Indian Agriculture: पिकांची पेरणी ते काढणी ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी तसेच काढणीपश्चीत शेतीमालास अधिक भाव मिळण्यासाठी कृषी व पणन विभागाच्या ‘टास्क फोर्स’ची (कृती दल) स्थापना करण्याचा निर्णय कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जणू काही आपल्याला नवा साक्षात्कारच झाला या थाटात घेतला आहे..खरे तर नव्याने मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली, की नवा प्रकल्प, नवे अभियान, नवा अभ्यास गट, विशेष कृती दल स्थापन करण्याची कृषी विभागात एक फॅशनच झाली आहे. यापूर्वी असे अनेक नवे प्रकल्प, अभियान, कृती दल स्थापन झाले. परंतु त्यातून साध्य काहीही झाले नाही. आता स्थापन करण्यात येणाऱ्या टास्क फोर्सबाबत बोलायचे झाले तर यात नवे असे काहीच नाही..Agriculture Task Force: पेरणी ते विक्रीसाठी टास्क फोर्स.कृषी विभागाचे प्रमुख कार्य हे पीक उत्पादनवाढीच्या अनुषंगाने सोईसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर त्यांना मार्गदर्शन करणे हे आहे. तर काढणीपश्चात पायाभूत सुविधांचा विकास, शेतीमालाची विक्री आणि योग्य भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन हे पणन विभागाचे मुख्य काम आहे. त्यामुळे कृषी व पणन विभागाच्या टास्क फोर्समधून वेगळे काय साध्य होणार, हा खरा प्रश्न आहे..आज पिकांच्या उत्पादकतेच्या बाबतीत आपण जगाच्या बरेच मागे आहोत. शेतकऱ्यांना उत्पादकतावाढीसाठी मार्गदर्शन तर दूरच शेतीसाठी दर्जेदार निविष्ठा वेळेत आणि पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. निविष्ठांच्या भेसळीने आणि बनावटगिरीने राज्यातील शेतकरी त्रस्त आहेत. जीएमसारख्या तंत्रज्ञान वापराचे स्वातंत्र्य नाही..Agriculture Minister Bharane: शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे; भरणे.प्रगत तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. एखाद्या घातक कीड-रोगाचा उद्रेक होत असल्यास त्याच्या नियंत्रणाबाबत योग्य सल्ला मिळत नाही. अचूक हवामान अंदाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. नैसर्गिक आपत्तीत पाहणी-पंचनामे होत नाहीत. पणन विभागाची गत यापेक्षा वेगळी नाही. काढणीपश्चात सेवासुविधांअभावी शेतीमालाचे मोठे नुकसान होते..कोणत्या शेतीमालास चांगला भाव मिळेल याबाबतचे अगोदरच मार्गदर्शन तर सोडा बाजारात घेऊन गेलेल्या शेतीमालाची भाव पडून अनेकदा माती होते. काढणीपश्चात सेवासुविधा उभारणीसाठी स्मार्ट तसेच मॅग्नेट हे प्रकल्प चालू आहेत. याआधी देखील असे अनेक प्रकल्प राबविले गेले. परंतु त्यात गैरप्रकारच बोकाळल्याने सेवासुविधा काही निर्माण झाल्याच नाहीत. कृषी तसेच पणन विभागाच्या इतरही अनेक योजनांचे तसेच आहे. या दोन्ही विभागांच्या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. कृषी, पणन विभागाचेच काही भ्रष्ट अधिकारी सातत्याने गैरप्रकार करीत असतात. हे प्रकार टास्क फोर्सने थांबतील का, याचे उत्तर मिळायला हवे..शेतीचे उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीसाठी कृषी संशोधनावर भर द्यावा लागेल. शेतात पंधरा दिवस समुद्राचे खारे पाणी साचून राहिले तरी त्यात टिकून राहील असा पाणबुड्या भात आपल्या शेजारील बांगला देशने शोधून काढला आहे. तरंगती शेती तंत्रज्ञान त्यांनी चालू केले आहे. हवामान बदलाच्या चरम सीमेवर असताना आपल्या शेतकऱ्यांना अशा पिकांच्या जाती, असे तंत्रज्ञान मिळाल्याशिवाय पिकांची उत्पादकता आणि पर्यायाने उत्पादन वाढणार नाही..प्रत्येक शेतीमालाची ऊस पिकाप्रमाणे मूल्यसाखळी विकसित करावी लागेल. अर्थात, ज्या भागात जो शेतीमाल पिकतो तिथेच त्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. प्रक्रियायुक्त उत्पादने जगभरच्या बाजारात पोहोचायला हवी. शिवाय पिकांच्या मूल्यवर्धनात उत्पादकांचा वाटा असायला हवा. असे झाले तरच शेतीमालास रास्त भाव मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. अन्यथा एका टास्क फोर्सची विभागात केवळ भर पडेल, त्यातून साध्य काहीही होणार नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.