Warehousing : गोदाम व्यवसायासाठी शेतकरी कंपन्यांची क्षमता बांधणी

शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था आणि महिला बचत गटांचे फेडरेशन यांना गोदाम व्यवसायात उतरण्यासाठी गोदाम विषयक सर्व तांत्रिक बाबी माहिती असणे आवश्यक आहे. तसेच तांत्रिक बाबी व्यतिरिक्त गोदाम व्यवसायात आर्थिक व्यवस्थापन करण्यासाठी निधीची उभारणी करण्याचे कौशल्य असणे गरजेचे आहे.
Warehousing
WarehousingAgrowon

शेतकरी, शेतकरी कंपनी (Farmer Company), सहकारी संस्था आणि बचत गटांचे फेडरेशन यांच्या मार्फत यापुढील काळात गोदाम व्यवसायात (Warehousing Business) उतरून योग्य दिशेने पाऊल टाकल्याचे दिसून येईल. परंतु या सर्वांची क्षमता बांधणी करणे आवश्यक आहे. विविध प्रकल्पांच्या माध्यमातून वरील सर्व समुदाय आधारित संस्थांना पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विविध विभागांमार्फत साहाय्य करण्यात आहे.

Warehousing
Warehousing : देशातील गोदाम व्यवस्था आणि क्षमतेची सद्यःस्थिती

यामध्ये प्रामुख्याने कृषी पायाभूत निधी (AIF), स्मार्ट आणि पोकरा प्रकल्प यांच्या माध्यमातून समुदाय आधारित संस्थांना याचा फायदा होत आहे. सदयस्थितीत राज्यातील ज्या शेतकरी कंपन्यांना प्रकल्प मंजूर झाले आहेत, त्या शेतकरी कंपन्यांची अवस्था एकीकडे योजना राबविण्यासाठी निधी उभारणे आणि योजना राबविताना चालू व्यवसायासाठी निधीची तरतूद करणे यामध्ये आहे. गोदाम उभारणीसारखे अवाढव्य प्रकल्प घेऊन त्यातून फायदा मिळेल, यासाठी शेतकरी कंपनीस किमान ३ ते ५ वर्ष लागणार असून तोपर्यंत सर्व शेतकरी कंपनी संचालक मंडळाने चिकाटीने धीर न सोडता आर्थिक व मानसिक स्थिती सांभाळावी, कारण पुढे अत्यंत चांगले दिवस नक्कीच पाहावयास मिळतील, अशी अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही.

साधारणपणे सन २०२५ ते २०३० या पाच वर्षांत मोठया प्रमाणावर सर्व शेतकरी कंपन्यांची गोदामे उभी राहतील. गोदाम आधारित पुरवठा साखळ्या प्रत्यक्षपणे कार्यरत होतील. परंतू या मधल्या काळात शेतकरी कंपनी संचालकांनी शेतमाल संकलन, विक्रीमध्ये स्वत:चा जम बसविणे आवश्यक आहे. याकरिता शक्यतो नामांकित विविध प्रक्रियादार कंपन्यांशी करार करून थेट शेतमाल विक्री करावी. शेतमालाचे पैसे प्रक्रियादार कंपनीकडून वेळेत मिळविण्यासाठी नियोजन करावे.

Warehousing
Warehousing : गोदाम क्षमता वाढीसाठी केंद्रशासित पुरस्कृत योजना

शेतकरी कंपन्यांचे नियोजन ः

गोदाम उभारणीपूर्वी शेतकरी कंपनीने आजूबाजूच्या परिसरात रिकामे खासगी किंवा शासकीय गोदाम मिळत असल्यास ते चालविण्यासाठी अल्पदरात भाड्याने घ्यावे. काही शेतकरी कंपन्यांनी अशा प्रकारे गोदाम भाड्याने घेऊन मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू केला आहे. सुमारे १० ते १५ कोटींपर्यंत आर्थिक उलाढाल करून उत्तम व्यवसाय करण्यास सुरवात केली आहे. यामध्ये त्यांनी स्वत: कडील उपलब्ध भांडवल हे खेळते भांडवल म्हणून वापरले आहे. त्यातून झालेला नफा शासकीय योजना राबविताना गरजेनुसार लाभार्थी हिस्सा म्हणून वापरलेला आहे.

राज्यात गोदाम असणाऱ्या किंवा भाड्याने गोदाम घेऊन व्यवसाय करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची संख्या सद्यःस्थितीत पाहिली तर ती सुमारे एक हजारांच्या घरात पोहोचलेली आहे. यातील सुमारे ८०० शेतकरी कंपन्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विभागाशी संलग्न आहेत.

Warehousing
Warehousing : तयार होणार नोंदणीकृत गोदामांचे क्लस्टर

बियाणे व्यवसायात शेतकरी कंपन्या हळूहळू आपला जम बसवत आहेत. त्यातून ‘महासिड ब्रॅण्ड’’ तयार झाल्याने शेतकरी कंपनी ही संकल्पना आपले बस्तान शेती व्यवसायामध्ये घट्ट करीत असल्याचे आशादायी चित्र उभे राहिले आहे.

काही शेतकरी कंपन्यांनी गटशेतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गोदामे उभारली आहेत. विदर्भात त्यांनी गोदामविषयक व शेतमाल तारणविषयक व्यवसाय करणाऱ्या तेथील सहकारी बँकांना ६०:४० टक्के किंवा ८०:२० टक्के अशा प्रमाणात उत्पन्न विभागणी करून गोदाम भाड्याने न देता थेट बँकेला चालवण्यास दिले आहे.

राज्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांना शेतकरी आणि स्वत:च्या संस्थेसाठी फार काही करण्याची इच्छा दिसत नाही. कारण आजमितीस सुमारे ८०० शेतकरी कंपन्या बियाणे व्यवसाय करीत असतील तर प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था पीककर्ज व काही प्रमाणात कृषी निविष्ठा विक्री वगळता इतर कोणताही व्यवसाय करण्यास तयार नाही. त्यामुळे ८०० शेतकरी कंपन्यांच्या तुलनेत फारच कमी म्हणजे एकही प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था बीजोत्पादन करीत असल्याचे दिसत नाही किंवा त्याकरिता निदान प्रयत्न करीत असल्याचे उदाहरण पहावयास मिळत नाही.

सध्या जुन्या संचालक मंडळाची काहीही करण्याची तयारी नाही. नवीन नेमणूक झालेले संचालक मंडळ थोडे तरुण व उत्साही असून त्यांच्या मार्फत यापुढील काळात मोठ्या प्रमाणावर व्यवसाय उभारणी होणार आहे. तसेच ज्या प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थामध्ये तरुण वर्ग आलेला आहे, अशा संस्थांना नवीन काहीतरी करून दाखविण्याची इच्छा आहे.

परंतु त्यांची पूर्वीची परिस्थिती अडचणीची आहे की, आर्थिक व्यवस्थापन करताना त्यांना विविध आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. बऱ्याच ‘क’ दर्जाच्या सहकारी संस्था एकेकाळी १५ टक्यांपर्यन्त लाभांश वाटपात अग्रगण्य स्थानावर होत्या. परंतु जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बुडीत निघणे, पीक कर्ज वसुली आणि शासनाची कर्जमाफी या सर्व कारणामुळे सर्व कामकाज ठप्प झाल्याचे चित्र आहे. परंतु तरीही काही सहकारी संस्था या परिस्थितीवर मात करून पुढे जाण्यास धाडस करण्यास तयार आहेत, ही जमेची बाजू आहे. सन २०१० ते २०२० हा कालावधी शेतकरी कंपनी निर्मितीमध्ये खर्च झालेला आहे. २०२१-२०३० हा काळ शेतकरी कंपनीचा व्यवसाय उभारणीचा काळ झाल्याचे लवकरच आपल्या निदर्शनास येईल.

योजनांचा फायदा

गोदाम विषयक पुरवठा साखळीचा अभ्यास करताना महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या योजनेचा फायदा घेऊन समुदाय आधारित संस्थानी स्वत: व्यवसाय वृद्धी करणे आवश्यक आहे. ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे अजिबातच भागभांडवल नाही, त्यांनी अत्यंत स्वस्त आणि विना निधी व्यवसाय करण्यास अत्यंत चांगली संधी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे.

राज्यात ज्या भागात महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची गोदामे एमआयडीसी किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती भागात आहे, त्यांना तर ही अत्यंत उत्तम संधी आहे.

सर्व शेतकरी कंपनी व सहकारी संस्था यांनी वखार पावती तयार करून माल वखार महामंडळाच्या गोदामात ठेवावा, जेणेकरून बाजारभाव समाधानकारक असतील तर शेतमाल थेट बाजार समितीत विकता येईल किंवा शेतीमाल थेट विक्रीसाठी इतर प्रक्रियादार कंपन्यांना देता येईल.

वखार महामंडळ गोदाम भाड्यात शेतकरी वर्गाला ५० टक्के तर इतरांना २५ टक्के सूट देते. २४ तासात शेतीमाल धारकास ९ टक्के दराने अर्थसाहाय्य देते. शेतकऱ्याच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात येतात. त्यामुळे शेतकरी कंपनी व सहकारी संस्थांनी एक पाऊल पुढे उचलून आपल्या सभासदांना वखार महामंडळाच्या गोदामात शेतीमाल ठेवण्यास प्रवृत्त करावे. ही अत्यंत महत्त्वाची जागा या संस्थानी भरून काढली तरी शेतकरी वर्गाचे उत्पन्न वाढण्यास नक्कीच हातभार लागेल यात शंका नाही.

शेतकरी वखार महामंडळाच्या गोदामात शेतीमाल ठेवण्यास तयार होत आहेत. त्याचाच परिपाक म्हणजे वखार महामंडळाने चालू आर्थिक वर्षात देशात वखार पावती योजनेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या व्यवस्थापनाचा सिंहाचा वाटा आहे. यापुढील काळात सर्व समुदाय आधारित संस्थांनी वखार महामंडळाच्या पावलावर पाऊल ठेऊन गोदाम व्यवसायात आपली प्रगती साधण्यास उत्तम संधी निर्माण झालेली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ हे सर्वांना सर्व स्तरावर मदत करण्यास तत्पर असल्याचे दिसून येईल.

- प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०. (शेतमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या.पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com