
Solapur News : फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०२३- २४ अंतर्गत फळबाग लागवड व फुलपिके लागवड योजना राबविण्यात येज असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे. या योजनेत डाळिंब, लिंबूसह ड्रॅगन फ्रूट, ॲव्हाकॅडोसारख्या फळांचा समावेश करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
योजनेअंतर्गत वैयक्तिक बांधावर सलग शेतावर व पडीक जमिनीवर फळ पिके, वनीकरण व फुलझाडे लागवड करता येते, यामध्ये सलग फळबाग लागवडी अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याला आंबा, चिकू, डाळिंब, लिंबू, संत्री, सीताफळ, ड्रॅगन फ्रूट, ॲव्हाकॅडो, केळी, द्राक्ष आदी पिकांची लागवड करता येते. पडीक जमिनीवर आंबा, बोर, नारळ, सीताफळ आदी फळपिकांची लागवड करता येते. तसेच गुलाब, मोगरा, निशिगंध आदी फुलझाडांची लागवड करता येते.
या योजनेत लाभार्थींनी क्षेत्र परिस्थितीनुसार लागवडीचे अंतर कमी जास्त करण्यास परवानगी आहे. परंतु देय अनुदान फळपीक लागवडीचे निकष विद्यापीठ शिफारशीनुसार अंतर मर्यादेतच देय राहते. अतिरिक्त कलमे रोपे यांचे अनुदान देय राहणार नाही. लागवड वर्षासह सलग तीन वर्षांत मंजूर अंदाजपत्रकानुसार अनुदान देय राहते.
दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायती वृक्ष पिकांच्या बाबत जे लाभार्थी कमीत कमी ९० टक्के आणि कोरडवाहू वृक्षपिकांबाबत किमान ७५ टक्के झाडे रोपे जिवंत ठेवतील, अशाच लाभार्थींना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहील, असेही त्यांनी सांगितले.
लाभार्थ्यांसाठी निकष
जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास व सात-बाराच्या उताऱ्यावर कुळाचे नाव असेल तर योजना राबवत असताना कुळाची संमती आवश्यक आहे.
अल्प व अत्यल्प लाभार्थी, महिला लाभार्थी, दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेल्या कुटुंबीयांना तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, निरधिसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील व्यक्तीस व पंतप्रधान आवास योजनेला प्राधान्य राहील. लाभार्थीकडे शाश्वत उत्पन्नाची साधने उपलब्ध नसावीत. तसेच तो नोकरदार व्यक्ती नसावा.
लाभार्थी ऑनलाइन रोजगार कार्डधारक असावा. लाभार्थीस ग्रामसभेची मंजुरी असावी व ग्रामपंचायत लेबर बजेटमध्ये त्याचा समावेश असावा, ग्रामसभेचा ठराव आवश्यक आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.