Rain : मराठवाड्यापाठोपाठ आता खानदेशामधूनही कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. खरे तर मागील दोन दशकांचा विचार केला असता एखादं-दुसरं वर्ष वगळता दरवर्षी कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी राज्यातील शेतकऱ्यांकडून झाली आहे. शेतकऱ्यांनी आग्रह धरल्यावर शासन-प्रशासन कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार करण्यास सुरुवात करते. अनेकदा याबाबत निर्णय होईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. निर्णय झालाच तर कुठे, कसा पाऊस पाडायचा याबाबत हालचाली सुरू होतात. कृत्रिम पावसाची यंत्रणा जुळवाजुळव करून उभी करण्यास विलंब होतो आणि पुन्हा वेळ निघून गेल्याने निर्णय बासनात गुंडाळून ठेवावा लागतो. निर्णय झाला, यंत्रणा उभारली, प्रयोग झाले तरी राज्यात कृत्रिम पावसाचे बहुतांश प्रयोग फसलेले आहेत. कृत्रिम पावसाच्या प्रयोगानंतर काही ठिकाणी पाऊस झालाच तर तो नैसर्गिक की कृत्रिम याबाबत शास्त्रज्ञांतच वाद होतात.
त्यामुळे प्रयोगानंतर पडलेला पाऊस कृत्रिम होता की नैसर्गिक याबाबत सर्वांमध्ये संभ्रम कायम राहतो. २०१९ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यात कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरू होण्याआधी तीन दिवस जोरदार नैसर्गिक पाऊस झाला. त्यामुळे प्रयोग होत असलेल्या एका गावातील शेतकऱ्यांना आमच्याकडे कृत्रिम पाऊस पाडू नका, अशी विनंती सरकारला करावी लागली. मागील दोन दशकांत २००४ हे वर्ष वगळता एकाही वर्षी कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाला असे शासन-प्रशासन ठामपणे सांगू शकत नाही. जुलै २००४ मध्ये विदर्भातील चारशेहून अधिक तर नोव्हेंबर २००४ मध्ये मराठवाड्यातील हजारहून अधिक गावांमध्ये ‘प्रकल्प वर्षा’अंतर्गत कृत्रिम पावसाचे प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा शासन-प्रशासनाकडून करण्यात येतो.
खरे तर कृत्रिम पाऊस एक विचार म्हणून महत्त्वाचा तर शास्त्र म्हणून फारच उपयुक्त आहे. दुबई शहर तसेच चीन सारखा देश हुकमी कृत्रिम पाऊस पाडून तेथील शेतकऱ्यांसह जनतेलाही दिलासा देत आले आहेत. तर मग आपल्याकडीलच प्रयोग वारंवार का फसतात, याचा गांभीर्याने विचार करायला हवा. आपल्याकडे दुष्काळाची दाहकता वाढू लागली की कृत्रिम पावसावर विचार सुरू होतो. कृत्रिम पावसावर सातत्याने संशोधन, प्रयोग आपल्याकडे होत नाहीत. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीची कायमस्वरूपी यंत्रणा देखील आपल्याकडे कुठे उभी नाही. आत्ताही तसेच झाले आहे. पावसाळ्याच्या शेवटच्या महिन्यात आपण आहोत अन् कृत्रिम पावसाची मागणी होतेय. शासन यावर विचार करून निर्णय घेईपर्यंत पावसाळा संपला असेल. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी पावसाचे ढग आवश्यक असतात. परतीच्या मॉन्सूनच्या ढगांची घनता चांगली असते, या ढगांद्वारे कृत्रिम पाऊस पाडणे शक्य असल्याचे तज्ज्ञ सांगतात. परंतु अचानक निर्णय घेऊन कृत्रिम पाऊस पाडता येत नाही. त्यामुळे सध्याच्या अनियमित पाऊसमान काळात कृत्रिम पाऊस गरजेचाच झाला आहे.
राज्यात आता अग्निशामक दलासारखी कृत्रिम पावसाची कायमस्वरूपी यंत्रणा उभी करायला पाहिजेत. त्यासाठी स्वतंत्र तज्ज्ञ मनुष्यबळ नियुक्त करून त्यात सातत्याने संशोधनही झाले पाहिजेत. प्रगत देशात यावर कसे काम चालते, याचाही वरचेवर आढावा घेत राहणे अपेक्षित आहे. कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी निधी कुठून आणायचा? असाही सवाल वारंवार उपस्थित होतो. दुष्काळ पडल्यानंतर कितीही खर्च करून उपयोग होत नाही, हा अनुभव आहे. अशावेळी कृत्रिम पावसाद्वारे दुष्काळाच्या झळा कमी होत असतील तर त्यासाठी निधीची तरतूद शासनाने करायलाच हवी. महत्त्वाचे म्हणजे कृत्रिम पाऊस पाडा,
अशी म्हणण्याची वेळच शेतकऱ्यांवर येता कामा नये. पाऊस कमी पडला, पिके सुकू लागली, धरणे भरली नाहीत, पाणीटंचाई जाणवू लागली की त्या त्या भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय हे शासन-प्रशासन पातळीवरच झाला पाहिजेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.