Agriculture Warehouse : गोदाम उभारणी नोंदणी प्रक्रियेतील टप्पे

प्रकल्पात महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या सुमारे ११२ हून अधिक गोदामामधील स्वच्छता आणि प्रतवारी केंद्रे भाड्याने घेऊन व्यवसाय सुरू केला आहे.
Warehouse
Warehouse Agrowon

मिलिंद आकरे, हेमंत जगताप

बऱ्याच शेतकरी उत्पादक कंपनी (Farmers Producers Company), सहकारी संस्था आणि महिला बचत गटांचे फेडरेशन या सर्व समुदाय आधारित संस्थांनी गोदाम (Warehouse Industry) उभारणी व त्यातून उद्योग उभारणीसाठी कंबर कसली आहे.

बहुतेकांनी पोकरा (POCRA), स्मार्ट, कृषी पायाभूत निधी (Agricultural Infrastructure Fund), कृषी पणन पायाभूत योजना (AMI), राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (national Food Security Mission) (NFSM), राष्ट्रीय सहकारी विकास निगम (NCDC), बियाणे व लागवडयोग्य साहित्य विषयक मिशन (SMSP) अशा विविध शासकीय विभाग व योजनांमधून गोदाम, तसेच स्वच्छता आणि प्रतवारी केंद्रांची उभारणी केली आहे.

सन २०१० ते २०१९ या कालावधीत महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे ८३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांद्वारे गोदामे उभारण्यात आली. ही गोदामेदेखील काही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी भाडेतत्त्वावर घेऊन व्यवसायासाठी प्रयत्न सुरू केला आहे.

याच प्रकल्पात महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या सुमारे ११२ हून अधिक गोदामामधील स्वच्छता आणि प्रतवारी केंद्रे भाड्याने घेऊन व्यवसाय सुरू केला आहे.

या सर्व घडामोडींमध्ये या संस्थांच्या संचालक मंडळाची गोदामविषयक क्षमता बांधणी अत्यंत आवश्यक असून, त्याकरिता महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ विविध माध्यमांद्वारे प्रयत्न करीत आहे.

वैज्ञानिक पद्धतीने गोदाम उभारणी व त्यातून उद्योग उभारणी याकरिता गोदाम उभारल्यानंतर व्यवसायविषयक परवाना घेणे आवश्यक आहे.

त्यासाठी वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाने सुचविलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार गोदाम प्रमाणीकरण परवाना घेणे गरजेचे आहे. याकरिता नोंदणी प्रक्रिया समजावून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

नोंदणी प्रक्रिया ः

वखार विकास व नियामक प्राधिकरणाकडे गोदाम प्रमाणीकरण परवाना घेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. त्यामुळे गोदाम व्यावसायिकाला बँकेमार्फत आर्थिक साह्य मिळू शकते.

गोदाम (विकास व नियमन) व गोदाम नोंदणी अधिनियम २०१७ नुसार सुरुवातीला गोदाम नोंदणी प्राधिकरणाने (Warehouse Development and Regulatory Authority-WDRA) ठरवून दिलेल्या प्रपत्रानुसार भौतिक पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक होते.

परंतु विविध कागदपत्रांची पूर्तता व त्यानुसार यादी तयार करून कागदपत्रे जमा करणे ही अत्यंत गुंतागुंतीची व वेळखाऊ प्रक्रिया आहे.

त्यामुळे गोदाम नोंदणी प्रमाणीकरण प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक व जलद करण्याकरिता प्राधिकरणाने गोदाम प्रमाणीकरण नोंदणी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला.

गोदाम प्रमाणीकरण नोंदणी अर्ज प्रक्रियेशी संबंधित इतर बाबी जसे की,

१) अर्जाचे ऑनलाइन पद्धतीने शुल्क अदा करणे.

२) अर्ज प्रक्रियेतील माहितीचे टप्पे ऑनलाइन भरणे.

३) गोदामाची भौतिक तपासणी करण्यासाठीचे कामकाज तपासणी करणाऱ्या सेवा पुरवठादार संस्थेला ऑनलाइन सुपूर्द करणे.

Warehouse
Ware housing : गोदाम उभारणीद्वारे शेतीमाल विक्री व्यवस्थापन

४) गोदामाची भौतिक तपासणी झाल्यानंतरचा तपासणी अहवाल सेवा पुरवठादार संस्थेमार्फत ऑनलाइन जमा करणे.

५) सुरक्षा ठेव रक्कम प्राधिकरणास जमा करणे. तसेच गोदाम प्रमाणीकरण नोंदणी प्रमाणपत्र गोदाम धारकास सर्व प्रक्रियेनंतर अदा करणे. हे सर्व टप्पे पूर्ण करता येतात. प्राधिकरणाने १ नोव्हेंबर २०१७ पासून गोदाम प्रमाणीकरण नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्याकरिता गोदाम प्रमाणीकरण नोंदणी प्रणाली सुरू करून त्याचा वापर करण्यास मान्यता दिली.

६) इच्छुक अर्जदारांनी http://wdra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाइन प्रणालीवर प्राथमिक नोंदणी करून अर्जासह सर्व कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.

७) ऑनलाइन प्रणालीमध्ये माहिती भरण्याकरिता संपूर्ण मार्गदर्शक सूचना प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्यानुसार ऑनलाइन प्रणालीवर माहिती भरून आवश्यकतेनुसार कागदपत्रांची पूर्तता करावी.

८) यामध्ये सुरुवातीला प्राधिकरणाच्या पोर्टलला भेट देऊन क्रेडेंशियल्स (यूजर आयडी व पासवर्ड) तयार करावे. त्यानंतर प्रत्येक अर्जदाराने पोर्टलला भेट देऊन आवश्यक माहिती सादर करावी. यूजर आयडी व पासवर्ड कोणालाही देऊ नयेत किंवा दाखवू नयेत. जेणेकरून इतर कुणीही आपल्या गोदामाची माहिती अथवा इतर वैयक्तिक माहिती पाहू शकणार नाही.

९) भविष्यातील सर्व गोदामविषयक माहिती, तसेच पुढील सर्व व्यवहार व सूचना या दिलेल्या क्रेडेंशियल्स (यूजर आयडी व पासवर्ड) वरूनच कराव्यात.

९) गोदामांची अर्ज प्रक्रिया गतिमान व सोपी करण्यासाठी बिगर-वैयक्तिक व संस्थात्मक गोदाम सेवा (समुदाय आधारित संस्था (जसे की शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था व महिला बचत गटांचे फेडरेशन इ.) पुरविणाऱ्या अर्जदारांना दोन टप्प्यांत नोंदणी करता येते.

पहिल्या टप्प्यात गोदामधारकांनी अर्ज सादर करावा. त्यास मान्यता मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सर्व गोदामांची माहिती जमा करून ती ऑनलाइन पोर्टलमध्ये जमा करावी.

१०) गोदाम प्रमाणीकरण नोंदणी प्रक्रियेत गोदामांची तपासणी करणाऱ्या सेवा पुरवठादार संस्थांना याच पोर्टलवर नोंदणी करून प्राधिकरणाच्या पॅनेलवर सेवा पुरवठादार संस्था म्हणून नोंदणी करता येते.

तसेच या संस्थांना प्राधिकरणाने नेमून दिलेल्या गोदामांची तपासणी करण्याबाबत माहिती व त्याचा तपासणी अहवालही या पोर्टलवर सादर करता येतो.

प्राधिकरणाच्या ऑनलाइन पोर्टलवर लागणारी कागदपत्रे ः

१) गोदाम धारकाचा किंवा व्यवस्थापकाचे छायाचित्र किंवा अधिकृत गोदाम धारक किंवा व्यवस्थापकाचे छायाचित्र (बिगर-वैयक्तिक संस्था, समुदाय आधारित संस्था जसे की शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था व महिला बचत गटांचे फेडरेशन इ.).

२) गोदाम (विकास व नियमन) व गोदाम नोंदणी अधिनियम २०१७ मधील नियम क्रमांक ५ नुसार अर्जदाराचे ओळखपत्र आवश्यक आहे.

३) गोदाम व्यवस्थापनासाठी प्रमाणित मार्गदर्शन व अंमलबजावणी प्रक्रियेची सूची (Standard Operating Procedure-SOP) तयार करणे गरजेचे आहे.

४) गोदाम (विकास व नियमन) व गोदाम नोंदणी अधिनियम २०१७ मधील नियम क्रमांक १८ (५) नुसार नेटवर्थशी (नेटवर्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या मालकीच्या सर्व गैर-आर्थिक आणि आर्थिक मालमत्तेचे मूल्य वजा जाता त्याच्या सर्व थकबाकी दायित्वाचे मूल्य) संबंधित कागदपत्रे.

५) गोदाम (विकास व नियमन) व गोदाम नोंदणी अधिनियम २०१७ मधील नियम क्रमांक १७ नुसार (२६ एप्रिल २०१७ च्या नोटिफिकेशन नुसार) गोदाम विमा पॉलिसीची कागदपत्रे.

६) गोदाम उभारणीचे नकाशे.

७) शीतगृह उभारणीबाबत नकाशे व इतर माहिती.

८) शीतगृह किंवा गोदाम उभारणीबाबत तांत्रिक प्रमाणीकरण व त्याबाबतची कागदपत्रे.

९) गोदामातील धान्य स्वच्छता व प्रतवारी प्रक्रियेशी संबंधित सर्व प्रकारची उपकरणे व त्यांची यादी.

Warehouse
Poly house-Shed net: साहित्य दरवाढीने ७५ टक्के ‘पॉलिहाऊस-शेडनेट’ रद्द

१०) गोदामातील शेतीमाल वजनविषयक उपकरणे व त्यांची यादी.

११) अग्निशमन उपकरणे यादी (उदा. आगरोधक यंत्रणा व वाळूने भरलेल्या लोखंडी बादल्या).

१२) गोदाम (विकास व नियमन) व गोदाम नोंदणी अधिनियम २०१७ मधील नियम क्रमांक १ व ६ नुसार गोदामाची मालकी किंवा गोदामावरील नियंत्रणाबाबत कागदपत्रे.

प्राधिकरणाच्या ऑनलाइन प्रणालीमध्ये अर्ज करताना उपलब्ध इतर तरतुदी ः

१) अर्ज प्रक्रिया सोपी होण्याच्या अनुषंगाने व गोदाम प्रमाणीकरण नोंदणी प्रक्रियेतील पुढील टप्प्यांचे मूल्यमापन व संनियंत्रण सुटसुटीत होण्याच्या अनुषंगाने गोदाम प्रमाणीकरण नोंदणी प्रक्रियेकरिता खालीलप्रमाणे इतर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.

२) सर्व प्रकारच्या गोदामांच्या प्रकाराकरिता जसे की पारंपरिक गोदामे, शीतगृहे आणि सायलो इ. करिता ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची तरतूद.

३) गोदाम प्रमाणीकरण परवाना नूतनीकरण आणि गोदाम नूतनीकरण/बदल/दुरुस्ती/ गोदाम मालकीत बदल/ गोदाम व्यवस्थापनात बदल. ही सर्व प्रक्रिया गोदाम प्रमाणीकरण नोंदणी झालेल्या तारखेच्या मुदतीच्या ९० दिवसांच्या आत पूर्ण करणे आवश्यक.

४) गोदाम प्रमाणीकरण परवाना रद्द किंवा माघारी घेणे प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली.

५) गोदाम प्रमाणीकरण परवाना मुदत ५ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी असून ती सुरक्षा ठेवीवर आधारित करण्यात आली आहे.

६) पारंपरिक गोदामे, शीतगृहे आणि सायलो इ. सर्व प्रकारच्या गोदामांचे तपासणी अहवाल ऑनलाइन सादर करण्याची तरतूद.

७) सेवा पुरवठादार संस्थांमार्फत तयार करण्यात आलेल्या गोदामांचा तपासणी अहवाल प्रिंट करून पाहण्याची तरतूद उपलब्ध.

८) गोदाम तपासणी करणाऱ्या सेवा पुरवठादार संस्थांमार्फत तपासणी केलेल्या गोदामांची माहिती स्वतंत्र डॅश बोर्डद्वारे पोर्टलवर उपलब्ध.

९) ऑनलाइन संनियंत्रणाची तरतूद, जसे की सुरक्षा ठेव रक्कम मुदत, गोदाम भाड्याने देणे, विमा संरक्षण मुदत बाबत माहिती आणि गोदाम व्यवस्थापक नेमणूक मुदत संपण्यापूर्वीची माहिती.

१०) गोदाम प्रमाणीकरण नोंदणी प्रक्रिया व त्याच्याशी निगडीत नियमनाबाबत अनुपालन अहवाल यांच्यासाठी ऑनलाइन पोर्टलमध्ये एमआयएसची तरतूद (विविध घटकांच्या आकडेवारीबाबत माहितीचे पोर्टल).

११) एकाच गोदामाच्या विविध विमा पॉलिसी प्राधिकरणाच्या पोर्टलवर थेट जमा करण्याची सुविधा उपलब्ध.

१२) गोदाम प्रमाणीकरण नोंदणीची सद्यःस्थिती व प्रत्येक टप्प्यावरील स्थिती जाणून घेण्याकरिता ऑनलाइन डॅशबोर्डची तरतूद.

१३) गोदामातील धान्यसाठाविषयक माहितीची ऑनलाइन उपलब्धता.

प्रशांत चासकर - ९९७०३६४१३० (शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com