उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काय होणार, असा प्रश्न आता पक्षासमोर उभा आहे. पवार यांच्या कामाची पद्धत आणि अन्य बाबींवर बरीच चर्चा झाली आहे. मात्र एका गोष्टीचे कवित्व संपायचे नाव घेत नाही, ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचे काय? .अजित पवार पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर अवघ्या महाराष्ट्रावर आघात झाला आणि या धक्क्यातून अजून बरेच जण सावरलेले नाहीत. मात्र राजकारण कोणासाठी थांबत नाही, किंबहुना ते कठोरपणे पुढे जात असते, याचा प्रत्यय अवघ्या महाराष्ट्राला आला आहे. उपमुख्यमंत्री हे संविधानिक पद नसताना सुद्धा ते भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार-पाच प्रमुख नेत्यांनी जी काही घाई केली, ती पाहता या संपूर्ण प्रक्रियेकडे महाराष्ट्र संशयाने पाहत आहे. दिवंगत पवार यांच्या जाण्यामुळे नेमके कोणते नुकसान झाले आहे, याचा प्रत्यय जसा पक्षातील नेत्यांना येत आहे, तसा आता प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही येत आहे. अजित पवार यांची प्रतिमा स्पष्ट वक्ते, कठोर अशी होती. मात्र प्रत्यक्षात पवार कसे होते हे राज्यभरातील अनेक अधिकाऱ्यांनी शोकसभांमधून सांगितले आहे. पवार यांच्या कामाची पद्धत आणि अन्य बाबींवर बरीच चर्चा झाली आहे. मात्र एका गोष्टीचे कवित्व संपायचे नाव घेत नाही. ती चर्चा म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचे काय?.Sharad Pawar: 'फडणवीसांना काय अधिकार आहे?' राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर शरद पवार यांचा संतप्त सवाल.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेने युती केली, तर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद आजमावून पाहिली. परंतु त्यात फारसे यश आले नाही. महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या जागा मिळाल्या त्या पाहता दोन्ही पक्षांना आत्मचिंतनाची गरज असल्याचे समोर आले. या आत्मचिंतनाच्या चर्चांमधून दोन्ही पक्षांनी एकत्र आले पाहिजेत, यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे म्हणणे आहे. दिवंगत पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन भाजपसोबत जाण्याचा निर्णय २०२२ मध्ये घेतला होता..२०१४ मध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र लढले. मात्र भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने या पक्षाला बाहेरून पाठिंबा देत शिवसेनेला शह दिला होता. त्यामुळे काही काळ शिवसेनेला विरोधी पक्षात बसावे लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी नेहमीच जुळवून घेतले आहे आणि आता एकत्र जाण्यात काहीच गैर नाही असा युक्तिवाद पक्षातील अनेक नेते करत होते. पक्षाचा जन्म झाल्यापासून सत्तेची फळे चाखलेल्या नेत्यांना विरोधात बसताना प्रचंड अस्वस्थ वाटत होते. सत्ता असेल तर कामे होतात. त्यामुळे सत्तेसोबत गेले पाहिजे, असा सूर नेत्यांमध्ये होता. अर्थात, असा सूर म्हणजे संधिसाधूपणा असतो ही गोष्ट वेगळी!.Shiv Sena NCP Symbol Disputes: स्थानिक निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे- शरद पवारांना मोठा धक्का, पक्ष, चिन्ह वादावरील सुनावणी लांबणीवर.चर्चाच झाली विलीनराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेतूनच बाळसे धरलेला असल्यामुळे या पक्षातील नेत्यांना विरोधात राहायचे नाही. या रेट्यामुळेच अजित पवार यांना भाजपसोबत जावे लागले. त्या वेळी दोन्ही पक्षांमध्ये जोरदार मेळावे झाले, एकमेकांना आव्हान देणे झाले, अबोला झाला, निवडणूक आयोग सुप्रिम कोर्ट आदी ठिकाणी दंड थोपटण्यात आले. आधी अजित पवार गट फुटला म्हणून त्यांच्या नावाने तोंडसुख घेणारा शरद पवार गट आता एकत्र येण्यासाठी धडपडत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि दिवंगत अजित पवार यांच्यात चर्चा होऊन हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील, तर अन्य नेत्यांच्या विरोधाला कोणी जुमानण्याचे कारण नाही..पण जी काही चर्चा झाली ती दिवंगत पवार यांच्याबरोबर विलीन झाली आहे. याचा अर्थ अजित पवार पक्षात एकटे निर्णय घेत होते का? की त्यांचा त्यांच्या सहकारी प्रमुख नेत्यांवर विश्वास नव्हता, असे अनेक प्रश्न या निमित्ताने जसे निर्माण होतात. हे प्रश्न शरद पवार गटाच्या नेत्यांबाबतही निर्माण होत आहेत. भाजपच्या विचारसरणीशी आपली विचारसरणी मेळ खात नाही. परिणामी, आपण त्यांच्याबरोबर जाणार नाही, असा पवित्रा घेतलेले हे नेते आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी धडपडत आहेत. याचा अर्थ त्यांना सत्तेत जायचे आहे का? की अजित पवार गट सत्तेतून बाहेर पडून विरोधी पक्षाच्या भूमिकेत जाणार, याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही..NCP Alliance Local Polls: मुश्रीफांनी 'भाजप'चा डाव ओळखला, मध्यस्थी करत दोन्ही राष्ट्रवादींना आणले एकत्र .संशय बळावतोयदिवंगत अजित पवार यांच्या जाण्यानंतर लगेचच राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि पक्षीय राजकारणातून काही काळ बाहेर फेकले गेलेले धनंजय मुंडे अचानक सक्रिय झाले. या चौघांनी पक्षाचे सूत्रे ताब्यात घेऊन वेगाने हालचाली केल्या. गेल्या सात-आठ दशकांपासून ज्या पवार कुटुंबीयांच्या भोवती महाराष्ट्राचे राजकारण फिरत आहे. त्या राजकारणाला हादरे बसत असताना हे चारही नेते भाजपशी चर्चा करत होते. त्यामुळे पक्षात प्रचंड चलबिचल सुरू झाली. धनंजय मुंडे हे सरपंच देशमुख हत्या प्रकरणात अडकलेले होते. शरद पवार यांनीही मुंडे यांच्याविषयी जे वक्तव्य केले होते ते पाहता विलीनीकरणानंतर आपली डाळ पक्षात शिजणार नाही, यावर त्यांचा पुरेपूर विश्वास होता. त्यामुळे त्यांनी निर्वाणीचा प्रयत्न करून पाहिला..अलीकडेच ईडीच्या कचाट्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर ज्या पद्धतीने छगन भुजबळ यांच्यासारखे नेते बोलू लागले ते पाहता एक प्रकारे भाजपची केलेली परतफेडच होती. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोन नेते सध्या शरीराने राष्ट्रवादीत असले तरीही त्यांचे पूर्ण मन भाजपमय झाले आहे. त्यामुळे भाजपच्या नादी लागून राष्ट्रवादीचे निर्णय घेत आहेत का, हा संशय पक्षातील बहुतांश आमदारांच्या मनात बळावला. त्यामुळेच विधिमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानंतर लगेचच विधान भवनात अजित पवार यांच्याशी कट्टर असणाऱ्या सर्व आमदारांची बैठक झाली. या बैठकीत बहुतांश आमदारांनी आपल्याच नेत्यांच्या या धावपळीवर आणि घाईगडबडीवर प्रचंड टीका केली. कुणी ऐकेल आणि नेत्यांना सांगेल याची भीडभाड न ठेवता काही नेते बोलत होते..दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर शरद पवार यांचा गट सत्तेत सहभागी होणार, की विलीनीकरणानंतर पक्ष सत्तेतून बाहेर पडणार याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट जरी विलीनीकरणाला तयार नसला, तरी अजित पवार यांनी काही गोष्टी करून ठेवल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद निवडणुकांसाठी त्यांनी दोन्ही गटांच्या नेत्यांबरोबर चर्चा करून एकमेकांना नुकसान होणार नाही, अशा पद्धतीने उमेदवार देण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या..तसेच जिथे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेला लढती झाल्या होत्या तेथील विजेते आणि पराभूत उमेदवाराला एकत्र बसवून त्यांच्या मतदारसंघाची विभागणी केली होती. जे आमदार फुटीनंतर सोबत आले नव्हते, त्यांची अनेक रखडलेली कामे मार्गी लागली होती. त्यामुळे विलीनीकरणाच्या शेवटच्या टप्प्यात आलेली चर्चा आता पवार यांच्या मृत्यूमुळे ठप्प झाली आहे. सत्तेत वाटेकरी नको यासाठी अजित पवार गटातील काही निवडक नेते अटीतटीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र या प्रयत्नांना कितपत यश येईल, याचे उत्तर येत्या महिनाभरात मिळेल.९२८४१६९६३४(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे मुंबई प्रतिनिधी आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.