डॉ. रिता शेटियाWari Economic Benefits: वारी हा निव्वळ एक धार्मिक प्रवास वाटत असला, तरी या परंपरेमागे बळीराजाच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध, शाश्वत आणि अनोखे ‘कृषी कल्याणाचे- अर्थशास्त्र’ दडलेले आहे..साधारणपणे पारंपरिक अर्थशास्त्राचा नियम असा सांगतो, की मानवी गरजा अमर्यादित आहेत आणि संसाधने मर्यादित; त्यामुळे जिथे वस्तूंची टंचाई असते, तिथे नफ्याची स्पर्धा आणि मानसिक ताण निर्माण होतो. परंतु वारकरी परंपरा या सिद्धांताला छेद देऊन ‘कल्याणाच्या अर्थशास्त्राची’ पुनर्रचना करते. केवळ उत्पादनाची आकडेवारी किंवा नफा म्हणजेच प्रगती नव्हे, तर ‘मानवी कल्याण आणि समाधान’ हा अर्थशास्त्राचा खरा आत्मा आहे. या चष्म्यातून पाहिले, तर शेतकऱ्याच्या जीवनशैलीत वारीचे स्थान खालीलप्रमाणे अर्थशास्त्रीयदृष्ट्या स्पष्ट होते..Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’.शेतीतील ताणतणाव मुक्ती : शेती हा पूर्णपणे निसर्गाच्या अनिश्चिततेवर - दुष्काळ, अतिवृष्टी आणि पिकांच्या अनिश्चित भावावर आधारित व्यवसाय आहे. सततच्या आर्थिक चिंतेमुळे आणि कर्जाच्या दबावामुळे शेतकरी मानसिक तणावात असतो. अर्थशास्त्राच्या आणि मानसशास्त्राच्या दृष्टीने वारी हे शेतकऱ्यासाठी ‘सोशियो-इमोशनल डिटॉक्स’ ठरते. शेकडो किलोमीटरची पायपीट, नामस्मरण आणि सामूहिक सहभागामुळे त्याच्या मनातील आर्थिक चिंतेचा ताण हलका होतो. इथे मिळणारे मानसिक समाधान त्याला पुढील वर्षाच्या कष्टांसाठी नवी ऊर्जा देते..अनौपचारिक कृषी मंच : वारीचा मार्ग हा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतील शेतकऱ्यांना एकत्र आणणारा एक प्रकारचा ‘मोफत कृषी संवाद मंच’ बनतो. चालताना आणि मुक्कामाच्या ठिकाणी शेतकरी एकमेकांशी संवाद साधतात. यात पिकांचे नवीन वाण, हवामानाचे अंदाज, स्थानिक बाजारपेठेचे भाव, सिंचनाचे नवनवीन प्रयोग आणि शेतीपूरक व्यवसायांची मोफत देवाणघेवाण होते. हे व्यावहारिक ज्ञान मिळवण्यासाठी शेतकऱ्याला कोणताही आर्थिक खर्च करावा लागत नाही..सूक्ष्म बचत आणि सामूहिक सोई : वारी हे शेतकऱ्यांमधील ‘सहकारी अर्थव्यवस्थेचे’ उत्तम उदाहरण आहे. वारीला जाण्यासाठी शेतकरी वर्षभर आपल्या शेतमजुरीतून किंवा उत्पादनातून थोडी-थोडी बचत करतो. ही सवय ग्रामीण भागात ‘सूक्ष्म बचती’ची संकल्पना रुजवते. पुढे दिंडीच्या माध्यमातून सर्व शेतकरी एकत्र येऊन पैशांचे नियोजन करतात. या ‘सामूहिक खरेदी’मुळे भोजनाचा, निवासाचा आणि प्रवासाचा प्रतिव्यक्ती खर्च अत्यंत कमी होतो आणि कमीत कमी पैशांत दर्जेदार सोई मिळतात. दिंडीचे प्रमुख हजारो वारकऱ्यांसाठी आवश्यक असणारे अन्नधान्य, किराणा, ताडपत्री, भांडी किंवा वाहनांची भाडी सामूहिकरीत्या ठरवतात. एकत्र खरेदीमुळे व्यापाऱ्यांकडून मोठा डिस्काउंट (घाऊक दर) मिळवणे शक्य होते. वैयक्तिक पातळीवर जो खर्च एका शेतकऱ्याला परवडणार नाही, तोच खर्च शेकडो लोकांमध्ये विभागल्यामुळे अतिशय अल्प दरात सर्वांना उत्तम दर्जाच्या सोयी-सुविधा मिळतात..गिफ्ट इकॉनॉमी : वारीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही व्यवस्था ‘गिफ्ट इकॉनॉमी’वर चालते. वारीच्या मार्गावर ठिकठिकाणी अन्नछत्रे, वैद्यकीय शिबिरे आणि पादत्राणांचे मोफत वाटप केले जाते. अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्याला कोणताही आर्थिक भार न सोसता संपूर्ण प्रवासात मोफत अन्न, औषधे आणि निवारा मिळतो. बाजारातील खरेदी-विक्रीच्या व्यापारी चौकटीतून बाहेर पडून ‘देण्यातील आनंद’ मुख्य बनल्याने इथे बळीराजावर कसलाही आर्थिक ताण उरत नाही..ग्रामीण अर्थव्यवस्थेला चक्राकार गती : शेतकरी जेव्हा वारीत चालतो, तेव्हा शहरातून आणि विविध भागांतून येणारा पैसा थेट ग्रामीण भागातील लहान व्यापारी, भाजीवाले, छोटे वाहतूकदार, दूध उत्पादक आणि कारागीर यांच्या हातांमध्ये पोहोचतो. हा पैसा थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेत फिरल्यामुळे गुणक प्रभाव निर्माण होतो आणि ग्रामीण भागातील रोख रकमेचा प्रवाह सुधारतो..हवामान बदलाशी अनुकूलन : आजच्या काळात हवामान बदलामुळे शेतीचे गणित पूर्णपणे विस्कटले आहे. निसर्गाच्या या अवकृपेचा सामना कसा करायचा, याविषयी वेगवेगळ्या भागांतील शेतकऱ्यांचे अनुभव वारीत ऐकायला मिळतात. एकमेकांचे संकट ऐकून शेतकऱ्याला ‘मी एकटाच या संकटात नाही’ असा धीर मिळतो. एकमेकांच्या सल्ल्याने ते यावर उपाय योजना सुचवतात. ही ‘सामूहिक मानसिक कणखरता’ त्याला शेती सोडून पळून न जाता पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्याचे बळ देते..Vitthal Rukmini Temple: पंढरपुरात विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू.सामूहिक बाजाराची शक्ती : एकटा शेतकरी जेव्हा बाजारात स्वतःचा माल विकायला जातो किंवा शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा (खते, बियाणे, औषधे) खरेदी करतो, तेव्हा त्याला बाजारातील दरांवर कोणताही प्रभाव पाडता येत नाही. अर्थशास्त्रात याला ‘प्राइस टेकर’ म्हणतात. परंतु वारीच्या निमित्ताने जेव्हा लाखो वारकरी आणि शेतकरी दिंड्यांच्या माध्यमातून एकत्र येतात, तेव्हा तिथे ‘सामूहिक बाजाराची शक्ती’ निर्माण होते. ही सामूहिक खरेदीची आणि एकत्र निर्णयांची सवय शेतकऱ्यांमध्ये भविष्यात ‘शेतकरी उत्पादक कंपन्या’ आणि ‘सहकारी गट’ स्थापन करण्यासाठी किंवा चालविण्यासाठी आवश्यक असणारी वैचारिक परिपक्वता निर्माण करते..वारीमध्ये ‘शून्य कचरा आणि पुनरुत्पादन’ या संकल्पनेनुसार अन्न वाया न घालवणे आणि साहित्याचा वर्षानुवर्षे पुनर्वापर करणे यांमुळे निसर्गाचे आणि शेतकऱ्याच्या खिशाचे दोन्हीचे नुकसान वाचते. ही एक अत्यंत शाश्वत व्यवस्था आहे. वारीचा आर्थिक प्रभाव केवळ वारीच्या दिवसांपुरता मर्यादित नसतो. वारी सुरू होण्यापूर्वी काही महिने आधीपासूनच तंबू, भांडी, गाद्या, वाहनांची दुरुस्ती आणि वाद्यांची निर्मिती (टाळ, मृदंग) यांमुळे ग्रामीण भागातील अनेक लहान-मोठ्या उद्योगांमध्ये भांडवल फिरू लागते. .पाश्चात्त्य भांडवलशाही ‘कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा’ कमावण्यावर भर देते; तर वारीतील शेतकरी महात्मा गांधींच्या ‘विश्वस्त’ सिद्धांतावर चालतो. नफ्याची भावना बाजूला ठेवून ‘समाजाचे देणे लागणे’ या भावनेतून लोक आपली संपत्ती व वेळ इतरांसाठी खुली करतात. वारीत कोणत्याही लिखित कराराशिवाय केवळ विश्वासाच्या जोरावर कोट्यवधींचे व्यवहार होतात. या उच्च सामाजिक विश्वासामुळे कायदेशीर व प्रशासकीय खर्चात मोठी बचत होते. गेल्या काही वर्षांत वारीच्या मार्गावर यूपीआय आणि क्यूआर कोडचा वापर वाढला आहे. चहाच्या टपरीपासून ते भाजीपाल्यापर्यंत होणाऱ्या या व्यवहारांमुळे ग्रामीण भागातील बळीराजा आणि छोटे व्यापारी डिजिटल साक्षर बनत आहेत..भूतान देशाने मांडलेल्या ‘सकल राष्ट्रीय आनंद’ संकल्पनेतील सामाजिक - आर्थिक विकास, सांस्कृतिक जतन, पर्यावरण संवर्धन, स्वयंशासित सुशासन हे चारही स्तंभ वारीत दिसून येतात. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक आनंद अहवालानुसार, वारीत मिळणारा ‘सामाजिक आधार’ आणि ‘मानसिक समाधान’ यामुळे शेतकऱ्याला मिळणारा आनंद दिवसागणिक वाढत जातो. अर्थशास्त्रातील ‘घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम’ सांगतो, की भौतिक वस्तूंचा आनंद ठरावीक वेळेनंतर कमी होतो; मात्र वारीतील नामस्मरण आणि चालण्यातून मिळणारा आनंद नित्यनूतन आणि तो वाढतच राहतो..वारीचे अर्थशास्त्र आपल्याला शिकवते, की आनंद हा केवळ वस्तू खरेदी करण्यात किंवा नफा कमवण्यात नसून तो माणुसकी, सहभाग, सहकार्य आणि समाधानी वृत्तीमध्ये असतो. जिथे ‘माझे’ या अहंकारापेक्षा ‘आपले’ ही व्यापक भावना मोठी असते, तिथे संसाधनांचा तुटवडा असला तरी आनंदाचा तुटवडा कधीच भासत नाही. जग जेव्हा ‘नफ्यासाठी व्यापार’ शिकवत होते, तेव्हा आपल्या बळीराजाने वारकरी परंपरेच्या माध्यमातून जगाला ‘कल्याणासाठी व्यापार’ शिकवला आहे!drritashetiya14@gmail.com(लेखिका अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत.)