
Nanded News : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे.
यासाठी जिल्ह्यातील बँकांनी अपलोड केलेल्या ६३ हजार ४८८ शेतकऱ्यांपेकी ३३ हजार ६०२ शेतकऱ्यांची यादी विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध झाली आहे. परंतु अद्याप २९ हजार ८८६ शेतकऱ्यांची यादी शासनस्तरावर प्रलंबित असल्याने शेतकरी प्रोत्साहन योजनेच्या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात आली. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील विविध बँकांच्या शाखांनी ६३ हजार ४८८ शेतकऱ्यांची यादी अपलोड केली आहे. यापेकी राज्य शासनाकडून ३३ हजार ६०२ शेतकऱ्याची यादी विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध करण्यात आली. यातील ३१ हजार ८९३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेतले आहे.
तर अद्याप एक हजार ७०५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करून घेणे शिल्लक राहिले आहेत. प्रोत्साहन योजनेसाठी प्रसिद्ध झालेल्या यादीतील ३३ हजार ६०२ शेतकऱ्यांपेकी ३० हजार ५९५ शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत ११५ कोटी ७८ लाख रुपयांचा लाभ मिळाल आहे.
परंतु शासनस्तरावर अद्याप २९ हजार ८८६ शेतकऱ्यांची यादी प्रलंबित आहे. यामुळे मागील अनेक दिवसांपासून शेतकरी प्रोत्साहन लाभ योजनेच्या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने बँकांनी अपलोड केलेली संपूर्ण यादी विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध करून पात्र शेतकऱ्यांना त्वरित लाभ देण्याची मागणी होत आहे.
काय आहे प्रोत्साहन योजना?
२०१७-१८ या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीककर्ज ता. ३० जून २०१८ पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास, २०१८-१९ या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीककर्ज ता. ३० जून २०१९ पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास, २०१९-२० या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीककर्ज दिनांक ३१ ऑगस्ट, २०२० पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास अथवा २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णत: परतफेड (मुद्दल + व्याज) केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी २०१८-१९ अथवा २०१९-२० या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीककर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आली होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.