डॉ. नितीन उबाळेडाळींमध्ये आत्मनिर्भरतेसाठी कडधान्य उत्पादनांपासून त्यावरील प्रक्रियेमध्ये महिलांचे नेतृत्व पुढे आणण्याकरिता यंदाचे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष ही सुवर्णसंधी आहे. आज जागतिक कडधान्य दिनानिमित्त त्याचाच घेतलेला हा आढावा....कधीकाळी ‘गरिबांचे अन्न’ म्हणून दुर्लक्षित केल्या गेलेल्या डाळी आज पोषणसुरक्षा, अन्नसुरक्षा आणि शाश्वत शेतीचा महत्त्वाचा आधार बनत आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केल्यानुसार दरवर्षी १० फेब्रुवारी ‘जागतिक कडधान्य दिवस’ साजरा केला जातो. या दिवसामागचा हेतू केवळ डाळींचे पोषणमूल्य सांगणे इतकाच मर्यादित नसून, शाश्वत शेती, हवामान-सुसंगत शेती पद्धती आणि सर्वसमावेशक अन्नप्रणाली उभारण्यात डाळींची भूमिका अधोरेखित करणे हा आहे. डाळी प्रथिनांचा स्वस्त आणि सहज उपलब्ध स्रोत आहेत. कुपोषण, लपलेली भूक आणि वाढते जीवनशैलीजन्य आजार या पार्श्वभूमीवर डाळींचे महत्त्व अधिक आहे. या वर्षी साजरा होणाऱ्या जागतिक कडधान्य दिनाची संकल्पना ‘जगातील डाळी : साधेपणापासून श्रेष्ठतेकडे’ आहे. साध्या अन्नातून जागतिक पोषणात योगदान देणाऱ्या डाळींना ‘श्रेष्ठतेकडे’ नेण्याची क्षमता नक्कीच आहे..World Pulses Day : जमीन अन् मानवाच्या पोषणासाठी कडधान्ये महत्त्वाची.भारत हा जगातील डाळींचा सर्वात मोठा उत्पादक (जागतिक उत्पादनाच्या सुमारे २५-२८ टक्के), सर्वात मोठा उपभोक्ता (२७ टक्के) आणि मोठा आयातदार देश आहे. हरभरा, तूर आणि मसूर ही भारतातील प्रमुख कडधान्य पिके आहेत. गेल्या काही वर्षांत देशातील डाळी उत्पादन २५ दशलक्ष टनांहून अधिक झाले असले, तरीही वाढती मागणी भागवण्यासाठी भारताला आयातीवर अवलंबून राहावे लागत आहे. तूर, हरभरा, उडीद, मूग यांसारखी पिके कमी पाण्यावर येत असल्याने बदलत्या हवामानात शेतकऱ्यांसाठी तुलनेने सुरक्षित पर्याय ठरतात. मात्र हमीभाव खरेदीतील मर्यादा, साठवण व प्रक्रिया सुविधांचा अभाव, उत्पादकतेतील तफावत या अडचणी कायम आहेत. काढणी पश्चात व विपणन साखळीतील दुव्यांवर लक्ष दिल्यास राज्यातील कडधान्यांची शेती आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होऊ शकते..जैवविविधता अन् कडधान्येकडधान्य पिकांच्या मुळांमध्ये असलेल्या रायझोबियम जीवाणूंमुळे वातावरणातील नायट्रोजन जमिनीत स्थिर होते. त्यामुळे मृदेची सुपीकता नैसर्गिकरीत्या वाढते आणि पुढील पिकांच्या उत्पादनाला पोषक वातावरण तयार होते. पीक फेरपालट व आंतरपीक पद्धतीत कडधान्यांचा समावेश केल्यास जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजिवांची क्रियाशीलता वाढते. कडधान्यांची लागवड जमिनींचे आरोग्य आणि जैवविविधतेसाठी दीर्घकालीन गुंतवणूक ठरते. कडधान्य पिके जमिनीत अडकलेले स्फुरद उपलब्ध स्वरूपात आणतात. त्यामुळे पुढील पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा सुलभ होतो. विविध पिकांसोबत डाळवर्गीय पिके घेतल्यास कीड-रोगांचे जीवनचक्र खंडित होते आणि जैवविविधता बळकट होते. म्हणूनच शाश्वत शेतीसाठी कडधान्य अपरिहार्य ठरतात..World Pulses Day : अन्नसुरक्षा, शाश्वत शेतीसाठी कडधान्ये महत्त्वाची....हवामान बदलामुळे शेतीसमोर दुष्काळ, अतिवृष्टी, तापमानातील तीव्र चढ-उतार आणि पाण्याची टंचाई अशी अनेक संकटे उभी ठाकली आहेत. अशा अनिश्चित परिस्थितीत कडधान्य हवामान-सुसंगत म्हणून पुढे येत आहेत. कमी पाण्यावर येणारी, खोल मुळे असलेली अनेक कडधान्य कोरडवाहू भागांतही तुलनेने चांगली तग धरतात. बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याची ही क्षमता शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी महत्त्वाची ठरत आहे..आंतरपीक पद्धतीत कडधान्यांचा समावेश केल्यास जमिनीवर आच्छादन निर्माण होते, पावसामुळे होणारी धूप कमी होते आणि जमिनीची संरचना टिकून राहते. पशुखाद्यात कडधान्यांचे अवशेष वापरल्यास जनावरांच्या पचनक्षमतेत सुधारणा होऊन मिथेन उत्सर्जनात घट होण्यास मदत होते. अन्नसुरक्षेच्या दृष्टीनेही डाळींची भूमिका निर्णायक आहे. जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात अन्न वाया जाते; मात्र डाळी दीर्घकाळ साठवता येतात आणि त्यांचे पोषणमूल्य टिकून राहते..World Soil Day: निरोगी आरोग्यासाठी,निरोगी माती महत्त्वाची....त्यामुळे साठवण आणि वाहतूक टप्प्यावर होणारे नुकसान तुलनेने कमी होते. कोरडवाहू व अर्धकोरडवाहू भागांत डाळी अन्नसुरक्षेसाठी विश्वासार्ह पर्याय ठरतात. शेतकरी डाळी विकून रोख उत्पन्न मिळवू शकतो आणि कुटुंबासाठी प्रथिने व सूक्ष्मअन्नद्रव्यांनी समृद्ध अन्नही उपलब्ध होते. कमी पाण्यात येणारी पिके असल्याने पाण्याच्या टंचाईतही कडधान्यांची शेती टिकून राहते. त्यामुळे बदलत्या हवामानाच्या काळात अन्नपुरवठा स्थिर ठेवण्यासाठी आणि ग्रामीण कुटुंबांची पोषणसुरक्षा बळकट करण्यासाठी डाळी हा शाश्वत आधार ठरतो..महिलांचे योगदान अमूल्यडाळवर्गीय पिकांच्या शेतीत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असूनही तो अनेकदा दुर्लक्षित राहतो. शेतातील पेरणीपासून ते तणनियंत्रण, काढणी, साठवणूक आणि घरगुती पातळीवरील प्रक्रिया या सर्व टप्प्यांवर महिलांचे कष्ट दिसून येतात. प्रत्यक्ष शेतात राबणाऱ्या हातांपासून ते बाजारात पोहोचणाऱ्या डाळीपर्यंत महिलांचा मोलाचा वाटा असतो. ग्रामीण भागात स्वयं-सहायता गट, महिला शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या माध्यमातून डाळींची स्वच्छता, ग्रेडिंग, प्रक्रिया व पॅकेजिंग यांसारख्या मूल्यवर्धनाच्या संधी निर्माण होत आहेत..यामुळे महिलांना केवळ मजूर म्हणून नव्हे, तर उद्योजक म्हणून पुढे येण्याची संधी मिळत आहे. स्थानिक पातळीवर डाळी प्रक्रिया केंद्रे उभी राहत असल्याने महिलांचे उत्पन्न वाढण्यासोबतच गावातच रोजगाराच्या संधी तयार होत आहेत. मात्र प्रशिक्षण व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती कमी मिळते. महिलांना जमिनीचा हक्क, सुलभ पतपुरवठा, कौशल्याधारित प्रशिक्षण आणि बाजारपेठेचा थेट प्रवेश मिळाल्यास डाळी क्षेत्रातील उत्पादनक्षमता वाढेलच; शिवाय कुटुंबाचे उत्पन्न, पोषण आणि आर्थिक सुरक्षितता यामध्येही लक्षणीय सुधारणा होईल. २०२६ हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ असल्याने, कडधान्य उत्पादन त्यावरील प्रक्रिया क्षेत्रातील महिलांचे नेतृत्व पुढे आणण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे..खऱ्या अर्थाने अन्नसुरक्षा मजबूत करायची असेल, तर महिला शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवण्याची वेळ आता आली आहे. कडधान्य तसेच डाळींच्या उत्पादन क्षमतेचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर संशोधन, हवामान-सहनशील वाणांचा प्रसार, प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन, स्थानिक खरेदी साखळी मजबूत करणे आणि ग्राहकांमध्ये डाळींच्या पोषणमुल्याबद्दल जनजागृती करणे आवश्यक आहे. आर्थिक स्थैर्य, पोषणसुरक्षा आणि शाश्वत शेती यांचा संगम साधण्यासाठी डाळी हा महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठीही एक मजबूत आधार ठरत आहेत.९९७५६७८१७५(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.