Agriculture Warehouse : उत्पादनांच्या साठवण सुविधांचा लाभ कसा घ्यावा?

Maharashtra State Warehousing Corporation : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने शेतकऱ्यांना आर्थिक सेवा देण्यासाठी उपाय योजना सुरू केल्या आहेत.
Agriculture Warehouse
Agriculture WarehouseAgrowon

मिलिंद आकरे, हेमंत जगताप

Warehouse Update : शेतकरी कंपन्यांनी व्यवसाय उभारणी करताना निव्वळ कृषी पायाभूत सुविधा उभारणी करणे अपेक्षित नसून शासनाच्या कृषी पायाभूत सुविधांचा सुद्धा तितकाच उपयोग करून घेणे आवश्यक आहे.

राज्यात महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था व महिला बचत गटांचे फेडरेशन या समुदाय आधारित संस्थांना व्यवसाय उभारणीच्या दृष्टीने मार्गदर्शन करीत आहे. त्याचा अनेक संस्थांना फायदा होत असल्याचे आता दृश्य स्वरूपात दिसण्यास सुरवात झाली आहे.

परंतु महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य पणन मंडळ यांचे मार्फत राज्यात मोठ्या प्रमाणावर कृषी पायाभूत सुविधांची उभारणी झाली असून त्याचा फायदा फारच कमी समुदाय आधारित संस्था त्याचा उपयोग करून घेत आहेत. वास्तविक आकडेवारी पहिली तर त्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे.

गोदाम विषयात परिपूर्ण अशी संस्था राज्यात असेल तर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे नाव घ्यावे लागेल. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हा शासनाचा उपक्रम असून, राज्यभरात गोदामांचे जाळे निर्माण करून कृषी व औद्योगीक क्षेत्रास साठवणूक सुविधा पुरविण्यासाठी महामंडळाची निर्मिती केलेली आहे.

महामंडळाची स्थापना ८ ऑगस्ट १९५७ ला “ॲग्रिकल्चर प्रोड्यूस (डेव्हलपमेंट ॲण्ड वेअरहाउसिंग) कॉर्पोरेशन ॲक्ट १९५६” अन्वये झाली आहे. सन १९६२ मध्ये “द वेअरहाउऊसिंग कॉर्पोरेशन ॲक्ट १९६२” संमत झाल्यानंतर, १९५६ चा कायदा रद्द झाला असून आता हे महामंडळ १९६२ च्या कायद्यान्वये कार्यरत आहे.

Agriculture Warehouse
Ware housing : गोदाम उभारणीद्वारे शेतीमाल विक्री व्यवस्थापन

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ (एमएसडब्ल्यूसी) ही देशातील सर्वात जुने राज्य वखार महामंडळ आहे. याची सुरवात तीन गोदाम केंद्राने झाली होती आणि आता २०६ केंद्रांची वाढ झाली असून एकूण क्षमता १७.६० लाख टन (३१ मार्च २०१९ पर्यंत) आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने शेतकऱ्यांना आर्थिक सेवा देण्यासाठी उपाय योजना सुरू केल्या आहेत.

त्यांचे प्राथमिक उत्पादन साठवण्यासाठी म.रा.व.महामंडळ वैज्ञानिक साठवण सुविधांचा लाभ घेण्यासाठी त्यांना ५० टक्यांपर्यंत सूट देऊन प्रोत्साहित करते. एससी / एसएसटी अधिसूचित आदिवासी शेतकऱ्यांना ५० टक्यांपर्यंत सूट दिली जाते.

महामंडळाचे गोदामात साठवणुकीस ठेवलेल्या मालासाठी देण्यात येणारी वखारपावती ही परक्राम्य लेख (Negotiable Instrument) असल्याने , वखार पावतीवर विविध बँकाकडून तारण कर्ज दिले जाते.

त्या आधारे शेतकऱ्यांना काढणीपश्चात कामकाज करण्यासाठी व तातडीच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी बँकेकडून अर्थ साहाय्य घेऊन गरजा पूर्ण करता येतात. त्यानंतर योग्य बाजारभाव येईपर्यंत गोदामांत सुरक्षित साठवणुकीची सोय मिळते.

गोदाम व व्यापार करण्यास इच्छुक शेतकरी कंपन्यांसाठी उपलब्ध सेवा

गोदामांची बांधकामे:

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाला इतर संस्थांसाठी नाममात्र पर्यवेक्षण शुल्कासह गोदाम बांधून देते. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने यापूर्वी आदिवासी विकास महामंडळाला अशा सेवा पुरवल्या आहेत.

सल्लागार सेवा पुरवणे:

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आधुनिक गोदाम उभारणी /बांधकामासाठी सल्लागार म्हणून सेवा प्रदान करते, तसेच ते अन्नधान्याच्या शास्त्रीय पद्धतीने साठवणूकी बाबत आवश्यक सल्ला देते.

शास्त्रशुद्ध साठवणूक सुविधा:

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ सर्व प्रकारचे कृषी उत्पादने,औद्योगिक कच्चा माल,औद्योगिक तयार वस्तू आणि विविध नाशवंत माल आणि इतर अधिसूचित वस्तूंसाठी संपूर्ण महाराष्ट्रात २०६ विविध केंद्रांच्या ठिकाणी शास्त्रशुद्ध साठवण सुविधा उपलब्ध करून देते.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे द्रोणागिरी नोड येथे कंटेनर फ्रेट स्टेशन(CFS) कार्यरत असून तेथे आयात–निर्यात सुविधा पुरवली जाते. या व्यतिरिक्त,महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आयात वस्तू साठवणूकी करिता शुल्कबंध गोदामाची सुविधा सुद्धा पुरवते.

हाताळणी व वाहतूक सुविधा:

ठेवीदारांनी विनंती केल्यास वखार महामंडळाच्या कामाचा एक भाग म्हणून प्रमुख ठेवीदारांना हाताळणी व वाहतूक सेवा प्रदान केली जाते. हाताळणी व वाहतूक सेवेमध्ये खालील घटकांचा समावेश असतो:

१. रेल्वे धक्क्यावर रेल्वे वॅगनमधून माल उतरवणे आणि ट्रकमध्ये भरणे.

२. मालधक्यापासून गोदामांपर्यंत मालाची वाहतूक करणे.

३. ट्रक मधून माल उतरवून तो गोदामात थप्पी लावणे.

४. मालाचे जावक देण्याकरिता गोदामातील साठा ट्रक मध्ये भरणे.

साठवलेल्या मालाचे १०० टक्के विमा संरक्षण:

जोखीम हस्तांतरण धोरणाचा एक भाग म्हणून,महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांकडून विमा पॉलिसी प्राप्त केलेली आहे,ज्यामध्ये गोदाम इमारत आणि गोदामांमध्ये साठवलेला मालाचा समावेश असतो.

सर्व गोदामांना आग,दंगल,संप,हरताळ आणि घातपातामुळे होणारे नुकसान, (आरएसएमडी)तसेच वादळ, चक्रीवादळ ,महापूर, (एसटीएफआय) यासर्वापासून विमा संरक्षण आहे.महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने ०१/०७/२०२१ ते ३०/०६/२०२२ च्या कालावधीसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी कडून विमा पॉलिसी घेतल्या आहेत.

या पॉलिसीचे वेळोवेळी नूतनीकरण केले जाते.सदर विमा पॉलिसीमध्ये गोदामात साठविलेला माल(स्टॉक),गोदाम इमारत,कस्टम ड्यूटी,डेटा सर्व्हर,कॉम्प्युटर आणि इतर संबंधित उपकरणे,इत्यादींचा समावेश आहे.

कीड नियंत्रण सेवा:

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ कीड नियंत्रण सुविधा सुद्धा पुरवते. यात अॅल्युमिनियम फॉस्फाईड गोळ्या मालाच्या थप्पीवर आणि मालाच्या चहुबाजूंनी पसरवून ठेवल्या जातात, यामुळे किटकांचे नियंत्रण होते.

हाय डेनसीटी पॉलिथिन कव्हर्स(HDPE) अन्नधान्याच्या थप्पींवर आच्छादन करून धुरीकरणासाठी वापरले जाते. धुरीकणाचा जास्तीत जास्त प्रभावासाठी वाळू भरलेल्या पिशव्या यांचा वापर करून संपूर्ण धान्याची थप्पी हवाबंद केली जाते.

Agriculture Warehouse
Agriculture Warehouse : लक्षात घ्या गोदाम योजनेचे फायदे...

आयात निर्यात क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी उपलब्ध सुविधा

सद्यःस्थितीत बऱ्याच शेतकरी कंपन्या विविध प्रकल्पातून पायाभूत सुविधा उभी करून आयात निर्यात करण्यास सज्ज झालेल्या आहेत.

परंतु ज्या कंपन्यांकडे अशा सुविधा उपलब्ध नसतील त्यांनी खेळते भांडवल उभारून खालील आयात निर्यातीशी संबंधित सुविधांच्या आधारे कामकाज करून मोठी उलाढाल करण्यास हरकत नाही. त्यानंतर स्थिरस्थावर होऊन पुढे मोठे प्रकल्प उभारण्यास हरकत नाही.

कंटेनर फ्रेट स्टेशन(CFS) वखारगृहे

महामंडळाचे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, द्रोणागिरी नोड, न्हावाशेवा येथे अत्याधुनिक कंटेनर फ्रेट स्टेशन असून त्याव्दारे एका छताखाली आयात-निर्यातदारांसाठी सेवा उपलब्ध आहेत. हे कंटेनर फ्रेट स्टेशन खालील प्रमाणे तीन भागात विभागलेले आहे.

१.निर्यात गोदाम: ३,६०० चौ.मी आच्छादित क्षेत्र.

२. आयात गोदाम: २,५२५ चौ.मी. आच्छादित क्षेत्र.

३. शुल्कबंध (Bonded) गोदाम : ३,३३३ चौ.मी. आच्छादित क्षेत्र.

वखार महामंडळामार्फत कंटेनरच्या वाहतूक व साठवणुकी करिता २१,००० चौ.मी चे विस्तीर्ण क्षेत्र उपलब्ध असून संपूर्ण संगणकीकृत व्यवहार नोंदी केल्या जातात. शिपिंग लाइन्स एजंट व CHA करिता आवश्यक सुविधांसह पुरेसे कक्ष उपलब्ध असून निर्यात गोदामाचे माध्यमातून LCL व FCL या दोनही प्रकारे मालाची जावक केली जाते.

आयातदारांसाठी शुल्कबंध गोदामाची सुविधा उपलब्ध असून संपूर्ण परिसर हाय मास्क , फ्लड लाइट , सी.सी.टी. व्ही. कॅमेरे, अग्निशमन यंत्रणा इ. व्दारा सुरक्षित करण्यात आलेला आहे. तसेच २४ तास अखंड पाणी वीज पुरवठा उपलब्ध असून आयात / निर्यात माल कंटेनर मधून काढणे / मध्ये माल भरण्यासाठी प्रशस्त जागा सुद्धा महामंडळाकडे आहे.

त्याचप्रमाणे अंगभूत अग्निशमन यंत्रणा तसेच स्वतंत्र अग्निशामक यंत्र उपलब्ध असून पॅलेटिझिंग, लॅशिंग, कंटेनर साफ करणे, कंटेनरची धुलाई करणे यासारख्या संबद्ध सेवा गुणात्मक सेवा वाजवी दरासह प्रदान केल्या जातात.

तसेच कंटेनर टॉप लिफ्टर / बेलोटी, विविध क्षमता फोर्कलिफ्ट्स, क्रेन यासारखी सेवा योग्य आणि कंडिशन मटेरिअल हँडलिंग उपकरणे प्रविण्यात आली असून सीएफएसमध्ये ट्रेलर आणि हँड ट्रॉली प्रदान केल्या जात आहेत. म.रा.व.मं व्यापारानुसार त्वरित सेवा देण्याची योजना आखली असून दस्तऐवजीकरण, बिलिंग आणि लेखा आवश्यकतांसाठी एक खिडकी क्लिअरन्स अंतर्गत २४ तास सेवा देण्यात येते.

शुल्कबंध वखारगृहे

महामंडळाची खालील ठिकाणी शुल्कबंध वखारगृहे आहेत. शुल्कबंध वखारगृहात, आयात केलेला माल सीमा शुल्क भरेपर्यंत साठविता येतो. आयातदार आयात केलेला गरजे एवढा माल वखारीतून तेवढ्या मालासाठीचे सीमा शुल्क भरून नेऊ शकतात, यामुळे आयातदार संपूर्ण सिमाशुल्काची मोठी रक्कम न भरता आयात केलेला माल गरजेनुसार वापरू शकतो.

नवी मुंबई विभाग : वाशी,तळोजा,कळंबोली,सीएफएस, द्रोणागिरी नोड, जेएनपीटी

गोदाम व्यवसाय सुरू करताना नियोजन

सुरवातीला कमी भांडवलावर शासकीय पायाभूत सुविधेच्या आधारे शेतकरी कंपन्यांनी कामकाज करणे अपेक्षित आहे.

तारण कर्ज

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हे शेतकरी हिताचे निर्णय आणि शेतकरी समर्थक धोरणे राबवून शेतकरी समुदायाला लाभ करून देत आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ राष्ट्रीयकृत किंवा शेड्यूल्ड बँकांकडून शेतकऱ्यांना वखार पावतीवर तारण कर्ज मिळवून देतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पडलेल्या भावाने शेतमालाची विक्री करावी लागत नाही.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात शेतमाल साठवण केल्यावर शेतकऱ्यांना मिळणारी वखार पावती गहाण ठेऊन किफायतशीर दराने तारण कर्ज सहज उपलब्ध होते.

शेतमाल तारण योजना कार्यपद्धती

१.शेतकरी नोंदणी

• शेतकरी महामंडळाच्या गोदामास भेट देईल त्यावेळेस महामंडळाचा फार्म नं.६ चा अर्ज गोदाम धारकास भरून देईल.

• फार्म नं.६ मध्ये मालाचे वर्णन, मालाचा दर्जा/प्रत, वजन, ठेवीदाराचे नाव, पत्ता पोत्यांची संख्या, माल ठेवलेल्या दिवशीचा बाजार भाव इत्यादी माहिती सादर करेल.

याव्यतिरिक्त महत्त्वाची केवायसी कागदपत्रे (आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी ) कागदपत्रे गोदाम धारकास सादर करेल.

२. वखार/गोदामात मालाची साठवणूक

• महामंडळाच्या गोदामात प्राप्त झालेला माल व फार्म नं. ६ मधील माहिती याची गोदाम धारक पडताळणी करेल.

• त्यानंतर वखार महामंडळाचा गोदाम धारक ठेवीदाराचे नाव. प्राप्त मालाचे वर्णन, पोत्यांची संख्या, मालाचे वजन, गुणवत्ता व प्रचलित कृ.उ.बा.समितीच्या दरानुसार मालाची किंमत इत्यादी बाबी गोदाम पावतीवर नमूद करेल व ठेवीदारास गोदाम पावती देईल.

Agriculture Warehouse
E-Warehouse Receipt System : ई-गोदाम पावती प्रणाली बाळसे धरतेय

३. तारण कर्ज अर्ज प्रक्रिया

• शेतकरी ठेवीदारास साठवणूक मालावर तारण कर्ज घेण्याचे असेल तर असा शेतकरी गोदाम धारकाकडून प्राप्त झालेली गोदाम पावती घेऊन ठेवीदार त्यास ज्या बँकेकडून तारण कर्ज घेण्याचे आहे अशा बँकेकडे गोदाम पावती सादर करेल.

• संबंधित बँक प्राप्त झालेली गोदाम पावती त्यामधील नमूद मालाचे वर्णन, वजन, प्रचलित किंमत लक्षात घेऊन तसेच संबंधित कर्ज अर्जदार याची बँकेच्या नियमानुसार पात्रता ठरवेल.

• संबंधित शेतकरी ठेवीदार तारण कर्ज मंजूर करण्यास प्राप्त असल्यास अशा अर्जदारास वखार पावतीवरील नमूद मालाच्या किमतीच्या ६० टक्के ते ७० टक्के कर्ज मंजूर करीत असते, असे कर्ज बँक निहाय वेगवेगळ्या व्याज दराने वितरित करण्यात येते.

४. कर्ज मंजुरीची बॅक स्तरावरील प्रक्रिया

• बँकेचे अधिकारी ठेवीदाराचे प्राप्त झालेले केवायसी कागदपत्रे व ठेवीदाराची गोदाम पावती याची छाननी करून व ठेवीदाराची बँकेच्या नियमानुसार तारण कर्जासाठीची पात्रता ठरवून कर्ज वितरित करीत असतात.

• ठेवीदार शेतकरी तारण कर्जासाठी पात्र असल्यास त्यास तारण कर्जाच्या विविध कागद पत्रांची पुर्तता बँक अटी व शर्तीनुसार करावी लागते. तसेच प्रत्यक्ष तारण कर्ज वितरित होण्यापुर्वी ठेवीदार कर्जदारास गोदाम पावतीवर तारण रक्कमेची नोंद/बोजा गोदाम धारकाकडून नमूद करून घ्यावा लागतो.

• त्यानंतर बँक अधिकारी शेतकरी ठेवीदार यांच्या बँक खात्यावर तारण कर्जाची रक्कम वर्ग करतात.

५. कर्ज परतफेड व मालाची जावक

• ठेवीदार शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम बँकेस परतफेड केल्यानंतर बँक गोदाम पावतीवरील कर्जाची नोंद/बोजा रद्द करणेबाबत रीतसर गोदाम धारकास ना-हरकत प्रमाणपत्र देतात.

• त्यानंतर संबंधित ठेवीदार आपल्या गोदाम पावतीवरील नमूद माल गोदामाचे भाडे अदा करून त्रयस्थ पक्षकारास विक्री अथवा हस्तांतरित करू शकतो.

समुदाय आधारित संस्थांकरीता प्रशिक्षण कार्यक्रम

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचे मार्फत शेतकरी उत्पादक संस्था व प्राथमिक कृषी पत संस्था यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम खालील विषयावर आयोजित करण्यात येतात.

• शास्त्रीय साठवणुकीची कार्यपद्धती

• गोदाम बांधणी व व्यवस्थापन

• लेखा कार्यपद्धती,

• गोदामांचे शास्त्रशुद्ध बांधकाम,

• कृषी मूल्य साखळी व्यवस्थापन

• केंद्र सरकारच्या गोदामा संबंधातील विविध योजनांची संपूर्ण माहिती

• यशस्वी शेतकरी उत्पादक संस्था यांच्याकडील विविध व्यावसायिक प्रकरणांचा अभ्यासाचे चर्चासत्र.

संपर्क : प्रशांत चासकर,९९७०३६४१३०, (शेतमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ञ , प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या.पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com