
नगर ः यांत्रिकीकरण (Agriculture Mechanization) उपअभियानातून शेती अवजारे, यंत्रांसाठी दोन वर्षांत २ लाख १८ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले. मात्र गरज नसलेल्या बाबीसाठी निवड झालेल्या सुमारे ३४ हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतलाच नाही. त्यामुळे त्यांची निवड रद्द झाली आहे. (Farmers Denied Benefit Of Agricultural implements And Machinery)
शेतकऱ्यांना शेती करताना यांत्रिकरणाचा लाभ मिळावा, या साठी शेती अवजारे, यंत्र खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, या साठी कृषी विभागातर्फे यांत्रिकीकरण उपअभियान योजना राबवली जात आहे. त्यात भरडधान्य विकास योजनेतून मका सोलणी यंत्र, ऊसविकास योजनेतून पाचटकुट्टी, कापूस विकास योजनेतून कापूस फरदड कुट्टी यंत्र, राष्ट्रीय कृषी विकास योजना केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेतून विविध यंत्रे, अवजारे, ट्रॅक्टर, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, पौष्टिक, तृणधान्य, गळीतधान्य तेलताडमधून अवजारे आदींसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरले जातात. यांत्रिकरणासह अन्य योजनांसाठी नगर जिल्ह्यात यांत्रिकरणासाठी २ लाख १८ हजार ५२४ अर्ज आले. त्यातून साडेसात हजार शेतकरी पात्र ठरले म्हणजे आलेल्या अर्जाच्या तीन टक्के शेतकऱ्यांनाच यांत्रिकरणातून लाभ मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.
टॅक्टरला मागणी; लाभ अल्प
नगर जिल्ह्यात मजूर टंचाई, शेतीच्या कामाची होणारी धावपळ पाहता ट्रॅक्टर घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यामुळे यांत्रिकीकरण उपअभियानातून ट्रॅक्टरसाठी अनुदान मिळावे, यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. केवळ दोन वर्षांत ८५ हजार २५६ लाभार्थ्यांनी अर्ज केले. त्यातील ३१ हजार ७०९ शेतकऱ्यांची सोडतीत निवड झाली. पंधरा हजार शेतकऱ्यांनी पुढील प्रक्रियेत सहभाग घेतला. अकरा हजार शेतकऱ्यांना पूर्वसंमती दिली. सुमारे नऊ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला. त्यातही पावणे तीन हजार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुदान मिळाले. अर्जांचा विचार करता पाच टक्के शेतकऱ्यांनाही ट्रॅक्टरचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे मागणी असलेल्या घटकांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.
यांत्रिकीकरण घटकांसाठीची दोन वर्षांतील स्थिती
एकूण अर्ज...२ लाख १८ हजार ५२४
सोडतीत निवड झालेले लाभार्थी...४९५३८
निवड रद्द झालेले लाभार्थी...३४ हजार ०३९
निवडीनंतरच्या प्रक्रियेत सहभागी लाभार्थी...१५,३९९
लाभ घेऊन बिले सादर...८३७९
अनुदानास पात्र लाभार्थी...७४८१
प्रत्यक्ष अनुदान मिळालेले लाभार्थी...६४१२
वितरित अनुदान...३७ कोटी ४१ लाख २८ हजार रुपये
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.