Indian Meteorological Department : मौसम बडा बेईमान है…

Research in Meteorology: हवामानाच्या लहरीवर शेतीचा घाट घालणाऱ्या शेतकऱ्यांना हवामान विभागाकडून खूप अपेक्षा आहेत.
Indian Meteorological Department
Indian Meteorological DepartmentAgrowon
Published on
Updated on

150 Years of IMD: भारतीय हवामान विभागाला (आयएमडी) नुकतीच १५० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने पुढील वीस वर्षांच्या वाटचालीचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे. तीव्र हवामानाच्या घटनांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणणे, प्रत्येक गावात वेधशाळा, दहा वर्षांत अडीच लाख ग्रामपंचायतींत स्वयंचलित हवामान केंद्र बसवणे, कृत्रिम बुद्धिमत्ता व इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हवामान निरीक्षण ते हवामान अंदाजाची प्रक्रिया पूर्णतः स्वयंचलित करणे, सर्वांना समजेल अशा भाषेत हवामानविषयक माहितीचा प्रसार आदी उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत. हा रोडमॅप नव्या आव्हानांचा वेध घेणारा आहे.

हवामानाचे अंदाज चुकत असल्यामुळे कायम टीकेचा धनी होणाऱ्या हवामान विभागाने गेल्या काही वर्षांत कात टाकली आहे. भारतासारख्या खंडप्राय आणि टोकाची भौगोलिक विविधता असलेल्या देशात हवामानाचा अंदाज वर्तवणे आव्हानात्मक आहे. या आघाडीवर आयएमडीने गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रगती केली.

Indian Meteorological Department
Unseasonal Rain: काही भागात आजही पावसाचे वातावरण; राज्यातील तापमानाचा पारा पुन्हा वाढण्याची शक्यता

या संदर्भ चौकटीत प्रगत देशांतील हवामान संस्थांपेक्षाही आयएमडीची कामगिरी निश्‍चितच उजवी ठरते. १९७१ मध्ये ‘भोला’ चक्रीवादळाने बांगलादेशात तीन लाख लोकांचे प्राण गेले, त्याच वर्षी आंध्र आणि ओडिशात चक्रीवादळात जवळपास २० हजार लोक गेले. पण आयएमडीने चक्रीवादळाची पूर्वसूचना देण्याच्या प्रणालीत केलेल्या सुधारणांमुळे अलीकडच्या काही वर्षांत अशा मृत्यूंची संख्या दहा ते वीसवर आली आहे.

तसेच आयएमडीच्या तीन, पाच दिवसांच्या व दीर्घकालीन हवामान अंदाजांची अचूकता वाढली आहे. अर्थात आयएमडीची ही कामगिरी कौतुकास्पद असली तरी ती पुरेशी नाही. विशेषतः हवामानाच्या लहरीवर शेतीचा घाट घालणाऱ्या देशातील शेतकऱ्यांना आयएमडीकडून खूप अपेक्षा आहेत. अगदी गावपातळीचा नसला तरी किमान मंडल स्तरावरचा हवामानाचा अंदाज वर्तवणे, ढोबळ फाफटपसारा न मांडता नेमक्या स्वरूपाची आणि लोकांना समजणाऱ्या भाषेत हवामानविषयक माहिती देणे, हवामानाच्या अंदाजावर आधारित शेती सल्लासेवेत सुधारणा करणे या तीन प्रमुख अपेक्षा आहेत.

Indian Meteorological Department
Maharashtra Weather: कमाल तापमान वाढण्याचा अंदाज

त्यासाठी आयएमडीला अंकीय हवामान अंदाज प्रारूपाची मर्यादा १२ किमीवरून ६ किमीवर आणावी लागेल, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंगचा वापर करून अचूक हवामान अंदाज वर्तवण्याची प्रणाली विकसित करावी लागेल. बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत हवामानाचे अंदाज पोहोचतच नाहीत. ओडिशात हवामान विभागामार्फत शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या, स्थानिक भाषेत हवामानाची माहिती तयार करून राज्य सरकारला दिली जाते. मग सरकार हा व्हिडिओ त्यांच्या वेबसाइटवर अपलोड करते. तसेच वेगवेगळ्या ग्रुप्सच्या माध्यमातून समाज माध्यमांत रोजच्या रोज काही पोस्ट पाठविल्या जातात. अशा प्रकारचे प्रयोग सर्वच राज्यांत व्हायला हवेत.

वातावरणातील बदलाच्या पार्श्‍वभूमीवर अचूक हवामान अंदाज वर्तवणे व वेळेवर ते लोकांपर्यंत पोहोचवणे ही आव्हाने पेलण्यासाठी आयएमडीला संरचनात्मक बदल करावे लागतील. पायाभूत सुविधांचे जाळे विकसित करून संशोधनाच्या आघाडीवर मोठी मजल मारावी लागेल. त्यासाठी केंद्र सरकारने भक्कम आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे. आयएमडीला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अनेक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जाहीर करण्यात आले. परंतु केंद्राने त्यासाठी केवळ दोन हजार कोटींच्या घरात आर्थिक तरतूद केली आहे. हवामान विभागावर अपेक्षांचे ओझे वाढत असताना दुसऱ्या बाजूला इतकी तुटपुंजी रक्कम वाट्याला येत असेल, तर ‘मौसम है आशिकाना’च्या ऐवजी ‘मौसम बडा बेईमान है’ असेच म्हणावे लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com