
Pune News पुणे : राज्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत (Annasaheb Patil Corporation) राज्यातील तरुणांसाठी दोन योजना (Government Scheme) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये छोट्या व्यावसायिकांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज आणि शैक्षणिक कर्ज (Education Loan) अशा योजनांचा समावेश असून, त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा शुक्रवारी (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत पाटील यांनी ही माहिती दिली.
पाटील म्हणाले, की छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदतीसाठी दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण देण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय बँकेशी चर्चा करण्यात आली आहे. बँकेकडूनही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.
यापूर्वी बँकेकडूनही तारण घेऊन कर्ज दिले जात होते. आता मात्र तारण घेतले जाणार नाही. त्यामुळे सहज कर्ज उपलब्ध होऊन व्यवसाय वृद्धी होण्यास मदत होणार आहे.
तसेच शैक्षणिक कर्जामध्ये ४० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. त्याचा शासननिर्णय लवकरच काढला जाईल.
राज्यात २०१८ पासून ते आतापर्यंत ५७ हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. त्यांना ३ हजार ८५० कोटींचे कर्ज दिले आहे. या कर्ज व्याजाच्या रकमेचा परतावा ३६० कोटी रुपये महामंडळाने दिले आहेत.
यामध्ये पुणे जिल्ह्यात ३०७२ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. त्यांना १९२ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. त्यासाठी १९ कोटींचा व्याजपरतावा दिला आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय बँकेनी लाभ देताना समाधानकारक काम केलेले नाही. त्यामुळे येत्या आर्थिक वर्षापासून कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात येईल.
मागील वर्ष आणि पुढील वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण करून अधिक तरुणांना लाभ देण्याचे आश्वासन बँकेकडून देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
तसेच योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी बँकेना स्किम कोड देण्यात येणार असून, त्यामुळे पेंडिंग अर्जाची संख्या बँकनिहाय कळणार आहे.
योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर एक समन्वयक नेमला जाणार असून, जिल्हा स्तरावर एक अशा स्वरूपाची रचना केली जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात या योजनेचा लाभ सर्वसामान्य तरुणांपर्यंत पोहोचणार आहे.
पुणे जिल्हा बँक कर्ज देण्यास उदासीन :
पुणे जिल्ह्यात शरद सहकारी बँकेच्या १८ शाखा असून, या बँकेने ११४ लाभार्थ्यांना कर्जवाटप केले आहे. याबद्दल पाटील यांनी कौतुक करून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सहकार क्षेत्रातील सर्वांत मोठी शाखा आहे.
जिल्ह्यात सुमारे ३०० शाखा आहेत. यंदा अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनेचा लाभ फक्त १३ लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. जिल्ह्यात अग्रेसर असलेली ही बँक कर्ज वाटपात उदासीन आहे.
त्यांना चालू वर्षी अधिक लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ देण्यासाठी कर्जवाटपाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पुणे जिल्हा बँक ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. हे महामंडळ तत्कालीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी स्थापन केले आहे.
त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महामंडळाचे काम मागे पडले. सत्ताबदल झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असून, पुन्हा या सरकारने गती देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातही सर्व योजना राबविताना जिल्हा बँकेने या योजनेतही लाभार्थी वाढवावेत, अपेक्षा व्यक्त केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.