
Pune Irrigation News : मागासवर्गीय अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सिंचनाची (Agriculture Irrigation) शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना (Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana) राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत २०२२-२३ वर्षासाठी जिल्ह्यातील ८२ लाभार्थ्यांना झाला असून त्यांना ३४ लाख रुपये अनुदानापोटी (Subsidy) देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने (Agriculture Depart) या बाबातची माहिती दिली आहे.
योजनेतून देण्यात येणारे अनुदान -
राज्य सरकार पुरस्कृत या योजनेंतर्गत नवीन विहीरीसाठी २ लाख ५० हजार रुपये, शेततळ्यांच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी १ लाख, जुनी विहिर दुरुस्ती ५० हजार, इनवेल बोअरींग व पंपसंचासाठी प्रत्येकी २० हजार रुपये, वीज जोडणी आकार १० हजार रुपये तसेच सूक्ष्म सिंचन संच अंतर्गत ठिबक सिंचन संचासाठी ५० हजार किंवा तुषार सिंचन संचासाठी २५ हजार रुपये या मर्यादेत अनुदान देण्यात येते.
योजनेसाठी पात्रता -
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचीत जाती किंवा नवबौद्ध संवर्गातील असावा. शेतकऱ्याच्या नावे किमान ०.२० हेक्टर आणि कमाल ६ हेक्टर मर्यादेत जमीन असावी. नवीन विहिरीचा लाभ घेण्यासाठी किमान ०.४० हेक्टर स्वत:च्या नावे किंवा एकत्रित कुटुंबाची सामूहिक जमीन असावी. नविन विहिरी व्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घेण्यासाठी किमान ०.२० हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्याचे सर्व मार्गानी मिळणारे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य राहील. बँक खाते आधार कार्ड संलग्न असणे आवश्यक आहे.
याशिवाय प्रस्तावित विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून ५०० फूटापेक्षा जास्त अंतरावर असल्याचा दाखला तसेच भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला आवश्यक आहे.
ही योजना पॅकेजस्वरुपात राबवली जाते. यामध्ये नवीन विहीर पॅकेज मध्ये नवीन विहीर, वीज जोडणी आकार, तुषार किंवा ठिबक संच, पंप संच असे एकूण ३ लाख ५ हजार ते ३ लाख ३० हजार रुपये देण्यात येतात. जुनी विहीर दुरुस्ती पॅकेजमध्ये जुनी विहीर दुरुस्ती, वीज जोडणी आकार, तुषार किंवा ठिबक संच, पंप संच असे एकूण १ लाख ५ हजार ते १ लाख ३० हजार रुपये तर शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण पॅकेजमध्ये प्लॅस्टिक अस्तरीकरण, वीज जोडणी आकार, तुषार किंवा ठिबक संच, पंप संच असे एकूण १ लाख ५५ हजार ते १ लाख ८० हजार रुपये लाभाचा समावेश आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे, असेही जिल्हा परिषदेच्या कृषि विकास अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.