
Pune News मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत (Agriculture Scheme) वैयक्तिक शेततळे घटकाच्या लाभासाठी २०२२-२३ मध्ये संगणकीय सोडतीने जिल्ह्यातील ९४४ लाभार्थ्यांची निवड झाली असून पूर्वसंमती दिलेल्यांपैकी शेततळ्याची कामे पूर्ण केलेल्या ४७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २८ लाख ७३ हजार रुपये अनुदान (Subsidy) जमा करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्याकरिता वैयक्तिक शेततळे घटकासाठी २०२२-२३ या वर्षासाठी ७ कोटी ८० लाख रुपये रकमेचा आर्थिक लक्ष्यांक देण्यात आलेला होता. या योजनेंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल ७५ हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान देय आहे.
या योजनेतील वैयक्तिक शेततळे घटकांचा लाभ घेण्यासाठी पुणे जिल्ह्यातून आतापर्यंत १ हजार ६४७ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केलेले आहेत. त्यापैकी ऑनलाइन लॉटरीमध्ये ९४४ शेतकऱ्यांची निवड झाली आहे.
आतापर्यंत २१६ लाभार्थींना ऑनलाइन पूर्वसंमती दिलेली आहे. त्यापैकी ४७ लाभार्थींनी ३१ मार्च २०२३ पूर्वी शेततळ्याची कामे पूर्ण केलेली असल्याने त्यांना अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थींना काम पूर्ण झाल्यानंतर चालू २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये अनुदान अदा करण्यात येणार आहे.
शेततळ्याची कामे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांमध्ये पुरंदर तालुक्यातील १८, आंबेगाव तालुक्यातील ६, बारामती व इंदापूर प्रत्येकी ५, खेड व शिरूर तालुक्यातील प्रत्येकी ४, भोर व दौंड तालुक्यातील प्रत्येकी दोन व हवेली तालुक्यांतील एका शेतकऱ्याचा समावेश आहे.
अशी आहे प्रक्रिया
या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल www.mahadbtmahait.gov.in या संगणकीय प्रणालीवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ‘सिंचन साधने व सुविधा’ या शिर्षकाअंतर्गत ‘वैयक्तिक शेततळे’ ही बाब निवडून पुढील आवश्यकतेनुसार पुढील तपशील निवडणे आवश्यक आहे.
लाभार्थ्याची ‘महाडीबीटी’ पोर्टलद्वारे लॉटरी पद्धतीने निवड केली जाते. लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना मोबाईल एसएमएसद्वारे संदेश प्राप्त होतो.
त्यानुसार त्यांनी जमिनीचा सात बारा व ८ अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, हमीपत्र, जातीचा दाखला आदी कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत.
ही कागदपत्रे तपासून तालुका कृषी अधिकारी सदर शेतकऱ्यास ऑनलाइन पूर्वसंमती देतात.
पूर्वसंमती दिल्यानंतर शेततळे खोदाईबाबत क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार शेतकऱ्याने शेततळ्याचे काम पूर्ण करून काम पूर्णत्वाचा दाखला तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचा आहे.
त्यानंतर कृषी पर्यवेक्षक यांनी शेततळ्याची मोका तपासणी करून अनुदान परिगणना केल्यानुसार शेतकऱ्याला जिल्हास्तरावरुन पीएफएमएस प्रणालीद्वारे अनुदान वितरित केले जाते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.