वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन केंद्राने विहीर, कूपनलिका पुनर्भरणाचे तंत्र विकसित केले आहे. सध्याच्या काळात विहीर, कूपनलिका पुनर्भरणाच्या उपाययोजना कराव्यात. यामुळे येत्या काळात पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे शक्य होईल.
मागील वर्षी दमदार पाऊस झाला नसल्याने शेतशिवारातून पाणी वाहिलेले नाही, त्यामुळे जमिनीत पाणी मुरलेले नाही. त्यामुळे विहीर आणि कूपनलिकेतील पाणी पातळीत फारशी वाढ झालेली नाही. मात्र सध्याच्या काळात विहीर, कूपनलिकेतील पाणी उपसा वाढला आहे. त्या प्रमाणात पाण्याचे पुनर्भरण होत नाही. यंदा भूजल पातळीत १ ते ३.७५ मीटरपर्यंत घट दिसून आलेली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतातील विहीर आणि कूपनलिकांचे पुनर्भरण करावे. यातून पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे.
शेतजमिनीतून वाहणारे पावसाचे पाणी एकत्रितपणे वळवून विहिरीजवळ आणावे. या पाण्याचा उपयोग विहीर पुनर्भरणासाठी करावा. परंतु हे पावसाचे वाहणारे पाणी सरळ विहिरीत सोडू नये, कारण वाहणाऱ्या पाण्यात माती गाळमिश्रण असते. जर असे पाणी सरळ विहिरीत सोडले तर विहिरीत गाळ साठत जातो. कोरडवाहू शेती संशोधन केंद्राने विहीर पुनर्भरण तंत्रज्ञान विकसित केले आहे. यात दोन प्रकारच्या गाळण यंत्रणा आहेत. यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर येणारा गाळ अडविला जातो. शुद्ध पाणी विहिरीत सोडले जाते. शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या रचनेनुसार पावसाचे वाहते पाणी गाळण यंत्रणेकडे वळवावे. शेतातील पाणी सरळ टाक्यात घेण्याएवजी टाक्याबाहेर एक साधा खड्डा करून त्यात दगड, गोटे, रेती भरावी. त्यातून एक पीव्हीसी पाइपने पाणी प्रथम प्राथमिक गाळण यंत्रणेत घ्यावे. शेताकडील चारीद्वारे वाहणारे पाणी प्रथम प्राथमिक गाळण यंत्रणेत घ्यावे. मुख्य गाळण यंत्रणेच्या अलीकडे १.५ मीटर बाय १ मीटर बाय १ मीटर आकाराची दुसरी टाकी बांधावी. त्याला प्राथमिक गाळण यंत्रणा म्हणतात. शेतातून वाहत येणारे पाणी प्रथम या टाकीत घ्यावे. तेथे जड गाळ खाली बसतो, थोडे गढूळ पाणी पीव्हीसी पाइपच्या माध्यमातून किंवा खाचे द्वारे मुख्य गाळण यंत्रणेत सोडावे. विहीर पुनर्भरण मॉडेलच्या दुसऱ्या भागाला मुख्य गाळण यंत्रणा असे म्हणतात. ही यंत्रणा विहिरीपासून २ ते ३ मीटर अंतरावर बांधावी. यासाठी २ मी. लांब x २ मी. रुंद आणि २ मी. खोल खड्डा करावा. याला आतून सिमेंट विटांचे बांधकाम करून टाकीसारखे बांधून घ्यावे. यात मुख्य गाळण यंत्रणेच्या खालील भागातून चार इंच व्यासाचा पीव्हीसी पाइप विहिरीत सोडावा. या टाकीत ३० सें.मी. उंचीपर्यंत मोठे दगड, नंतर ३० सें.मी. उंचीपर्यंत छोटे दगड आणि त्यावर ३० सें.मी. जाडीचा वाळूचा थर टाकावा. असे ९० सें.मी. जाडीचे गाळण थर असावे. त्यावरील ६० सें.मी. भागात पाणी साठते. या गाळण यंत्रणेमार्फत पाणी गाळले जाऊन विहिरीत सोडावे. साधारणतः दोन एकर क्षेत्रातून वाहणारे पावसाचे पाणी विहीर पुनर्भरणासाठी वापरले तर निश्चितच २ ते ३ वर्षांत विहीर पाणीपातळीत १.५ ते २ मीटरपर्यंत वाढ दिसून आली. पाण्याचा शाश्वत स्रोत निर्माण होऊ शकतो. उपलब्ध पाण्याचा वापर तुषार सिंचनाच्या माध्यमातून केल्यास पिकांचे शाश्वत उत्पादन मिळू शकते. शेतकऱ्यांनी स्वतः वाळू, विटा, सिमेंट खरेदी करून बांधकाम केल्यास १०,००० रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. एकदा हे बांधकाम व्यवस्थित केले, तर त्याचे आयुष्यमान १० वर्षं राहते. फक्त दर दोन वर्षांनी गाळण टाकी आणि साहित्याची स्वच्छता करावी. कूपनलिका पुनर्भरण यंत्रणा दोन भागांत विभागली आहे. प्रथम भाग म्हणजे प्राथमिक गाळण यंत्रणा. शेतातील पावसाचे वाहते पाणी चरांद्वारा वळवून एकत्रितरीत्या प्राथमिक गाळण यंत्रणेपर्यंत आणावे. प्राथमिक गाळण यंत्रणेसाठी १ मीटर x १ मीटर x १ मीटरचा खड्डा तयार करून यात मोठे व छोटे दगड टाकावेत. आतून तीन इंच व्यासाचा पीव्हीसी पाइप मुख्य गाळण यंत्रणेत सोडावा. प्राथमिक गाळण यंत्रणेमुळे पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येणारा काडीकचरा, तसेच काही प्रमाणात गाळ अडविण्यास मदत होते. मुख्य गाळण यंत्रणेत कमी गाळाचे पाणी जाऊन मुख्य गाळण यंत्रणेचे आयुष्य वाढविण्यास मदत होते. दुसरा भाग म्हणजे मुख्य गाळण यंत्रणा. यामध्ये कूपनलिकेच्या सभोवताली १.५ मीटर व्यासाचा दोन मीटर खोल खड्डा करावा. त्यातील माती वर काढून घ्यावी. तसेच केसिंग पाइप पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावा. केसिंग पाइपला खालून ५० सें.मी. उंचीपर्यंत बारीक छिद्रे करावीत. त्यावर नायलॉन जाळी झाकून पक्की बांधावी. नंतर खड्ड्याच्या तळातून ५० सें.मी. उंचीपर्यंत मोठे दगड, त्यानंतर ५० सें.मी. उंचीपर्यंत छोटे दगड आणि त्यावर ३० सें.मी. उंचीपर्यंत मोठी वाळू, शेवटचा थर २० सें.मी. उंचीपर्यंत बारीक वाळूचा द्यावा. यानंतर त्यावर १.५ मीटर व्यासाची सिमेंट रिंग ठेवून मुख्य गाळण यंत्रणेचे काम पूर्ण करावे. वरच्या भागात सिमेंट रिंग ठेवण्याचा उद्देश म्हणजे बाजूची माती खड्ड्यात किंवा गाळण साहित्यावर पावसामुळे घसरून पडणार नाही. यामुळे संपूर्ण यंत्रणा दीर्घकाळापर्यंत सुरक्षित राहते. संशोधनाचे निष्कर्ष कूपनलिका पुनर्भरणामुळे कूपनलिकेतील पाणीपातळी ३ ते ३.५ मीटरपर्यंत वाढली. भूजल साठ्यात २५ ते ३० टक्के वाढ झाली. सिंचन क्षमता २५ टक्के वाढली. त्यामुळे उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली.
- डॉ. मदन पेंडके ः ९८९०४३३८०३ (अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन केंद्र,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)