
Agriculture Irrigation Scheme : यापूर्वीच्या शासनाने बंद केलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केली आहे. शेतकरी हितासाठी या योजनेत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या ‘जलतारा’ प्रकल्पाचा (Jaltara Water Project) समावेश केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या वाटूर (ता. परतूर) येथील ‘जलतारा’ प्रकल्प स्थळाच्या पाहणीसह गुरुवारी (ता. २) शेतकरी मेळावा झाला.
त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे (Cm Shinde) बोलत होते. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, बबनराव लोणीकर, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, प्रकल्प प्रमुख डॉ. पुरुषोत्तम वायाळ आदी उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, टंचाईच्या काळात चार हजारांपेक्षा अधिक टँकरने पिण्याचे पाणीपुरवठ्याची वेळ सरकारवर येते. काही भागात उन्हाळी शेतीचाही प्रश्न येतो. शेतीला मुबलक पाणी मिळावे या हेतूने मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना सुरू केली होती.
या योजनेमुळे पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवण्याचे काम झाले. त्यामुळे भूजलपातळी वाढली. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. दुर्दैवाने याआधीच्या अडीच वर्षांत जलयुक्त शिवार योजना बंद करण्यात आली. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ही योजना पुन्हा सुरू केली.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे 'जलतारा’ प्रकल राबविला जात आहे. एक एकर शेतात चार बाय चारचे खड्डे खोदून त्यात लहान, मोठे दगड टाकून पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न होत आहे. याचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना झाला आहे.
त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेत ‘जलतारा’चा समवेश केला जाईल. शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळाले तर शेती पिकेल. शेतकरी आत्महत्या रोखण्याचे काम सरकारचे आहे. गत अडीच वर्षांत ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ ही महत्त्वाकांक्षी योजना बंद केली होती. आम्ही या योजनेला पुन्हा मंजुरी दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
‘धर्माश्रय-राजाश्रयाने समाज विकास’
सिद्धांतावर टिकून राहिले तर सत्ता टिकते. सिद्धांत सोडले तर सत्ता जास्त काळ टिकत नाही. धर्माश्रयाने व्यक्तीचा तर राजाश्रयाने समाजाचा विकास होतो. त्यामुळे समाजाला या दोन्ही बाबींची गरज आहे, असे सांगून श्री श्री रविशंकर म्हणाले,
‘स्वच्छ भारत’ची सुरवात जालना येथून झाली. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळाले पाहिजे. जलयुक्त शिवार योजनेतही ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ने मोठे काम केले. देशात कोणतीही पूजा करताना आधी जलपूजा केली जाते. त्यामुळे पाण्याला महत्त्व द्या.
नैसर्गिक शेतीवर भर द्या. गावे आदर्श बनवा. स्वदेशीचा वापर करा, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, हिमतीने पुढे जावे, असा संदेश त्यांनी दिला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.