शाळेतल्या चिमुकल्यांचा चिमणी वाचवा उपक्रम

‘चिऊ ये, दाणा खा, पाणी पी, भुर्र उडून जा' अशी गाणी म्हणत आपण लहानाचे मोठे झालो. आज मात्र चिमण्यांची संख्या प्रचंड रोडावली. चिवचिव करणारी चिमणी भविष्यात बघायला मिळते की नाही, अशी भीती वाटायला लागली. पूर्वी मातीच्या घराच्या वळचणीला चिमण्या आपली घरटी बांधायच्या, संसार थाटायच्या. घरातील लहानथोर या चिमण्यांना अन्नधान्य टाकायचे. त्या घरी चिमण्या दिवसभर चिवचिव करत राहायचा.
spparow
spparow

‘चिऊ ये, दाणा खा, पाणी पी, भुर्र उडून जा' अशी गाणी म्हणत आपण लहानाचे मोठे झालो. आज मात्र चिमण्यांची संख्या प्रचंड रोडावली. चिवचिव करणारी चिमणी भविष्यात बघायला मिळते की नाही, अशी भीती वाटायला लागली. पूर्वी मातीच्या घराच्या वळचणीला चिमण्या आपली घरटी बांधायच्या, संसार थाटायच्या. घरातील लहानथोर या चिमण्यांना अन्नधान्य टाकायचे. त्या घरी चिमण्या दिवसभर चिवचिव करत राहायचा. पण आता मातीची घरेच हद्दपार होऊन त्या जागी गिलावा केलेली सिंमेंटची घरे (Cement House) आली. चिमण्यांचा हक्काचा अधिवास संपला.

हेही पाहा- Washing Machine विजेशिवायही वापरता येणार

आज जागतिक चिमणी दिन (World Chimney Day). चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यांच्या संवर्धनासाठी खास प्रयत्न करावे लागत आहेत. आजूबाजूला अशी स्थिती असताना खेडेगावातल्या एका शाळेतल्या चिमुकल्यांनी चिमणी (Sparrow) वाचवण्यासाठी खास उपक्रम हाती घेतलाय, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. वाशिम (Vashim) जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या १७ वर्षांपासून चिमणी वाचवा उपक्रम सुरू आहे. या शाळेतील चिवचिव मंडळाची मुले चिमण्यांची उत्तम बडदास्त ठेवतात. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अरुणा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमशील शिक्षक गोपाल खाडे (Gopal khade)हे गेल्या १७ वर्षांपासून चिमणी वाचवा उपक्रमाचे काम पाहतात. हेही पाहा- संघर्षातून मजुराचा झाला प्रगतिशील डाळिंब बागायतदार कामरगावात २००६ पासून या चिमणी वाचवा उपक्रमाला सुरुवात झाली. गोपाल खाडे हे शिक्षक हिवरा लाहे येथून कामरगावच्या शाळेत नव्यानेच रुजू झाले होते. आल्यापासुनच मुलांची आणि गोपाल सरांची चांगलीच गट्टी जमली. विविध गाणी, गप्पा, गोष्टी, कविता या माध्यमातून मुलांचे सरांशी चांगलंच मेतकूट जमलं. एकदा उन्हाच्या तडाख्यात मरण पावलेले काळ्या रंगाचे पक्षी घेऊन विद्यार्थी गोपाल सरांकडे आले. ते सरांना पक्ष्यांच्या मृत्यूचं कारण विचारू लागले. विदर्भातलं (Vidrabha) चटका लावणारं ऊन आणि पाण्याची आणि खाण्याची कमतरता यामुळे या पक्ष्यांचा मृत्यू झाला असावा. विद्यार्थी व शिक्षकांची चर्चा झाली आणि चिमण्या वाचवण्यासाठी काम सुरू करण्यात आला. चिवचिव मंडळाची स्थापना झाली. या मंडळाच्या माध्यमातून चिमणी वाचवा उपक्रम सुरू करण्यात आला. हेही वाचा- गृहोद्योगातून तयार केली ओळख चिमणी वाचवा उपक्रमाच्या पहिल्या वर्षी चिमण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी प्लास्टिकची भांडी वापरली. परंतु चिमण्या व पक्षी त्याकडे काही फिरकेनात. त्यामुळे मातीची भांडी आणली.  तेव्हा कुठे मातीच्या भांड्यातील पाण्याचा आस्वाद चिमण्या व पक्षी घ्यायला लागले. त्यांच्या खाण्याचीही सोय करण्यात आली. ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका यासारखे धान्य बरणीत भरून त्या बरण्या झाडांना टांगण्यात आल्या. एका चिमणीपासून सुरूवात झाली आणि आज मात्र हजारो चिमण्या व पक्षी शाळेच्या आवारात धान्य खाण्याकरिता, पाणी पिण्याकरिता येत असतात. विशेषतः उन्हाळ्यात त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते.   वाढते औद्योगिकीकरण, वृक्षतोड, माणसांनी आपल्या जीवनशैलीत केलेले बदल, किटकनाशकांचा प्रचंड वापर या सगळ्या गोष्टी चिमण्यांच्या मुळावर उठल्या आहेत. चिमण्या लुप्त होतील की काय, अशी भीती वाटू लागली आहे. या पार्श्वभूमीवर कामरगाव येथील शाळेत व गावात लावलेल्या पाणवठ्यांत, बर्ड फिडरमध्ये विद्यार्थी नियमितपणे पाणी व धान्य टाकतात. त्यामुळे चिमण्यांबरोबरच साळुंखी, लालबुडया बुलबुल, सुतारपक्षी, सूर्यपक्षी, भारद्वाज, कोतवाल, सातभाई, कावळे, दयाळ, भोर, बगळे, मैना यांसारख्या पक्ष्यांचा राबता वाढला आहे. गावात जी. टी. मार्केटच्या परिसरात तर चिमण्यांची प्रचंड संख्या आणि किलबिलाट पाहून नवख्या माणसाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. पक्षी संवर्धनाचा वसा कायम राहावा म्हणून पथनाट्यासारखे उपक्रम राबवले जातात. विद्यार्थी गावातून प्रभातफेरी काढून नागरिकांना पक्ष्यांचे महत्त्व पटवून देतात. चिवचिव मंडळाचे विद्यार्थी बर्ड फीडर व घरटी बनविण्याची कार्यशाळाही घेतात. शाळेत सातत्याने घरटी बनवा, बर्डफिडर बनवा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, फलक स्पर्धा यासारख्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. सुंदर, पर्यावरणपूरक आणि अल्प खर्चातली कृत्रिम घरटी तयार करण्यात चिवचिव मंडळाच्या सदस्यांचा हातखंडा आहे. विविध आकार व कल्पना वापरून मुलांनी अनेक प्रकारची घरटी तयार केली. त्यावर पर्यावरणविषयक संदेशही लिहिलेले असतात. मुले पुठ्ठ्यांपासून ही घरटी बनवतात. परंतु पाच वर्षांपूर्वी कुंभार दादाकडून विशिष्ट प्रकारच्या मातीचीही घरटी बनवून घेतली. या दोन्ही प्रकारच्या घरट्यांत चिमण्यांनी व इतर पक्ष्यांनी आपली बिऱ्हाडं थाटली आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यावरही विद्यार्थी आळीपाळीने शाळेत येऊन या पक्ष्यांची देखभाल करत असतात. कामरगावच्या शाळेतील प्रयोगापासून प्रेरणा घेत राज्यातील अनेक शाळांनी हा उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कामरगावच्या शाळेतील उपक्रमाची कीर्ती सातासमुद्रापार गेली. स्वीडन येथील संशोधक डॉ.मनोज काळे यांनी गोपाल खाडे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत उपक्रमाला आर्थिक मदत केली. गोपाल खाडे यांना सोलापूर येथील सर फाउंडेशनने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवले तर अरविंदो सोसायटी व एनसीटीई, दिल्ली यांनी राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते व उच्चपदस्थांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com