील किंवा फायबरमध्ये तयार केलेले असतात. याचा उपयोग आइस्क्रीम, पनीर, श्रीखंड आणि इतर दुग्धजन्य पदार्थ अधिक काळ साठविण्यासाठी होतो.
 •  यामध्ये ० अंश सेल्सिअस ते -२८ (वजा २८) अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान राखता येते.
 •  या फ्रीजरची क्षमता १०० ते १००० लिटर किंवा अधिक असते.
 • मिल्क प्लेट चिलर

 •  दुधाची गुणवत्ता उत्तम ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
 •  यामध्ये दूध ४ अंश सेल्सिअस तापमानाला थंड केले जाते.
 •  या उपकरणामध्ये स्टेनलेस स्टीलच्या प्लेट असतात. एका बाजूने थंड पाणी आणि दुसऱ्या बाजूने दूध प्रवाहित करून दूध थंड केले जाते.
 • - चंद्रकला सोनवणे, ७९७२९९९४६४ (के.एस.के. अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)

  Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

  ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  agrowon.esakal.com