
देशाच्या विविध भागात मसाला पिकांचे उत्पादन होते. त्यामध्ये हळद हे प्रमुख पीक आहे. जागतिक स्तरावर हळदीसह भारतीय मसाला पिकांना मागणी वाढली आहे. गेल्या दोन वर्षांत मसाला पिकांची निर्यात ७५ हजार टनावरुन १ लाख ८० हजार टनावर पोहोचली आहे. हळदीच्या लागवड साहित्यातील भेसळ थांबवून दर्जेदार बेणे उपलब्ध होण्यासाठी शेतकरी गट, कंपन्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. सुपारीच्या बाबतीत अतिरिक्त उत्पादन होत असल्यानेत त्यात विशेष समस्या नाहीत, अशी माहिती केरळ येथील सुपारी व मसाला संचालनायाचे संचालक डॉ. होमी चेरीयन यांनी दिली. देशात मुख्य मसाला पिके कोणती आहेत? - देशात मुख्य मसाला पिकांची संख्या वीसच्या घरात आहे. त्यामध्ये मिरची, काळी मिरी, जिरे, हळद यांचा समावेश होतो. बियाणेवर्गीय मसालापीक राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये होते तर दक्षिणेत सर्वाधिक मसाला पिकांचे उत्पादन होते. आंध प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, तामिळनाडू येथे मिरचीची लागवड आहे. भारतात जास्त करून आंतरपीक म्हणून मसाला पिकांची लागवड केली जाते. मसाला पिकांतील संशोधनाबद्दल काय सांगाल ? - भारतीय मसाला पिकांचे वैभव पूर्वीपासूनचे आहे. काळी मिरी कधी काळी मांस टिकवण्यासाठी वापरली जात असे. जिरा पिकावर किड-रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकऱ्यांकडून बेसुमार किटकनाशकांचा वापर केला जातो. या पार्श्वभूमीवर संचालनालयाने रेसिड्यू फ्री जीरा उत्पादनाचा प्रकल्प अजमेर येथील मसाला संशोधन केंद्राला दिला आहे. त्याकरीता निधीची उपलब्धता संचालनालय करीत आहे. आले पीकही किडरोगाला अधिक बळी पडणारे आहे. त्यावर उपाय शोधण्यासाठी संशोधन सुरू आहे. आल्यामध्ये उत्पादन आणि तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठीही पुढाकार घेतला आहे. हळदीची उत्पादकता आणि मागणी कशी आहे ? - केरळ मार्केटमध्ये कमी कुरकुमीन असलेल्या हळद वाणांना मागणी आहे. याउलट देशातील इतर बाजारात अधिक कुरकुमीन असलेल्या वाणांना मागणी आहे. त्यामुळे आम्ही भौगोलिक वातावरणाचा अंदाज घेत येत्या काळात टर्मेरीक हब विकसित करण्यावर भर देणार आहोत. छत्तीसगडमध्ये हळद लागवड क्षेत्र वाढते असल्याने एनचबीने या भागात क्लस्टर जाहीर केले आहे. लॅकाडॉग (मेघा) हे मेघालयातील हळदीचे वाण आहे. ओडिशातील प्रगती, रोमा तर वर्धा जिल्हयातील वायगाव हळद हे वाण प्रचलित आहे. अजमेर केंद्रावरून प्रतिभा हे वाण प्रसारित झाले आहे. त्यामध्ये ५ टक्के कुरकुमीन असते. ते दुष्काळात तग धरणारे असून १८० दिवसांत परिपक्व होते. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अधिक उत्पादन देणारा व कुरकुमीने प्रमाण ६.२ टक्के असणारा पिडीकेवी- वायगाव हा शुद्ध वाण विकसित केला आहे. सोनीया हे बिहारचे एक वाण आहे. भारताचे वाळलेल्या हळदीचे ११ लाख टन उत्पादन होते. त्यातील बहुतांश निर्यात होते. हळद लागवड आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत तेलंगणा आघाडीवर आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात हळद लागवडीच्या बाबतीत हिंगोली जिल्हयाची आघाडी आहे. हिंगोलीच्या खासदारांनी या भागात टर्मेरीक हब उभारण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना काय सांगाल ? वायगाव हळदीला भौगोलिक मानांकन मिळालं आहे. परंतु या वाणांमध्ये शुध्दता अबाधित ठेवण्याचं मोठं आव्हान आहे. लागवड साहित्यामध्ये भेसळ होते. ती थांबवून दर्जेदार बेणे उपलब्ध होण्यासाठी शेतकरी गट, कंपन्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. या समूह, कंपन्यांनी केवळ बियाणे उत्पादनावरच भर दयावा. तरच वायगाव हळदीची शुध्दता टिकवता येईल. हळदीमधील कुरकुमीनला मोठी मागणी आहे. त्यादृष्टीने प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी शेतकरी कंपन्या, समुहांनी पुढे आले पाहिजे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.