Indian Agriculture: खाद्यतेलाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण नाही. आपल्या गरजेच्या ६५ टक्के खाद्यतेल आपण आयात करतो. दरवर्षी सुमारे १५ दशलक्ष टन खाद्यतेलाची आयात आपल्याला करावी लागते. त्यापैकी ६० टक्के पाम तेल, तर उर्वरित ४० टक्के सोयतेल, सूर्यफूल तेल आणि कॅनोला तेलाची आयात देशात होते. देशात खाद्यतेलात आत्मनिर्भरतेच्या गप्पा मागील दशकभरापासून सुरू आहेत. त्यास पूरक धोरणाचा अवलंब केला जात असल्याचे देखील केंद्र सरकार वारंवार सांगते. .मात्र नेमके या धोरणाच्या उलट निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे खाद्यतेल आत्मनिर्भरतेपासून आपण दूर जात आहोत, अर्थात आपली खाद्यतेलाची आयात वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयातेलाचे भाव पाम तेलापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे सोयातेलाची आयात नोहेंबरमध्ये १८ टक्क्यांनी घटली आहे. अजून दोन ते अडीच महिने सोयातेलाची आयात कमीच राहण्याची शक्यता यातील जाणकार व्यक्त करीत आहेत..Edible Oil Mission: राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत तिळाचे प्रमाणित बियाणे मिळणार .दुसरीकडे उत्पादन आणि आयात घटूनही सोयाबीनला दराचा आधार मिळताना दिसत नाही. खुल्या बाजारात हमीभावापेक्षा एक ते दीड हजार रुपये कमी दराने आतापर्यंत शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले आहे. या वर्षी खरेदी केंद्रे वेळेत सुरू होऊन त्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी करणे अपेक्षित होते. मात्र खरेदी केंद्रे उशिरा सुरू झाली. त्यातही बारदान्यापासून एफएक्यू दर्जाच्या मालापर्यंत त्यात अनंत अडचणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी देखील त्याकडे पाठ फिरविली. त्यामुळे उद्दिष्टाच्या केवळ आठ टक्के सोयाबीन खरेदी होऊ शकली आहे..अलीकडेच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात शेतीमाल अथवा खाद्य उत्पादनांच्या बाबतीत दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणे हे खूपच जोखमीचे ठरत आहे. त्यामुळे आधी कोरोना आणि त्यानंतरच्या युद्धपरिस्थितीमुळे अनेक देश अन्नसुरक्षेला प्राधान्य देत आहेत. आजघडीला भारत ज्या गोष्टींच्या आयातीवर सर्वाधिक खर्च करतो त्यामध्ये कच्चे पेट्रोलियम तेल आणि सोने यापाठोपाठ खाद्यतेलांचा क्रमांक लागतो..Edible Oil: खाद्यतेल झाले स्वस्त .देशात तेलबिया उत्पादन वाढले नाही, तर २०५० मध्ये आत्ताच्या आपल्या गरजेपेक्षा तीन ते चार पटीने खाद्यतेल आयात वाढणार आहे. सध्या १५ दशलक्ष टन खाद्यतेल आयात करतानाच आपली दमछाक होत असताना याच्या तीन-चार पट अधिक खाद्यतेल आयात करताना आपली काय अवस्था होईल, याचाही विचार व्हायला हवा. एवढे खाद्यतेल आयात कुठून करायचे, असाही प्रश्न उपस्थित होतो..नोहेंबरमध्ये सोयातेलाची आयात कमी झालेली असताना पाम तेलाची आयात मात्र पाच टक्क्यांनी वाढली आहे. पामतेल हे आरोग्यास अधिक घातक आहे. त्यात केंद्र सरकारने खाद्यतेल स्वयंपूर्णतेच्या धोरणात पाम लागवडीवरच भर देण्याचे काम केले आहे. जगभरातील अनेक देश ऑइलपामची लागवड कमी करत असताना आपण मात्र त्यालाच प्रोत्साहन देतोय, हे अनाकलनीय म्हणावे लागेल..हे सर्व पाहता खाद्यतेलाच्या बाबतीत आयातीवर निर्भर राहून आयत्या वेळी दैना करून घेण्यापेक्षा आपल्या पारंपरिक तेलबियांवर लक्ष केंद्रित करणेच आपल्याला अधिक हितकारक ठरणार आहे. सध्या आपली खाद्यतेलाची आयात आपल्या प्रत्यक्षात गरजेपेक्षा थोडी अधिक आहे. शिवाय प्रति वर्ष प्रति व्यक्ती आपला खाद्यतेल वापरही अधिक असल्याचे जाणकारांनी अभ्यासपूर्ण मांडले आहे. खाद्यतेलाची आयात घटली असताना आपली प्रत्यक्ष गरज आणि खाद्यतेलाचा आहारातील वापर थोडा कमी करण्यावरही विचार झाला पाहिजे. असे झाल्यास या देशातील जनतेचे आरोग्य आणि देशाचे आर्थिक आरोग्यदेखील सुधारण्यास हातभार लागेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.