
Krishi Vidyapeeth Political Interference: महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळाला गेल्या पाच महिन्यांपासून अध्यक्ष नाही. राज्यातील चार कृषी विद्यापीठांमधील अधिष्ठाता, संचालक, सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक आदी संवर्गातील पदे मंडळाच्या माध्यमातून भरली जातात. विद्यमान आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सेवाप्रवेश मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. मंडळावर तीन कुलगुरू, अशासकीय सदस्य, राज्यपाल नियुक्त तज्ज्ञ सदस्य आणि सदस्य सचिव यांच्या नियुक्त्या झालेल्या असल्या तरी अध्यक्षाचाच पत्ता नसल्यामुळे मंडळाचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे विद्यापीठांतील पदांची निवडप्रक्रिया रखडली आहे.
राज्यातील कृषी विद्यापीठे रिक्त पदांमुळे मेटाकुटीला आले आहेत. वर्षानुवर्षे नियमित पदभरती आणि पदोन्नत्या न झाल्यामुळे रामभरोसे कारभार सुरू आहे. एकेका व्यक्तीकडे दोन-तीन पदांचा अतिरिक्त कार्यभार आहे. विद्यापीठात कनिष्ठ संशोधन सहाय्यक ते प्राध्यापक अशी मोठी उतरंड असते. परंतु या साखळीतील अनेक पदे भरलेलीच नसल्यामुळे पदोन्नती होऊन, अनुभव घेऊन सक्षम मनुष्यबळ तयार होण्याची प्रक्रियाच खुंटली आहे. त्यामुळे आज अशी स्थिती आहे की, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, संशोधक पदासाठी पात्र आणि अनुभवी उमेदवारच मिळत नाहीत.
महत्त्वाची पदे दीर्घकाळ रिक्त राहत असून कोणाला तरी अतिरिक्त पदभार देऊन ‘प्रभारी’ कारभार सुरू आहे. त्यामुळे आयुष्यभर विस्तार शिक्षणाचे काम केलेली व्यक्ती संशोधनाचा ओ की ठो कळत नसताना थेट संशोधन संचालकाच्या पदावर विराजमान होऊन विद्यापीठाच्या संशोधनकार्याची दिशा निश्चित करते. हा सगळा सावळा गोंधळ विद्यापीठांच्या गुणवत्तेच्या मुळावर आला आहे. कृषी संशोधन आणि शिक्षण याचा दर्जा कमालीचा खालावलेला आहे. एकेकाळी देशात आघाडीवर असलेली महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे आता तळाच्या रांगेत ढकलली गेली आहेत.
केंद्रीय पातळीवर कृषी संशोधन सेवेतील शास्त्रज्ञ व इतर पदांवरील निवडीसाठी कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ १९७३ पासून कार्यरत आहे. या मंडळाचा देशात नावलौकिक आहे. अनेक नामवंत शास्त्रज्ञांनी या मंडळाचे अध्यक्षपद भूषविले. महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळाची मात्र अशी ख्याती नाही. या मंडळाच्या अध्यक्षपदावर राजकीय मंडळी आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा डोळा आहे. कारण विद्यापीठांतील उच्चस्तरीय पदांची निवड करणारी ही यंत्रणा असल्यामुळे हे मलईदार मंडळ मानले जाते.
शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या बरोबर आलेल्या सगळ्याच आमदारांना मंत्री करणे शक्य नव्हते. त्यामुळे काहींची विविध पदांवर वर्णी लावण्यात आली. प्रकाश आबिटकर यांची अशीच दुधावरची तहान ताकावर भागवणारी राजकीय सोय म्हणून त्यांना महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष करण्यात आले. त्यावर वरताण करत या महाशयांनी सेवाप्रवेश मंडळाचे अध्यक्षपदही आपल्याच ताब्यात ठेवले. वास्तविक या पदावर राजकीय नियुक्ती करणे आत्यंतिक चुकीचे आहे.
कृषी संशोधन, शिक्षणाच्या क्षेत्रातील गाढा अनुभव असणारा वरिष्ठ शास्त्रज्ञ किंवा कुलगुरू पातळीवरची व्यक्ती अध्यक्ष म्हणून नेमली पाहिजे. माणिकराव कोकाटे कृषिमंत्री असताना त्यांनी या पदावर अराजकीय व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी या पदासाठीचे पात्रता निकष तयार करण्यास कृषी परिषदेला सांगितले होते. परंतु एकापाठोपाठ एक वादांत अडकत गेलेल्या कोकाटेंचा पाय स्थिर नव्हता. त्यामुळे हे निकष सध्या धूळ खात पडले आहेत. नव्याने कृषिमंत्रीपदाचा कासरा हाती घेतलेल्या दत्तात्रय भरणे यांनी आता ती धूळ झटकून सेवाप्रवेश मंडळावर सुयोग्य व्यक्तीची निवड करणे आवश्यक आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.